घरमुंबईमुजोरगिरीचा मीटर डाऊन

मुजोरगिरीचा मीटर डाऊन

Subscribe

उपनगरातील रिक्षाचालकांच्या मुजोरगिरीचा अनुभव आला नसेल असा एकही प्रवासी नसेल. रिक्षाचालकाने भाडे नाकारणे, प्रवाशांनी हात दाखवूनही न थांबवणे, शेअर रिक्षासाठी प्रवाशांवर सक्ती करणे अशी अनेक उदाहरणे देता येतील. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रिक्षा लावण्यास परवानगी असतानाही कुठेही रिक्षा लावून वाहतूक कोंडी निर्माण करणे अशा अनेक कारणांमुळे प्रवासी आणि नागरिक हवालदिल झालेले आहेत. मुजोरगिरीचा मीटर डाऊन करून रिक्षाचालकांची दादागिरी सुरू आहे, त्यावर यामाध्यमातून टाकलेला हा प्रकाशझोत.

मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालक आणि खासगी वाहनांच्या बेशिस्तीने प्रचंड गोंधळ उडू लागला असून, प्रवासी गर्दीच्या वेळी स्थानकातून बाहेर पडणेही प्रवाशांना कठीण होऊ लागले आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी पटकावण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालक अधिकृत थांबा सोडून कुठेही रिक्षा उभी करू लागले आहेत. त्यातच खासगी वाहनेही स्थानकाच्या दारापर्यंत येऊन उभी राहू लागली आहेत. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांतून वृत्त येताच स्थानक परिसरात महापालिका आणि पोलिसांची कारवाई होते. मात्र, ते काही दिवासांपूरतीच, नंतर परिस्थिती जैसे थे असते.

- Advertisement -

नियमित लक्ष नसल्याने या रिक्षावाल्यांच्या बेशिस्तीला धाकच उरलेला नाही. परवाना नसणे, गणवेश नसणे, बॅच नसणे , स्टँड सोडून दुसरीकडे उभे राहणे तसेच जास्त दर आकारणे अशा प्रकारे रिक्षाचालकांकडून सर्रास कायद्याचे उल्लंघन होत असते. मात्र, वाहतूक पोलीस यावर अंकुश लावण्यास असमर्थ ठरत आहेत. वाहतूक कोंडी, रिक्षाचालक आणि खासगी बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याविरोधात तक्रार केल्यास उलट रिक्षाचालक मुजोरी करतात. या संबंधित प्रवाशांकडून तक्रारीसुद्धा करण्यात येत आहेत. मात्र, या तक्रारींवर पोलीस काही कारवाई करताना दिसत नाहीत.

रहिवाशांची वाट अडवतात रिक्षावाले
रिक्षाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. शहरातील चौकाचौकांत रस्ते अडवून अनधिकृत थांबे तयार करण्यात आले आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरातील कोंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील अधिकृत रिक्षा थांबा सोडून रिक्षाचालक कुठेही रिक्षा उभ्या करू लागले आहेत. सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतचा पदपथ फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापला आहे, तर रस्त्यावर रिक्षांची गर्दी होते. कुठेही उभ्या करण्यात आलेल्या रिक्षांतून वाट काढत प्रवाशांना स्थानकात प्रवेश करावा लागतो. सकाळी कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांची घाई असतेच. अशातच रिक्षाचालकांनी वाट अडवल्याने या रस्त्यावरून चालणे कठीण होत असते. अनेकदा रिक्षाचालक कोणत्याही पद्धतीने रिक्षा चालवीत असल्याने भीतीनेच प्रवास करावा लागतो, अशी भीतीच प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येते.

- Advertisement -

======================
मुंबईतील रिक्षा-टॅक्सीची संख्या
————————————-
रिक्षा- १ लाख आठ हजार
सध्याचे भाडे-१८ रु.- मागणी २१ रु.

भांडुपमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी
भांडुप येथील रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील सह्याद्री नगर, कोकण नगर, गाढव नाका या ठिकाणी शेअर रिक्षा आहेत, पण स्टेशनवरून पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी रिक्षा मिळणे फार अवघड असते. सायंकाळी 6 नंतर रिक्षासाठी भली मोठी रांग असते. अर्धा तासापेक्षाही अधिक तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने रिक्षावाल्यांचे चांगलेच फावते. रात्रीच्या वेळी तर नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी तर एकही रिक्षावाला तयार होत नाही. त्यामुळे महिलांना रात्री घर गाठणे मुश्कील होते. भांडुप स्टेशनला जाण्यासाठी सह्याद्री नगर नाक्यावरून स्वतंत्र रिक्षा केल्यास एक तर रिक्षावाले नकार देतात किंवा शेअरचे भाड़े द्या, तरच जातो, अशी अट घालून प्रवाशांची अडवणूक करतात. शेअर भाड़े 30 रु. मिळते आणि तेच जर प्रायव्हेट रिक्षा नेल्यास रिक्षावाल्यांना मीटर भाडेे 20 रुपये मिळते. त्यामुळेच रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे येथील नागरिक हवालदिल झालेले आहेत.

बोरिवलीत लांब पल्ल्याच्या प्रवाशांची लूट
बोरिवली पूर्वला दहिसरच्या बाजूने आंबावाडीला जाण्यासाठी असलेल्या रिक्षा स्टँडवर नेहमीच गर्दी असते. येथून आंबावाडीला जाणार्‍या रिक्षांमध्ये एका वेळी 5-6 प्रवासी भरलेले असतात. अनेक रिक्षावाल्यांचे गणवेश नसतात. शिवाय त्या ठिकाणी रिक्षावाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते. लांब पल्ल्याच्या ट्रेन्समधून उतरलेल्या प्रवाशांकडून हे रिक्षावाले दुप्पट तिप्पट भाडे आकारतात. इतकेच नव्हे तर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी रिक्षावाले सर्रास भाडे नाकारतात. त्यामूळे सर्वसामान्यांना सकाळी कामावर जाण्यास उशीर होण्याच्या अनेक तक्रारी आहेत.

मुंबई उपनगरात अनधिकृत रिक्षा स्टँडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, उपनगरातील रेल्वे स्थानक परिसर, बाजार, तसेच गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, अधिकृत रिक्षा स्टँडलादेखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात, त्या ठिकाणी हमखास या रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत रिक्षा स्टँड सुरू आहे. वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या पोलीस बिट चौकी अधिकार्‍याला चिरीमिरी देऊन रिक्षाचालक हे अनधिकृत रिक्षा स्टँड चालवतात.

कुर्ला पूर्व आणि पश्चिम हा परिसर नेहमी गजबलेला असतो. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाण्यासाठी प्रवासी कुर्ला पूर्व येथे उतरतात, जवळ बॅग व इतर सामान असल्यामुळे रिक्षाने जाण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन तेथून रिक्षाने प्रवास करावा लागतो. कुर्ला पूर्व या ठिकाणी एक अधिकृत रिक्षा स्टँड आहे. दुसरा अनधिकृत रिक्षा स्टँड आहे. अनधिकृत रिक्षा स्टँड हा स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पोलीस बिटला खेटूनच आहे. येथील बिट अधिकार्‍याला तसेच तेथील अंमलदार, वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देऊन चालवला जातो. पोलिसांना चिरीमिरी दिल्यानंतर जणू प्रवाशांना लुटण्याचा परवानाच या रिक्षाचालकांना प्राप्त होतो, असे त्यांना वाटते, त्यामुळेच रिक्षाचालक आपली मनमानी करीत असतात.

कुर्ला पश्चिम
कुर्ला पश्चिम येथून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कलीना मुंबई विद्यापीठ येथे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. येथून बेस्ट बसची सुविधा असली तरी ती सकाळ आणि संध्याकाळी कमी पडते, त्यामुळे या परिसरात रिक्षाचालकांचे चांगलेच फावते. कुर्ला पश्चिम राम महाल हॉटेल येथून ते भारत सिनेमागृहपर्यंत रिक्षाची मोठी रांग असते. तेथेच त्यांनी अनधिकृत स्टँड तयार केले आहे,

अनधिकृत रिक्षा स्टँडला पोलिसांच्या आशीर्वाद
राजू जाधव पोलीस चौकीसमोर अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड तेथील पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरू आहे, येथील बिट अधिकार्‍याला प्रत्येकी रिक्षा २० रुपये प्रमाणे पैसे जमा करून दिले जातात. त्यामुळे या अनधिकृत रिक्षाचालकांची आपली मनमानी सुरू होते. या बिट चौकीत तक्रार करण्यासाठी आलेल्या प्रवाशाला हे आमचे काम नाही तुम्ही वाहतूक पोलिसांकडे तक्रार करा, असे उत्तर बिट अधिकार्‍याकडून दिले जात असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे.

कांदिवली
कांदिवली पूर्वेकडील या रिक्षा स्टॅण्डला वाहतूक पोलिसांनी हद्द बांधून दिली आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन करून नेहमीच हे रिक्षावाले आपली वाहने पुढे आणून मागाठाणे, ठाकूर व्हीलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स, हनुमान नगर, वडारपाडा या ठिकाणी चालत जाणार्‍या रेल्वे प्रवाशांना अडथळा आणून वाहतूक कोंडी करतात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर या परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही नवख्या प्रवाशांची लूट होतच असते.

नालासोपारा
नालासोपारा पश्चिम बाजूला एस.टी.स्टॅण्ड ते हनुमान नगर आणि रेल्वे स्थानक ते सोपारा गाव, फनफिस्टा आदी ठिकाणी जाण्यासाठी अधिकृत शेअर रिक्षा स्टॅण्ड आहेत, परंतु रेल्वे स्थानकातून सोपारा गाव येथे जाण्यासाठी अधिकृत स्टॅण्ड असतानाही काही मुजोर रिक्षाचालक अनधिकृतपणे प्रवासी भरत असतात. त्यामुळे बर्‍याचवेळा नियमानुसार शेअर रिक्षांचा व्यवसाय करणार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे रात्री ९ नंतर तर वाहनाचा परवाना नसलेले चालक रिक्षा चालवत असतात. नालासोपारा पश्चिम येथे एस.टी. स्टॅण्डमध्ये कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. तरीही काही ठरावीक रिक्षाचालक एस.टी.स्टॅण्डमध्ये रिक्षा उभी करून येणार्‍या प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून त्यांची लूट करतात. मात्र, याची दखल घेून एस.टी. स्टॅण्ड परिसरात प्रवेश नाकारल्यानंतर त्याच्या हद्दीवरच वेड्या वाकड्या रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे घाईघाईत रेल्वे स्थानकावर पोहोचून गाडी पकडणार्‍या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. नालासोपारा पूर्व येथे शिर्डी नगर, संतोष भूवनसह अगरवाल आदी ठिकाणी जाणार्‍या शेअर रिक्षांना मान्यता नसतानाही सरसकट सर्वच रिक्षा शेअर रिक्षाचा व्यवसाय करताना दिसत आहेत.

रेल्वे स्थानकावरून बाहेर पडलेल्या प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचविण्याचे काम मुंबईतील रिक्षाचालक करतात. मात्र, सरकार आणि महापालिका रिक्षाचालकांसाठी पाहिजे त्या सोई सुविधा उपलब्ध करून देत नाही. कित्येक रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षावाल्यांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे रिक्षावाल्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियम फक्त रिक्षाचालकांसाठी आहेत का? नियमानुसार महापालिका आणि राज्य सरकारने रिक्षाचालकांना सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यायला हवी.
के. के. तिवारी – अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा संघटना

भांडुपमध्ये वाहतूक पोलीस, वाहतूक नियम असे काहीही नसल्याने रिक्षावाल्यांच्या मुजोरीला सामोरे जावे लागत आहे. स्टेशन येथील रिक्षा स्टँडला वाहतूक पोलीस अथवा शहर पोलीस तैनात केल्यास रिक्षाचालकांची मुजोरी कमी होऊन, प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळेल.
– स्मिता परब, भांडुप

रिक्षावाल्यांच्या मुजोरीचा प्रश्न गंभीर असून, तो संपूर्ण उपनगरात दिसून येतो. याचा अर्थ सगळेच रिक्षावाले मुजोर आहेत असाही नाही. रिक्षवाल्यांच्या मुजोरीला यूनियन आणि पोलीस जबाबदार आहेत. बोरिवली पूर्व येथे रिक्षावाले भाडे नाकारतात म्हणून अनेक वेळा पोलिसांच्या twitter किंवा whatsapp वर तक्रार करूनही त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही.
– संजय पाटील, बोरिवली

संकलन : सचिन धानजी, विनायक डिगे, नितीन बिनेकर, संदीप टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -