घरमुंबईमल्टिप्लेक्समधल्या खाद्यपदार्थांच्या किंमती ५० रुपयांच्या आत येणार!

मल्टिप्लेक्समधल्या खाद्यपदार्थांच्या किंमती ५० रुपयांच्या आत येणार!

Subscribe

मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये अव्वाच्या सव्वा किंमतीला मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर अनेकदा सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता या खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होणार आहेत. याबाबत कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या सर्व सीईओंची बैठक झाली. त्यानंतर हे दर कमी करण्याचं आश्वासन या सीईओंनी दिल्याचं मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलं आहे.

मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात. बाहेर मिळणाऱ्या किंमतीपेक्षा मल्टिप्लेक्समध्ये तब्बल दुप्पट तर काही पदार्थ तिप्पट किंमतीतही विकले जातात. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून वाद निर्माण होत होते. आता मात्र त्यावर पडदा पडण्याच्या दृष्टीने पाऊल पडले आहे. सर्व मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या मालकांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी मल्टिप्लेक्समधल्या महाग खाद्यपदार्थांविषयीची भूमिकाही त्यांनी मांडली. तसेच, या खाद्यपदार्थांच्या किंमती कमी केल्या जातील असे आश्वासनही या मल्टिप्लेक्सच्या सीईओंनी दिले आहे. मनसेकडून या मुद्द्यावर अनेकदा आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. तसेच, अनेक नागरिकांनी यासंदर्भात फेसबुक लाइव्हद्वारे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किंमती ५० रुपयांच्या आत ठेवण्याची भूमिका

मनसेच्या आंदोलनानंतर सर्व मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या सीईओंनी शनिवारी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खाद्यपदार्थांच्या किंमतीसंदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती ५० रुपयांच्या आत असाव्यात, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यावरच तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याचं आश्वासन थिएटर्सच्या सीईओंनी दिलं आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयानेही फटकारले

काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने थिएटर्समध्ये उच्च दराने विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमतींवरून राज्य सरकारला फटकारलं होतं. ‘तुम्ही सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरचे खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. पण थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती कमी का करू शकत नाहीत?’ अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली होती. जैनेंद्र बक्षी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ही टिप्पणी केली होती.

मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये मिळणाऱ्या किंमती कम करणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भातले अध्यादेश त्यांच्या सर्व थिएटर्समध्ये दिले जातील. पण हे आंदोलन अद्याप संपलेलं नाही. जर आश्वासनानंतरही दर कमी झाले नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.

अमेय खोपकर, अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना

- Advertisement -

दरम्यान, थिएटर्समध्ये मधुमेहाचे रुग्ण आणि लहान मुलांसाठी घरगुती खाद्यपदार्थ नेण्याची अनुमती देण्यात येणार असल्याचंही यावेळी मल्टिप्लेक्सच्या सीईओंकडून सांगण्यात आलं आहे.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -