घरमुंबईमुंबईत लवकरच फेरीवाला धोरणावर होणार अंमलबजावणी

मुंबईत लवकरच फेरीवाला धोरणावर होणार अंमलबजावणी

Subscribe

मुंबईत लवकरच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. पदपथावर ज्वालाग्रही वस्तूचा वापर करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.

मुंबईत लवकरच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने पथविक्रेता उपविधी तयार करण्यात आली असून यामध्ये ज्वालाग्राही पदार्थ बाळगण्यास आणि पदपथावर तसेच रस्त्यांवर गॅस, स्टोव्ह, शेगडी आदींच्या सहाय्याने खाद्यपदार्थ शिजवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ एका जागी शिजवूनच त्यांची विक्री करावी लागणार असल्याने यापुढे मुंबईकरांना गरमा गरम नव्हे तर गारेगार खाद्यपदार्थ खावे लागणार आहे.

अंमलबजावणी लवकर होणार

मुंबईतील फेरीवाल्यांसाठी फेरीवाला वा ना फेरीवाला विभाग जाहीर करून त्याप्रमाणे त्यांच्या व्यावसायाची जागा निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने पथविक्रेता (व्यवसायाचे विनियमन) उपविधी तयार करण्यात आली आहे. या उपविधीमध्ये नगर पथविक्रेता समिती, परिमंडळ नगर पथविक्रेता यांची कर्तव्य व जबादार्‍यांसह फेरीवाल्यांची नोंदणी, फेरीवाला क्षेत्र, पथविक्री मुक्त क्षेत्र, फेरीवाल्यांसाठी आकारण्यात येणारे मासिक शुल्क, अनामत रक्कम, विलंब आकार, परवाना प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे. विक्रेत्यांनुसार फेरीवाला क्षेत्रे, तसेच व्यवसायाची यादी आणि बंदी घालण्यात आलेल्या व्यावसायाची यादी आदींचा समावेश या पथविक्रेता उपविधीत समावेश करण्यात आलेला आहे. या उपविधीचा मसुदा महापालिका विधी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. उपविधीला मंजुरी मिळाल्यानंतर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

ज्वालाग्रही पदार्थ वापरू शकणार नाही

फेरीवाल्यांसाठी ५७ व्यावसाय प्रकाराची यादी प्रसिध्द करण्यात आली असून याप्रकारातील व्यावसायच फेरीवाल्यांना करता येणार आहे. मात्र, या उपविधीमध्ये पदपथावर फटाके, रॉकेल, पेट्रोल व डिझेल आदी ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करता येणार नाही,अशाप्रकारची अट घालण्यात आली आहे. याशिवाय गॅस, स्टोव्ह व शेगडी आदींच्या सहाय्याने रस्त्यांवर तसेच पदपथावर खाद्यपदार्थ शिजवता येणार नाही,अशीही अट घातली आहे. त्यामुळे नव्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना ही उपविधी लागू होणार आहे. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ तळता तसेच शिजवता येणार नाही. मुंबईकरांना यामुळे गरमागरमा बटाटा वडा, भजी, डोसा, चायनीज वस्तू तसेच चहा आणि सूपचाही आनंद लुटता येणार नाही.

फेरीवाल्यांच्या १५ पवर्गानुसार बनणार क्षेत्र

मुंबईत सध्या कोणत्याही प्रकारचा वस्तू विकण्यासाठी कुठलाही फेरीवाला कुठेही पथारी पसरवून बसत असतो. परंतु पथविक्रेता उपविधीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रवर्गानुसारच क्षेत्र बनवून त्याप्रमाणेच फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा दिली जाणार आहे. यामध्ये महिला फेरीवाला क्षेत्र, भाजीपाला, मासळी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विशेष फेरीवाला, नैसर्गिक मंडई व बाजार, जत्रा/नवरात्री/ गणपती/ दिवाळी/ इत्यादी कालावधीसाठी क्षेत्र, परंपरागत आठवडी बाजार, फुलबाजार, शेतकरी बाजार, रात्र बाजार, फॅशन स्ट्रीय, खाऊ गल्ली आणि वेळा विभागणीच्या तत्वावरील क्षेत्रे अशाप्रकारे १५ फेरीवाला क्षेत्र प्रकार बनवण्यात आले आहेत.

- Advertisement -

या व्यवसायावर बंदी

तंबाखू, गुटखा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ
अश्लील सिडी व मासिके
उसाचा चरखा
अल्कोहोलिक बेवरेजेस
गॅस लायटर
ज्वालाग्राही पदार्थ (फटाके, रॉकेल, पेट्ोल, डिझेल इत्यादी)
अंमली पदार्थ (अफु, चरस, गांजा इत्यादी)
वैद्यकीय औषधे
पदपथावर तसेच रस्त्यांवर शिजवून खाद्यपदार्थ बनवणे(गॅस, स्टोव्ह, शेगडी इत्यादीचा वापर)
बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तू
थर्माकोल व थर्माकोलच्या वस्तू
कोणत्याही कायद्याने बंदी केलेल्या वस्तू व व्यवसाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -