आंघोळीला जाताना सावधान! गॅस गीझरमुळे झाला तरूणीचा मृत्यू

Mumbai

आंघोळ करताना बाथरूममध्ये गॅस गीझरमधून वायुगळती झाल्याने एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ध्रुवी गोहिल असे या मुलीचे नाव आहे. कार्बन मोनॉक्साइडच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली. ध्रुवी पहाटे आपल्या बोरीवलीच्या राहत्या घरी अंघोळीला गेली असता हा प्रकार घडला.

ध्रुवी नेहमीप्रमाणे आंघोळी गेली होती. ती नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गॅस गीझरमधून पाणी गरम करत होती. आईला आंघोळी जाते सांगून ती बाथरूममध्ये गेली. मात्र आंघोळीला जाऊन एक तास उलटला तरी ती बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे तीच्या घरच्यांनी दरवाजा वाजवायला सुरूवात केली. पण आतून ध्रुवीने कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर घरच्यांनी दरवाजा तोडला. आतमध्ये ध्रुवी बेशुध्द पडली होती. लगेचच ध्रुवीच्या आई- वडिलांनी ध्रुवीला हॉस्पिटलला नेले. धुव्रीला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ध्रुवी व्हेंटीलेटरवर असताना १० जानेवारीला तीचा मृत्यू झाला. त्या दिवशी ध्रुवीचा वाढदिवस होता.

बाथरूमच्या गिझरमधून उत्सर्जित कार्बन मोनोऑक्साईडचा श्वास घेतल्यामुळे ती बेशुद्ध पडली. बाथरूममध्ये कमी प्रमाणात ऑक्सिजन पुरविल्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला अशी माहिती मंगलमुर्ती हॉस्पिटलच्या डॉ. विवेक चौरासीया यांनी दिली.
गॅस गीझरमधून पाणी गरम होताना बाथरूममध्ये हवा खेळती नसल्याने कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू तयार होतो. या प्रकरणातही हेच झाले. परिणामी या वायूच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवी बेशुद्ध पडली. तसेच बेशुद्धावस्थेत तिचा पाय गरम पाण्याच्या नळाखाली आला होता. त्यामुळे तिचा पायही भाजला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तसेच ‘स्नागृहामध्ये गॅस गीझर लावू नका,’ असे आवाहन ध्रुवीच्या कुटुंबीयांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here