घरमुंबईवाऱ्याने उन्मळून पडलेली कुलाबा गार्डनमधील झाडे जिवंतच!

वाऱ्याने उन्मळून पडलेली कुलाबा गार्डनमधील झाडे जिवंतच!

Subscribe

मुंबईत मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसात कुलाब्यातील बीपीटी उद्यानातील झाडे उन्मळून पडली. मात्र, उन्मळून पडलेली ही झाडे आजही जिवंत आहेत. एका बाजूला वृक्ष प्राधिकरण अनेक झाडे कापण्यास तसेच पुनर्रोपित करण्यास परवानगी देत एकप्रकारे झाडांची कत्तल करत आहेत, परंतु दुसरीकडे मोकळ्या जागेत उन्मळून पडलेली लाल मातीतील जिवंत झाडे पुन्हा खड्डा खणून लावल्यास जगू शकतात, तरीही त्यासाठी कोणत्याही प्रकारे पुढाकार घेताना दिसत नाही.

मुंबईत पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. तसेच अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. आतापर्यंत या पावसाळ्यात ५ ते ६ हजार पेक्षा अधिक झाडे पडली आहेत. एकाबाजूला विकास कामांच्या नावाखाली हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते, तिथेच पावसाळ्याच्या पूर्वी अनेक झाडांच्या धोकादायक फांद्या छाटूनही पावसाळ्यात पडझड सुरूच आहे. मागील आठवड्यात कुलाबा येथील बीपीटी उद्यानात अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली. विशेष म्हणजे उन्मळून पडलेली झाडे मृत पावतात. पण या उद्यानातील ही पडलेली झाडे आजही जिवंत अवस्थेत आहेत. या उद्यानातील ३ ते ४ झाडे अशाप्रकारे पडलेली आहेत.

- Advertisement -

या उद्यानात लाल माती असल्याने त्या पडलेल्या झाडामधील जिवंतपणा टिकून आहे. परंतु बीपीटी प्राधिकरण त्याकडे लक्ष देत नसून त्यांचे योग्य वेळेस पुनर्रोपण न केल्यास उन्मळून पडूनही जिवंत असणारी ही झाडे मृत पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वृक्ष प्रेमींनी ही सर्व झाडे पुनररोपित करावी आणि त्या झाडांना जीवनदान द्यावे अशी मागणी उद्यान विभागाकडे करत बीपीटी प्राधिकरणाला याबाबत निर्देश देण्याच्या सूचना केल्या. परंतु वृक्ष प्राधिकरणही या बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

रस्त्याच्या कडेला असणारे झाड उन्मळून पडल्यास ते पुनररोपित करता येत नाही. परंतु बीपीटीच्या मैदानातील जी झाडे वादळामुळे उन्मळून पडली, त्याभोवती पूर्ण लाल माती आहे. त्यामुळे ही झाडे पडून अनेक दिवस लोटल्यानंतरही ती जिवंत आहेत. ही बाब लक्षात घेऊन उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना मेलद्वारे पत्र पाठवले आहे. परंतु त्यांच्याकडून आद्यपही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उद्यानातील ही झाडे असल्याने ती पुन्हा लावली जाऊ शकतात. पण ज्या प्रमाणे उद्यान विभागाचे अधिकारी झाडे कापण्यासाठी जेवढे आग्रही असतात, तेवढे आग्रही दिसून येत नाही.

डॉ. सीमा खोत, वृक्ष प्रेमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -