सानुग्रह अनुदान देण्याचे कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट’ गाजर

कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी सानुग्रह अनुदान देण्याआधी बेस्ट समितीची मंजुरी बंधनकारक असून आचारसंहितेच्या कचाट्यात बेस्ट समितीची मंजुरी अडकली आहे.

Mumbai
best-buses

विधानसभा निवडणुकी पूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना ९ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे बेस्ट प्रशासनाने जाहीर केले. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू होईल, याची कल्पना बेस्ट प्रशासनाला असतानाही सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करत बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना गाजर दाखवले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी सानुग्रह अनुदान देण्याआधी बेस्ट समितीची मंजुरी बंधनकारक असून आचारसंहितेच्या कचाट्यात बेस्ट समितीची मंजुरी अडकली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जाहीर केलेले ५ हजार ५०० रुपयांचा सानुग्रह अनुदान कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सानुग्रह अनुदान दिवाळीनंतर तरी मिळेल का?

तिकीट कपातीनंतर बेस्ट प्रवाशांचे ‘अच्छे’दिन आल्याचे सध्या तरी दिसत आहे. पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही सुविधा देण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असे वाटतं होते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने बेस्ट समितीची मंजुरी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान दिवाळीनंतर तरी मिळेल का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बेस्टचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर

सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांना सन २०२०-२१ चा सिलबंद अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेमुळे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासी, कर्मचाऱ्यांसाठी कुठल्या योजना राबवणार? हे स्पष्ट झाले नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर बेस्टचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. दरम्यान, आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सन २०१९-२० चा ७६९ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाच्या सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प किती तुटीचा? प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना काय मिळणार? याचा उलगडा आचारसंहिता संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here