घरमुंबईअंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ,असे असेल नवीन भाडे!

अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ,असे असेल नवीन भाडे!

Subscribe

राज्यातील खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात भरीव वाढ करण्यास मान्यता देण्यात आली असून, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासाठी १ हजार रुपये, नागरी क्षेत्रासाठी ४ हजार तर महानगर क्षेत्रामध्ये ६ हजार रुपये इतके नवीन भाडे असणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. या संदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यशोमती ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान राज्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी ३७ हजार ५४५ अंगणवाड्या या खासगी इमारतीत भरत असल्याचे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जात असल्याने आवश्यक सोई- सुविधांयुक्त इमारत अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध होत नव्हती. ही माहिती मिळताच खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांसाठी भाड्याच्या रक्कमेत वाढ करण्याचे निर्देश त्यांनी तात्काळ दिले.

असे असेल भाडे –

या अगोदर सर्वच क्षेत्रातील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट ७५० रुपये जागाभाडे दिले जात होते. आता यापुढे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात २५० रुपयांची वाढ करुन ते १ हजार रुपये, नागरी क्षेत्रात ३ हजार २५० रुपयांची वाढ करुन ४ हजार रुपये तर महानगर क्षेत्रात ५ हजार २५० रुपये अशी भरीव वाढ करुन ६ हजार रुपये करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अंगणवाड्यांना सर्वसुविधायुक्त इमारती मिळणे शक्य होणार असून पर्यायाने बालकांचे हसत- खेळत शिक्षण यासह सर्वांगीण विकासासाठी उत्तम वातावरण मिळेल, असे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -