घरमुंबई'प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ईडीच्या चौकशीची कल्पना'

‘प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ईडीच्या चौकशीची कल्पना’

Subscribe

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईडीची नोटीस राज ठाकरेंना येईल, याची कल्पना दिली होती, अशी कबुली मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. नोटीसीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईहून मनसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अशा पद्धतीची नोटीस राज ठाकरेंना येईल, याची कल्पना दिली होती, अशी कबुली मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आज, मंगळवारी राजगडावर पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज ठाखरेंना नोटीस येणार हे आधीच प्रकाश आंबेडकरांना माहिती होते, असे त्यातून स्पष्ट होते.

असा झाला आंबेडकरांशी संवाद

बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे १० दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना फोन करून राज ठाकरे यांच्या विरोधात ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांच्याविरोधातील ईडीच्या नोटीसीवर सही झाली असल्याचे त्यांनी म्हटले. ही माहिती आपण राज ठाकरेंना दिली असल्याचेही बाळा नांदगावकर यावेळी सुचकपणे म्हणाले. राज ठाकरे यांनी ईव्हीएम घोटाळ्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून लवकरच त्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे भाजप सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करेल, असे प्रकाश आंबेडकरांनी सुचवले होते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अखेरर ईडी कडून नोटीस मिळाली. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणी ही नोटीस देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पुढाकारने ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर निवडणूक घ्यावी यासाठी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत “मला अजूनतरी ईडीकडून हॅलो आलेले नाही” असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप आता मनसेच्यावतीने होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -