प्रणव मुखर्जींच्या शोकप्रस्‍तावावेळी मुख्यमंत्र्यांचा भाजपला चिमटा

उद्धव ठाकरेंनी दिला प्रणव मुखर्जींच्या आठवणींना उजाळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राष्‍ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केल्‍याची आठवण प्रणव मुखर्जी यांनी कायम ठेवली. हा त्‍यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाही तर काही जण रात गयी बात गयी, एकदा खुर्चीला चिकटले की मग तुम्‍ही कोण विचारणार? परंतु प्रणवदा तसे नव्हते, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपला काढला.

विधानसभेत आज माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील तसेच माजी सदस्‍यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्‍ताव मांडण्यात आला. तेव्हा प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले. प्रणवदांचे कोणाशीही वैर नव्हते. भाषणबाजीपेक्षा त्‍यांना काम महत्‍वाचे वाटे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रणव मुखर्जींच्या आठवणींना उजाळा

प्रणव मुखर्जी हे अतिशय शांत, संयम स्‍वभावाचे होते. विद्ववत्ता, व्यासंग, हजरजबाबीपणा असे राजकारणात लागणारे सर्व गुण त्‍यांच्याकडे होते. माझी त्‍यांच्यासोबत तीनदा भेट झाली. राष्‍ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ते जेव्हा उभे होते, तेव्हा त्‍यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. शरद पवार देखील त्‍यांच्यासोबत होते. देशहित लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांनी प्रणवदांना पाठिंबा दिला. नंतर राष्‍ट्रपतिपदावर असताना ते मुंबईत आले होते तेव्हा त्‍यांनी मला बोलावणे पाठविले. राजभवनला जाऊन मी त्‍यांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला म्‍हणूनच केवळ मी राष्‍ट्रपतिपदावर विराजमान होऊ शकलो, असे ते मला म्‍हणाले. फार कमी लोक असे लक्षात ठेवतात. नाही तर काही जण रात गयी बात गयी, एकदा का खुर्ची मिळाली, खुर्चीला चिकटले की मग तुम्‍ही कोण? असा त्‍यांचा अविर्भाव असतो, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

दरम्यान, अनिल राठोड, सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्णबाबा पाटील, सुनील शिंदे, शामराव पाटील, सुरेश पाटील, रामरतन राऊत, चंद्रकांता गोयल यांना आज सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.


वीजबिल कमी करा, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा – राज ठाकरे