कल्याण – डोंबिवलीत मराठी शाळांना घरघर!

कल्याण डोंबिवली हे मराठी बहुल शहर म्हणून ओळखले जाते. पण या शहरात मराठी शाळांना घरघर लागली आहे.

Mumbai
marathi medium school close in kalyan dombivali mahanagar palika
कल्याण - डोंबिवलीत मराठी शाळांना घरघर!

मुंबईतील मराठी टक्का कल्याण डोंबिवलीत विसावला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली हे मराठी बहुल शहर म्हणून ओळखले जाते. पण या शहरात मराठी शाळांना घरघर लागली आहे. महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी शाळांची पटसंख्या कमी कमी होऊ लागल्याने मराठी शाळांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकूण ७४ शाळा होत्या. मात्र गेल्या पाच वर्षात विद्यार्थी संख्या कमी कमी होत गेल्याने ही संख्या ६० वर आली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या अत्यल्प झाल्याने तब्बल १४ शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सध्या महापालिकेच्या शाळेत एकूण साडेनऊ हजार पटसंख्या आहे. शहरातील खासगी शाळांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महापालिका क्षेत्रात खासगी अनुदानित एकूण १३४ शाळा असून, सुमारे ४१ हजार विद्यार्थी संख्या आहे. तर इंग्रजी माध्यामच्या एकूण १२८ शाळा असून, ७० हजार विद्यार्थी संख्या आहे. शहरातील नामांकित शाळांनाही विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचीही ओरड असून, सध्या तुकड्या वाचविण्यासाठी मराठी शाळांचे प्रयत्न सुरू आहेत. पालकांचा ओढा हा कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये अधिक असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली हे मराठी बहुल शहर म्हणून ओळखले जाते मात्र या शहरातही मराठी शाळांना अच्छे दिन नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी शाळा वाचविण्याचे मोठे आव्हान कल्याण डोंबिवलीकरांपुढे आहे.

  • महापालिकेच्या ६० शाळा असून या शाळेत एकूण ८ हजार ५०० विद्यार्थी शिकत आहेत.
  • तर खासगी अनुदानित शाळांची संख्या १३४ असून या शाळांमध्ये ४१ हजार विद्यार्थी शिकत आहेत.
  • इंग्रजी माध्यमाच्या १२८ शाळा असून या शाळांमध्ये ७० हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे.

विद्यार्थी संख्या कमी कमी होत असल्याने मराठी माध्यमांच्या शाळां बंद कराव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. पालकांना आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे असल्याने पालक मराठी माध्यमांच्या शाळेत पाल्याला पाठविण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांची ही अवस्था झाली आहे.  – जे. जे. तडवी, शिक्षणाधिकारी केडीएमसी