घरमुंबईनितीन नांदगावकरांच्या मनगटावर शिवबंधन

नितीन नांदगावकरांच्या मनगटावर शिवबंधन

Subscribe

‘जय महाराष्ट्र, मी महाराष्ट्र्र सैनिक’, असे म्हणत खळखट्याक करणार्‍या मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत मनसेची साथ सोडली. नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का बसला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढविणार की नाही, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर मनसे सैनिकांचा मेळावा घेत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आतापर्यंत मनसेतर्फे दोन उमेदवार यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या दोन्ही यादीत नितीन नांदगावकर यांचे नाव नसल्याने त्यांनी मनसे सोडली, असे बोलले जात आहे. ‘खळखट्याक’साठी प्रसिद्ध असलेल्या नितिन नांदगावकर हे जनता दरबार भरवायचे. त्यात समस्या घेऊन येणार्‍या गोरगरिबांच्या समस्या सोडवायचे. त्यासाठी प्रसंगी धमक्या देणे, हाणामारी असे प्रकारही करायचे.

- Advertisement -

त्याचा व्हिडिओ ते सोशल मीडियावर अपलोड करायचे. त्यामुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले होते. मात्र नितीन नांदगावकर यांना मनसेकडून त्यांचा दरबार बंद करण्याच्या सूचना आल्या होत्या. त्यामुळे ते नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे. नांदगावकर यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती तशी इच्छा देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, मनसेच्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांचा समावेश नसल्याने त्यांनी अखेर बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. तसेच सोशल मीडियावर नितीन नांदगावकर यांचा एक चाहता वर्ग आहे. त्यांनी फेसबुकचा आधार घेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. नुकतेच त्यांनी टॅक्सीच्या मीटरमध्ये कशी फेरफार होते याचे प्रात्यक्षिक फेसबुकवर लाईव्ह दाखवले होते. रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी, यांसारखे अनेक विषय त्यांनी फेसबुकद्वारे लोकांसमोर आणले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -