पॅरोलवर सुटून बाहेर आला, अन् पहिलाच फटका मोबाईलवर मारला

कोरोनामुळे कारागृहांमधील कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले आहे. पण ज्या गुन्ह्यासाठी गेल्या वर्षभरापासून एक गुन्हेगार शिक्षा भोगत आहे, त्याने पुन्हा आपल्या मुळच्या कामाला सुरूवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकल ट्रेनवर फटका गॅंगची दहशत लॉकडाऊनच्या काळात थांबली होती. पण लोकलमधील वाढलेली गर्दी पाहता ही फटका गॅंग आता पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये लुटमार करणारी फटका गॅंग पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. मुंबई लोकल प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ पाहता तसेच ट्रेनचे थांबे वाढल्यानंतर ही गॅंग पुन्हा कामाला लागली असल्याचे समोर आले आहे. सोमवारच्या सकाळच्या पिक अवर्सच्या वेळेत फटका गॅंगने सीएसटी पनवेल लोकलमधील काही लोकांना टार्गेट केले. पण पोलिसांनी आपली गस्त कायम ठेवताना या फटका गॅंगच्या मुसक्या आवळल्या.

रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी हार्बर लाईनवर बिलाल शेखसह फटका गॅंगमधील आणखी दोघांना अटक केली आहे. बिलाल शेखवर चोरीचे आणि दरोड्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. २०१६ पासून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिलाल पॅरोलवर सुटून आलेला असतानाच त्याने हा गुन्हा केला. ओमकार कुलकर्णी हे अंबरनाथचे रहिवासी आहेत. ते लोकलने वडाळ्याच्या दिशेने डोअरवर उभे राहून प्रवास करत होते. आपल्या मोबाईलवर काही पाहत असतानाच त्यांच्या दिशेने काही तरी येत असल्याचे त्यांनी पाहिले. तितक्यातच त्यांच्या हातावर कोणीतरी जोरात फटका मारला आणि त्यांचा फोन हातातून खाली पडला. एका पोलवर उभे राहून ट्रेनमधील प्रवाशांना एक व्यक्ती टार्गेट करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर लगेचच रे रोड स्टेशनला उतरून एका कॉन्स्टेबलच्या मदतीने ते पुन्हा दुसरी लोकल पकडून प्रवास करू लागले.

तोपर्यंत बिलाल आणि त्याचे साथीदार जागेवरून हटले नव्हते. त्यांना आणखी काही लोकांचे मोबाईल काढायचे असल्याने ते तिथेच थांबून होते. रेल्वे पोलिसांच्या तत्काळ प्रतिसादामुळे बिलालचे साथीदार अल्लाउद्दीन शेख आणि तारीफ मंडल यांना चोरीच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये एका व्यापाऱ्याला चालत्या गाडीतून खेचून या गॅंगने मोबाईल खेचला होता. त्यामध्ये या व्यापाऱ्याला गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बिलालवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक गुन्हेगारांना कोविडमुळे कारागृहाबाहेर पॅरोलवर सोडण्यात आले आहे.

अशी व्हायची चोरी

बिलाल हा सराईत गुन्हेगार होता. त्याने चोरीसाठी आपल्यासोबतच काही तरूणांना हाताशी घेतले होते. अल्लाउद्दीन हा बिलालला पोलवर चढण्यासाठी मदत करायचा. त्यानंतर तो लोकलवर लक्ष ठेवायचा. तर मंडल हा साथीदार लोकलमधून पडलेला मोबाईल फोन खाली पडल्यावर उचलून पळून जायचा.