बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरू – संजय राऊत

sanjay raut
संजय राऊत

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपप्रणीत एनडीए पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत होतं. त्यासंदर्भात मुंबईत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या १५ वर्षांपासून बिहारमध्ये जंगलराज सुरू होतं. आता जंगलराज संपून बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगलराज सुरू होणार आहे. बिहारच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत आहेत’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यासोबतच, बिहार निवडणुकांचे देशाच्या राजकारणावर परिणाम जाणवतील, असं देखील संजय राऊत म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी ३ टप्प्यांमध्ये मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली आहे. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीचं सरकार यावेळी जिंकू शकणार नाही, अशी चर्चा केली जात होती. सुरुवातीचे कल तशाच प्रकारचे दिसू लागल्यामुळे संजय राऊत यांनी त्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू व्हायला हरकत नाही. बिहारचा प्रचार पंतप्रधान मोदी, नितीश कुमार यांच्या जंगलराजभोवती फिरत होता. दुपारी १२ नंतर लोकं जंगलराज विसरले असतील आणि मंगलराज सुरू झालं असेल. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचं तेज दिसेल. त्यांच्यापुढे पंतप्रधान, भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री निष्प्रभ ठरतील. तेजस्वी यादव यांची वाटचाल येणाऱ्या काळासाठी चांगले संकेत आहेत. आज बिहारमधले लोकं जंगलराज संपवून तेजस्वी यांच्या नेतृत्वात मंगलराज सुरू करत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘बिहारच्या राजकारणाचा निकाल काहीही लागो. पण या निवडणुकांचा देशाच्या राजकारणावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकांमध्ये रोजगार, विकासाचा मुद्दा यायला हवा होता. पण ते मुद्दे न आणता १५ वर्ष राजकारण केलं. त्यामुळे लोकांनी हे राजकारण नाकारलं आहे’, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.