घरमुंबईप्रवासी दोन लाख,मुतारी एक !

प्रवासी दोन लाख,मुतारी एक !

Subscribe

सीएसएमटी स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत ,रेल्वेमंत्री पियुष गोयल; जरा मुंबईकरांची ही हालत पाहा आणि ट्वीटही करा!

मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर, लोकल, मेल, गाड्यांमध्ये, पुलांवरची गर्दी आपण अनुभवलेली पाहिलेली असते. मात्र, अशीच गर्दी आणि धक्काबुक्की खाण्याची वेळ आता मुंबईतल्या सार्वजनिक मुतार्‍यांमध्येही आलेली आहे. मुंबई मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर (सीएसएमटी) दोन लाख प्रवाशांसाठी केवळ एकच मुतारी असल्याने दाहक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे रोजच्या २ लाख प्रवाशांपैकी फक्त पाऊण लाख प्रवासी दररोज ही मुतारी वापरतात. उरलेले काहीजण या लाखोंच्या गर्दीत होणार्‍या कुंचबणेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरील मुतारींचा वापर करतात. उरलेले बाकी खुल्या जागेवर जातात किंवा काहीजण तसेच लघवी रोखून घरी जात असल्याचे दिसून आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे प्रचंड गर्दीमुळे महिलांची मोठी कुचंबणा होते.

मुतारी कंपार्टमेंट ६०
एका बाजूला ४६
दुसर्‍या बाजूला १४

- Advertisement -

रेल्वेमंत्री पियुष गोयल हे मुंबईकर असून त्यांनी या दाहक वास्तवाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या मोठ्या गर्दीच्या मुख्य रेल्वे स्थानकावर फक्त एकच मुतारी उपलब्ध करून प्रवाशांची त्रास सहन करण्याची जीवघेणी सहनशीलता तपासण्याचा रेल्वेचा विचार आहे का? असा संताप मुंबईकर व्यक्त करत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असा डंका पिटल्या जाणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरही वेगळी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी मुतार्‍या शोधाव्या लागतात. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर हीच स्थिती आहे. फलाटांवर मुतारी नसल्यामुळे पूल पायर्‍या चढून दुसर्‍या फलाटावर जावे लागते. फलाटावरही टोकाच्या ठिकाणी मुतार्‍या असल्यामुळे कित्येक मिनिटे प्रवाशांना त्रास सहन करत मुतारी गाठण्याचे दिव्य पार पाडावे लागते.

- Advertisement -

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर या पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर मस्जिद बंदर स्टेशनच्या दिशेला एक मुतारी आणि शौचालय होते. मात्र फुटओव्हर्स ब्रिज बांधण्याच्या कामात ही मुतारी आणि शौचालय तोडण्यात आली. त्यामुळे लोकल प्रवाशांसाठी फक्त एकच मुतारी उरली आहे. रोजच्या लाखो प्रवाशांचा भार या एका मुतारीवर पडत आहे. नुकतेच मध्य रेल्वेकडून मोठा गाजवाजा करून मुख्यालयाजवळच्या एका मुतारीचे नूतनीकरण करण्यात आले. या वातानुकूलित मुतारीत एकूण ६० कंपार्टमेंट आहेत. त्यापैकी एकीकडे ४६ मुतारी कंपार्टमेंट तर दुसर्‍या बाजूला १४ असे एकूण ६० मुतारी कंपार्टमेंट आहेत. या मुतारीत संगीत आणि एसी सुविधा मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सोबतच ही मुतारी निःशुल्क आहे. लांब पल्ल्याचे प्रवासीही या मुतारीचा उपयोग करतात. त्यामुळे गर्दी अधिक वाढते.

लाखो प्रवाशांचा बोजा

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकांवरील सब-अर्बन सेक्शनला फक्त ही एकच मुतारी असल्याने २ लाख प्रवाशांचा बोजा या मुतारीवर पडत आहे. पुरुष प्रवाशांपेक्षा महिला प्रवाशांना मोठी कुचंबणा सहन करावी लागते. याबाबत दैनिक ‘आपलं महानगर’ने माहिती घेतली असता. असे निदर्शनास आले की सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत या मुतारीत एका तासात ३ हजार ८६४ प्रवासी येतात. तर गर्दी नसते त्या वेळेत २ हजार ६२८ प्रवासी या मुतारीच्या उपयोग करतात. सकाळी ८ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत एकूण १० तासांत ३८ हजार ६४० इतके प्रवासी या वातानुकूलित मुतारीचा उपयोग करतात. बाकी उरलेल्या तासांत जेव्हा गर्दी नसते तेव्हा १८ हजार ३९६ इतके प्रवासी या मुतारीच्या उपयोग करतात. हा आकडा ५७ हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा मध्य रेल्वेसाठी हा एक गंभीर विषय आहे.

लघुशंका रोखल्याने युरिनर इन्फेक्शनचा धोका

मुंबईची लोकसंख्या मोठी आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील स्थानकांत महिलांसाठी केवळ 30 टक्के प्रसाधनगृहे आहेत. यातील सुस्थितीत असलेली प्रसाधनगृहे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच आहेत. सोबतच मध्य रेल्वेच्या मुख्यालय असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी एकच मुतारी असल्याने रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूत्रमार्गाच्या रोगांचा (युरिनर इन्फेक्शन) संसर्ग होतो. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सहापट अधिक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून मुतारींची संख्या वाढविण्यात येण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर असलेल्या मुतारीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. ज्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून मुतारी वातानुकूलित केल्या आहेत. सोबत त्यातील नियमित स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही काळजी घेत असतो. मध्य रेल्वेकडून नेहमी प्रवाशांच्या सुविधेसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातात.

– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एक मुतारी असल्यामुळे गर्दीमुळे महिलांना उपयोग होत नाही. त्यामुळे घरातून निघाल्यावर वाटेत लघुशंकेला जावे लागू नये, म्हणून पाणी किंवा द्रव पदार्थ पिण्याचे महिला टाळतात. शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे महिलांना विविध आजारांना समोरे जावे लागते. रेल्वेने यात लक्ष घालून प्रत्येक स्थानकांवर स्वच्छ शौचालये आणि स्वच्छ मुतार्‍यांची व्यवस्था करावी.

– हर्षा शहा, अध्यक्षा, मध्य रेल्वे प्रवासी ग्रुप

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -