घरमुंबईआजपासून राज ठाकरेंच्या सभांचा धडाका

आजपासून राज ठाकरेंच्या सभांचा धडाका

Subscribe

मुंबईत १० ऑक्टोबरला खारमध्ये सभा

लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून राज्यभरात धुमाकूळ उडवून देणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज ठाकरे यांच्या प्रचारसभेचा धुमधडाका बुधवारपासून सुरुवात होत असून पुण्यात शुक्रवार पेठ येथे राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. मुख्य म्हणजे, मुंबईतील पहिली सभा गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी थेट मातोश्रीच्या मतदारसंघात होणार असल्याने सर्वांच्या नजरा या सभेवर लागून राहिल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक लढविणार की नाही, असा संभ्रम मनामध्ये असताना अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या सभांसाठी तयारी सुरु केली असून बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी पहिली सभा पुण्यात होणार आहे. मनसेकडून अ‍ॅड. किशोर शिंदे यांना कोथरुड येथे उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या लढतींकडे लागून राहिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट पुण्यातून पहिली सभा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा या सभांकडे लागून राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, लाव रे तो व्हिडीओ या लोकसभेच्या टॅगलाईन नंतर मनसे नव्या टॅगलाईनने विधानसभेचा प्रचार करणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना या नव्या टॅगलाईनची उत्सुकता लागून राहिली आहे.

- Advertisement -

पुण्यातून मुंबईत

दरम्यान, पुण्यानंतर मुंबईतून थेट प्रचारसभा होणार असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ च्या हाती आले आहे. मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून यंदा मनसेकडून अखिल चित्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मातोश्री आणि शिवसेनेच्या बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या मतदारसंघात यंदा शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्या दृष्टीकोनातून या मतदारसंघाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा याठिकाणी होणार असल्याचे कळते. खार येथे गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता राज ठाकरे यांची ही सभा होणार असून त्यावेळी ते नेमकी कोणती राज गर्जना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -