मृत्यूचे क्रॉसिंग

प्रवास अनिश्चिततेचा....मुंबईची वाहिनी ते विद्युतदाहिनी, पाच वर्षांत लोकल अपघातात १५८९७ प्रवाशांचा बळी , १६ हजार ७०५ जखमी

Mumbai

धावती लोकल पकडू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका, फूटबोर्डवर उभे राहू नका, असे आवाहन रेल्वेकडून वारंवार केले जावून सुद्धा प्रवासी याकडे दुर्लक्षच करत असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे २०१४ पासून ते २०१८ या पाच वर्षांच्या काळात पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर १५ हजार ८९७ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर १० हजार ३८३ तर पश्चिम रेल्वेवर ५,५१४ प्रवाशांना जीव गेला आहे.

सातत्याने जनजागृती करूनही रेल्वे प्रवाशांच्या अपघाताचा आकडा वाढत जात आहे. याकडे पाहून मुंबईची ‘लाइफलाइन’ अशी ओळख असणारी लोकल रेल्वे प्रवाशांसाठी आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसत आहे. हे सांगण्यामागचे कारण असे की, पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर २०१५ पासून ते २०१८ पर्यंत रेल्वे अपघातात १५ हजार ८९७ प्रवाशांचा मृत्यू आणि १६ हजार ७०५ प्रवाशी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील सर्वाधिक अपघात कल्याण रेल्वे स्थानकावर झाले आहेत. ज्यामध्ये १८६५ प्रवाशांचा बळी गेला आहे तर जखमींमध्ये एक हजार ५१२ आहेत. याच बरोबर कुर्ला १७५०, वाशी ८७१, वडाळा, ७७२ आणि ठाणे १३८० इतक्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


लोकल क्षमता वाढवणे गरजेचे
पूर्वी रेल्वे प्रशासनाकडून ९ डब्यांची लोकल होती. आता १२ डबे आणि १५ डब्यांची लोकल चालविली जात आहे. मात्र लोकल प्रवाशांच्या वाढत्या संख्येवर उपाय म्हणून १५ डब्यांच्या लोकल संख्येत वाढ करणे गरजेचे आहेत.आज १२ डब्यांच्या लोकलची क्षमता ११७२ प्रवाशांची आहे. मात्र उभे राहून २५०० प्रवासी जातात मात्र पीक अवर्समध्ये या लोकल मधून जवळ -जवळ ५ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे चालत्या लोकलमधून पडणार्‍यांची संख्या वाढत जात आहे. इतकेच नव्हे तर लोकलच्या गेटवर गर्दी असल्यामुळे प्रवाशांना बसतेवेळी कित्येक प्रवासी लोकलमधून पडून अपघात होत आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने याबद्दल दखल घेत लोकल गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. जेणेकरून अशा दुर्घटना घटतील.

बाहेरून येणारे लोंढे

मुंबई उपनगरीय रेल्वे हे झटपट प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे रस्ते प्रवास करण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रवासी लोकलची निवड करतात. परंतु, या प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होत आहे. त्यातच बाहेरून येणारे लोंढे, तसेच स्वस्तात मिळणारी घरे यामुळे उपनगराकडे राहण्याचा ओढा वाढत आहे. त्यामुळे उपनगराकडून शहराकडे लोकलने प्रवास करण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सीएसएमटीकडे प्रवास करताना आणि जाताना लोकल गाड्यांना अधिक गर्दी होते व हा प्रवास गर्दीच्या वेळी फारच जीवघेणा ठरतो. त्यामुळे राज्य सरकारने बाहेरू येणार्‍या लोंढ्यांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

आता मध्य रेल्वेची प्रवासी संख्या वाढली आहे. दररोज उपनगरीय लोकलच्या माध्यमातून 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे मध्य रेल्वेचे आहेत. २०१५-१६ मध्ये दररोज मध्य रेल्वे लोकलने ४० लाख २७ हजार प्रवासी प्रवास करत होते. हीच प्रवासी संख्या २०१८-१९ मध्ये दर दिवशी ४४ लाख ३० हजार एवढी झाली. तुलनेने प्रवासी संख्येत चार लाखांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, दिवा या स्थानकांच्या प्रवाशांत वाढच होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवणे मध्य रेल्वेसाठी डोके दुखी ठरली आहे.

ठाणे-डोंबिवली स्थानकांवर गर्दी वाढली

मध्य रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी ठाणे रेल्वे स्थानक महत्वाचे आहेत. २०१७-१८ मध्ये या ठाणे स्थानकातून दर दिवशी २ लाख ६२ हजार ४०९ प्रवासी प्रवास करत होते. हीच संख्या २०१८-१९ मध्ये वाढून २ लाख ७८ हजार ६११ एवढी झाली. तसेच डोंबिवली स्थानकातूनही प्रवास करताना प्रवाशांना नाकीनऊ येतात. या स्थानकातून दररोज २ लाख ५१ हजार ९१८ प्रवासी प्रवास करत असताना त्यात आता वाढ होऊन २ लाख ६४ हजार ८५१ पर्यंत पोहोचली आहे. हे पाहिल्यास ठाणे व डोंबिवलीतील प्रवाशांत पाच ते सहा टक्के वाढ झाली आहे.

तुलनेने लोकल फेर्‍या कमी

चार वर्षांत प्रवासी मध्य रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या वाढली तरी तुलनेने लोकल फेर्‍यांत मात्र वाढ झालेली नाही. प्रकल्पांसाठी जागा मिळण्यास अडचणी, प्रकल्पाला लागणारे विलंब, निधीची कमतरता यामुळे नवीन मार्ग बनले नाहीत. यात खास करून महत्त्वाचा ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग गेले काही वर्षे रखडल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळत नाही. त्यामुळे जलद लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडतो. हा मार्ग झाला असता तर ठाणे ते कल्याणपर्यंत लोकल फेर्‍याही वाढल्या असत्या, असे सूत्रांनी सांगितले. परिणामी मध्य रेल्वेवरील एकूण लोकल फेर्‍यांत फारशी वाढ झाली नाही. चार वर्षांत चार लाख प्रवाशांच्या तुलनेत केवळ ११४ लोकल फेर्‍या वाढलेल्या आहेत.

भारतीय रेल्वे गंभीर नाही ?

मुंबईची उपनगरीय लोकल सेवा म्हणजे मुंबईची लाईफ लाइन. दररोज 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात. मुंबईतील रेल्वेगाड्यांमध्ये बरेच गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यांतून पडून रेल्वे, रेल्वे रुड क्रॉस करताना मरतात. भारतीय रेल्वेला मुंबईतील सर्वात महसूल प्राप्त होतात तरीसुद्धा भारतीय रेल मुंबईकरांचा सुरक्षेसाठी गंभीर नाही, कारण मुंबईत रेल्वे अपघातात 2017 सालाप्रमाणे 2018 सालामध्ये काही विशेष बदल झाले नाहीत. जानेवारी 2018 पासून डिसेंबर 2018 पर्यंत मुंबई रेल पटरीवर 2981 प्रवाशांना आपले जीव गमावले आहेत. तसेच 3349 प्रवासी जखमी झाल्याची माहिती, माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त झाली आहे.

————————-
२०१४-२०१८ ची आकडेवारी
————————-
मध्य रेल्वे मृत्यू जखमी
२०१४ २२२१ २०६२
२०१५ २१८७ २१००
२०१६ २११४ १८५६
२०१७ १९२८ १८०५
२०१८ १९३३ १९२०
————————–
एकूण १०३८३ ९,७४३
—————————

पश्चिम रेल्वे मृत्यू जखमी
२०१४ १२०२ १२३७
२०१५ १११७ १२४९
२०१६ १०८८ १५०७
२०१७ १०८६ १५४०
२०१८ १०४८ १४२९
———————–
एकूण ५,५१४ ६९६२
———————–

मध्य आणि पश्चिम
———————

एकूण मृत्यू = १५८९७
एकूण जखमी = १६७०५
———————–

मध्य आणि पश्चिम रेल्वे
———————–
वर्ष मृत्यू जखमी
२०१४ 3423 3299
२०१५ 3304 3349
२०१६ 3202 3363
२०१७ 3014 3345
२०१८ 2981 3349
———————–

सर्वाधिक मृत्यू
————————
२०१४- २०१८(जुलै) मृत्यू
————————
कल्याण = १८६५
कुर्ला = १७५०
वाशी = ८७१
वडाला = ७७२
ठाणे = १३८०

कोणत्या कारणाने किती मृत्यू आणि जखमी

* रेल्वे रुळ ओलांडताना 1619 प्रवाशांचा मृत्यू, 323 जखमी.

* चालत्या गाडीतून पडून 711 प्रवाशांची मृत्यू, 1584 जखमी.
* खांबाचा फटका लागून 19 प्रवाशांची मृत्यू, 90 जखमी.

* प्लॅटफार्मवर पडून लागून 6 प्रवाशांचा मृत्यू, 8 जखमी.

* वीजेचा शॉक लागून 22 प्रवाशांचा मृत्यू, 25 जखमी.

* आत्महत्या करून 35 प्रवाशांचा मृत्यू.

* नैसर्गिक मृत्यू 522 प्रवाशांचा मृत्यू, 617 जखमी.

* अन्य कारणाने 29 प्रवाशांचा मृत्यू, 702 जखमी.

* अज्ञात कारणाने 18 प्रवाशांचा मृत्यू.

दर दिवशीच्या लोकल फेर्‍या
२०१५-१६ १,६६०
२०१६-१७ १,६६०
२०१७-१८ १,७०२
२०१८-१९ १,७७४

मध्य रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या

वर्ष -प्रवासी संख्या
२०१५-१६ -४० लाख २७ हजार
२०१६-१७ -४१ लाख ८० हजार
२०१७-१८ -४२ लाख ३९ हजार
२०१८-१९ -४४ लाख ३० हजार

पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवासी संख्या
वर्ष -प्रवासी संख्या
२०१५-१५ -३४ लाख ३४ हजार
२०१६-१७ -३५ लाख १९ हजार
२०१७-१८ -३५ लाख ५० हजार
२०१८-१९ -३५ लाख ८८ हजार

रेल्वे प्रशासनाने अपघात लक्षात घेता मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्यात यावी. जेणेकरून पीक अवर्समध्ये प्रवाशांना अपघात होणार नाही. आज लोकलच्या गर्दीमुळे चालत्या लोकलमधून पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी रेल्वे विभागाने लवकरात- लवकर उपाय योजना करण्यात यावी. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेची आहे. -समीर झवेरी ,आरटीआय कार्यकर्ता 

रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी ओव्हरब्रीजचा वापर करणे सुरक्षित असते. पण, त्याचे पालन होत नाही. अशा पद्धतीने धोकादायक रुळ ओलांडणे सुरूच असते. अशा नागरिकांवर कारवाई केली की, रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार तात्पुरते थांबतात आणि पुन्हा सुरू होतात. नागरिकांनी किमान स्वतःचा तरी विचार करावा. – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे लक्ष दिले जात नाही. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजून किती प्रवाशांचा जीव गेल्यावर रेल्वे प्रशासन लक्ष देणार.तसेच रेल्वे मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शकील अहमद शेख, आरटीआय कार्यकर्ता 

मध्य रेल्वेकडून सातत्याने प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असतो. विविध माध्यमांचा वापर करत मध्य रेल्वेकडून मुंबईकरांमध्ये याबाबतीत जागृत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होत असतो. प्रवाशांनी रेल्वे ओव्हरब्रीज आणि ऍक्सिलेटर (स्वयंचलित जीना)वापर मोठ्या प्रमाणात करावा, याकरता रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा केल्या जातात. आज त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. – गजानन महतपुरकर – वरिष्ठ जनसंपर्कअधिकारी, पश्चिम रेल्वे

मुंबईतील उपनगरीय गाड्यांच्या दरवाज्यांमध्ये लटकणार्‍या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. जर मेट्रोप्रमाणे दरवाजे बंद होणार्‍या एसीगाड्या सुरू झाल्या तर त्याचा थोडाफार लाभ प्रवाशांना होईल आणि दारात लटकून प्रवास करणार्‍यांची संख्या कमी होऊ शकेल. या सर्व उपाययोजना सरकारने युध्द पातळीवर करणे अपेक्षित आहे. परंतु रोज प्रवास करणारा प्रवासी हा सामान्य प्रवासी असतो आणि त्याच्यासाठी कधीही वेगाने सुविधा उपलब्ध होत नाहीत. हे दुर्दैवी बाब आहे. -गोविंद पाटील, विद्यार्थी

गेल्या काही वर्षांपूर्वी एलफिन्स्टन रोड रेल्वे दुर्घटनेचा प्रकार घडल्यानंतर रेल्वेवरच्या पुलांची दुरुस्ती सुरू झाली. म्हणजे पाच पंचवीस लोकांचे एकाचवेळी बळी गेल्याशिवाय सरकारचे डोके काम करीत नाही. वर्षाकाठी तीन हजार लोकांचे बळी जातात. ही आकडेवारी धक्कादायक ठरते. म्हणूनच याविरुध्द प्रवाशांना संघटितपणे आवाज उठवावा लागेल. रेल्वे प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहेत. -सेजल सावंत, विद्यार्थी

जनजागृतीसाठी रेल्वेचा यमदूत

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे ठरलेली लोकल पकडण्यासाठी अनेकदा धावपळ करताना रेल्वेचा रूळ ओलांडला जातो. यामध्ये हकनाक बळी जाणार्‍या मुंबईकरांची संख्या देखील मोठी आहे. मात्र काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणे हे जीवावर बेतू शकते. हा संदेश देण्यासाठी चक्क पश्चिम रेल्वेने ‘यमदूत’ रेल्वेच्या रूळांवर उतरवला होता.या प्रवाशांना रोखण्यासाठी आरपीएफ जवानांनी यम देवाचा पेहेराव परिधान करून रेल्वे रूळ ओलांडणार्‍यांना उचलून नेत होता. याच्या माध्यमातून ही सवय किती धोकादायक असू शकते हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ही विशेष मोहीम आतापर्यंत माहीम, माटुंगा, दादर, मालाड आणि अंधेरी येथे राबविण्यात आली. त्यामुळे आता आरपीएफकडून रेल्वे रूळ ओलांडण्यार्‍या प्रवाशांना अनोख्या अंदाजात कारवाई केली जात आहे. रेल्वेकडून सांगण्यात आले आहे की, प्रवाशांचा जनजागृती करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्यातील एक भाग म्हणून यम देवाचा पेहेराव परिधान करून यमदूत उतरविला आहे. प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की, प्रवाशांनी रेल्वे ओव्हरब्रीज आणि ऍक्सीलेटर (स्वयंचलित जीना)वापर मोठ्या प्रमाणात करावा, याकरता रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा केल्या जातात.

संकलन  – नितीन बिनेकर