घरमुंबईविद्यापीठात सापांची दहशत

विद्यापीठात सापांची दहशत

Subscribe

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता कलिना कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसमोर नवी अडचण उभी राहिली आहे. कलिना कॅम्पसमधील रस्त्यांवर सापांचे दर्शन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून तेथून प्रवास करावा लागत आहे.

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता कलिना कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसमोर नवी अडचण उभी राहिली आहे. कलिना कॅम्पसमधील रस्त्यांवर सापांचे दर्शन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून तेथून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही आठवड्यापासून परिसरात साप दिसत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात पाऊले उचलावीत, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

मुंबई विद्यापीठाचे फोर्ट आणि कलिना या दोन ठिकाणी कॅम्पस आहेत. फोर्ट येथून प्रशासकीय कामांचा गाडा हाकला जात असताना विविध अभ्यासक्रम, आयडॉल, परीक्षा भवन आणि इतर सगळी कामे ही कलिना कॅम्पस येथून होतात. कलिना कॅम्पस येथे दररोज हजारो विद्यार्थी भेट देत असतात. सुमारे २४२ एकर जागेवर हा परिसर वसलेला असून याठिकाणी पूर्वी दलदलीचा भाग होता. याठिकाणी सुमारे ४० हून अधिक इमारती असून इतर भागांत गवत आणि पूर्वी हा भाग स्नेक रिझर्व्ह भाग म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर आता या ठिकाणी कॅम्पस उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॅम्पसमध्ये साप फिरत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कॅम्पसच्या प्रवेशद्वाराजवळच साप दिसून येत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. तर परीक्षा भवनाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे, त्या ठिकाणी देखील साप येत असल्याची माहिती विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी दिली. यात प्रामुख्याने धामण, पायथन, वायपर, कोब्रा आणि हरणटोळ सारख्या सापांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅम्पसमध्ये फिरताना हे साप रस्त्याच्या मध्येच येत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. अद्याप तरी यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात आणि ऑक्टोबरच्या काळात विद्यापीठात साप दिसत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येते. गेल्या काही दिवसात प्रत्येक आठवड्यात एक तक्रार समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर कर्मचार्‍यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच विद्यापीठातील अनेक रस्ते हे ओबडधोबड असल्याने त्याचा फटका कर्मचार्‍यांना बसत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. अनेकवेळा रात्री उशीरा कॅम्पसमध्ये साप दिसत असल्याचे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांकडून सर्पमित्रांची मदत घेतली जात असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आली आहे. हे साप पकडून विद्यापीठाच्या कॅम्पसच्या मागील बाजूस असणार्‍या खाडीच्या भागात सोडून दिले जात असल्याची माहिती ही यावेळी पुढे आली आहे. दरम्यान, याबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे साप दिसत असल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यापीठाने योग्य ती पाऊले उचलण्याची गरज असून विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात लवकरच आपण कुलगुरुंची भेट घेणार असून यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी आम्ही करणार आहोत.
– सुधाकार तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -