दुर्दैवी! खड्ड्याने घेतला तरुणीचा जीव

भिवंडी-वाडा रोडवर दुचाकी खड्ड्यात आदळल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे.

Bhiwandi
young girl dies after falling into a pothole in bhiwandi
दुर्दैवी! खड्ड्याने घेतला तरुणीचा जीव

भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड फाटाजवळ अॅक्टिवा दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. डॉ. नेहा आलमगीर शेख (२३ रा. कुडूस, ता. वाडा) असे अपघातात ठार झालेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. ७ नोव्हेंबर रोजी तिचा विवाह होणार होता. त्यामुळे ती मावस भाऊ आणि आत्यासोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी भिवंडीत आली होती. लग्नासाठी कपडे आणि अन्य शृंगाराच्या साहित्याची खरेदी करून ती कुडूस येथील घरी रात्री परतत होती.

मावस भाऊ गंभीर जखमी

त्यावेळी डॉ. नेहा ही मावस भाऊ शाबान खलील शेख (वय २१) याच्या अॅक्टिवा दुचाकीच्या पाठीमागे बसली होती. दुगाड फाट्यापुढील रोडवर असताना दुचाकी खड्ड्यात आदळली त्यावेळी चालक शाबान हा उजवीकडे तर डॉ. नेहा ही रोडवर डाव्या बाजूला खाली पडली. त्याचवेळी हरयाणा पासिंग असलेला कंटेनर पाठीमागून भरधाव वेगात आल्याने ती कंटेनर खाली सापडली. कंटेनरचा टायर डॉ. नेहा हिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मावस भाऊ शाबान हा गंभीर जखमी झाला आहे.

विवाह करण्याचे स्वप्न राहीले अधुरे 

डॉ. नेहा हिचे लग्न सफाळे ता. जि. पालघर येथील डॉ. ताहिर असर याच्याशी ७ नोव्हेंबर रोजी होणार होते. मात्र या घटनेमुळे डॉ. नेहा हिला विवाहाचे स्वप्न अर्ध्यावरच सोडून जगाचा निरोप दावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेख आणि आसर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र आव्हाड करीत आहे.

जोपर्यंत रस्ता दुरुस्त केला जात नाही……..

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी असगर पटेल, अविनाश राऊत, भूषण घोडविंदे, श्रमजीवी टॅक्सी युनियनचे भुषण पाटील, शैलेश पाटील, अल्पेश पाटील, मोहम्मद भाबे आदी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा निषेध करीत अनगाव टोल नाका रात्री १२ वाजता बंद केला. संपूर्ण रस्ता दुरुस्त करा आणि या रस्त्याची ठेकेदार कंपनी सुप्रीम इन्फ्रा.कंपनीचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी श्रमजिवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी केली. जोपर्यंत रस्ता दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत टोल चालू करू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे जाहीर केले आहे.

सामाजिक संस्थेच्या महिलांनी केले ठिय्या आंदोलन 

तसेच गुरुवारी सकाळी जिजाऊ या सामाजिक संस्थेच्या महिलांनी अनगाव येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन करून येथील टोलनाका बंद पाडला तसेच या रस्त्याचा ठेका घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या महिलांनी केली. सुप्रीम कंपनीने रस्त्यातील खड्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी देखील मागणी करण्यात आली. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्या महिलांनी उग्र रूप धारण केल्याने गणेशपुरी पोलीस ठाण्याचे इंचार्ज एपीआय महेश सगडे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे वातावरण शांत झाले आहे.