घरमुंबईकंगना रानौतच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा

कंगना रानौतच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा

Subscribe

अभिनेत्री कंगना रानौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामाप्रकरणी दिलेल्या नोटीसची मुदत बुधवारी सकाळी संपली. मात्र या बांधकामासाठी महापालिकेकडून घेतलेल्या परवानगींचे कागदपत्रे तिने २४ तासांच्या मुदतीत सादर केली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळी १०.३० च्या सुमारास पोलिस फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायलयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतरच थांबविण्यात आली.

कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने या ठिकाणी मणिकर्णिका फिल्म प्रा. लि. नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस कंगना आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आहे. मुंबई शहराला पाकव्याप्त काश्मीर, अशी उपमा देऊन तिने शिवसेनेचा रोष ओढवून घेतला आहे. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकार्‍यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. त्यानुसार कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी मंगळवारी सकाळी काम थांबवण्याची नोटीस तिला बजावण्यात आली.

- Advertisement -

कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या नोटीसनुसार तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली. त्यावेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलाने उत्तर देण्यासाठी महापालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाचे ४० कर्मचारी – अधिकार्‍यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात पाडकामाला सुरुवात केली. तळमजला, पहिला मजला आणि ऑफिसबाहेरील वाढीव बेकायदा बांधकाम यावेळी जमीनदोस्त करण्यात आले.

कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत संपल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास पालिका अधिकार्‍यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुसरी नोटीस चिकटवली. त्यानंतर अधिकार्‍यांनी तिच्या बंगल्यात प्रवेश करीत नियमबाह्य कामांचे चित्रिकरण केले तसेच छायाचित्र काढले. त्यानंतर पालिका कर्मचार्‍यांनी हातोडा मारण्यास सुरुवात केला. तर प्रवेशद्वारावरील बेकायदा बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

- Advertisement -

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात कारवाई थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारवाई थांबवण्यात आली. उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्यामुळे कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती एच-पश्चिमचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली. न्यायालयाच्या निर्देशानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -