घरक्रीडा20 साल बाद..!

20 साल बाद..!

Subscribe

भारत- पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज ‘हाय व्होल्टेज’ मुकाबला रंगणार आहे. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टरच्या मैदानावर तब्बल 20 वर्षांनी हे दोन्ही प्रतिस्पर्धी आमने-सामने येत आहेत. आजवर विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सहा मुकाबल्यांमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर आले आहेत. यातील एकही सामना पाकिस्तानला जिंकता आलेला नाही. यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तान आपले अस्तित्व पणाला लावून मैदानात जिंकण्याच्या इर्षेने उतरणार यात शंका नाही. मात्र, आतापर्यंत भारताचा विजयी कारकिर्दीचा आलेख पाहता पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे फार मोठे आव्हान ठरेल.

1999च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध या मैदानावर सामना खेळला होता. यात दमदार प्रदर्शन करीत भारताने पाकवर विजय मिळवला होता. 1975 आणि 1979 च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सपाटून पराभवांचा सामना करणार्‍या भारतीय संघाने 1983 च्या विश्वचषकात मात्र वेस्ट इंडिजला धूळ चारत पहिला विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत पाकिस्तानने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यानंतर 1987 च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले होते. 1992 च्या विश्वचषकातही भारताची कामगिरी काहीशी निराशाजनकच राहिली. यानंतर झालेल्या 1996 चा विश्वचषक भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारताने उपउपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना केला. बंगळुरूच्या मैदानावर झालेला विश्वचषकातील हा दोन्ही संघांतील पहिलाच सामना अत्यंत रोमांचक ठरला. यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील पहिले शतक साजरे केले.

- Advertisement -

नवज्योत सिंग सिद्धू, अजय जडेजा यांचीही खेळी निर्णायक ठरली. 287 धावांचे लक्ष्य गाठणार्‍या पाकिस्ताने भारतापुढे लोटांगण घातले आणि भारताने विश्वचषकात पहिल्यांदा आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करीत भारतीयांना दिलासा दिला. मात्र, यानंतर उपांत्य सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेत झालेल्या अंतिम सामन्यात लंकेने विजय मिळवत पहिला किताब पटकावला होता.

1999 च्या विश्वचषकात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले होते. परिणामी, भारताने श्रीलंका, पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावे लागले आणि या विश्वचषकात भारताला गाशा गुंडाळावा लागला होता. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेली ही विश्वचषक स्पर्धाही भारतीय चाहत्यांना नेहमीच स्मरणात राहील. कर्णधार गांगुली दादा आणि मास्टर-ब्लास्टर सचिनच्या खेळी या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळींपैकी एक होत्या. या स्पर्धेत भारताला केवळ कांगारूंनी पराभूत केले होते. उर्वरित सर्व सामने भारताने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिनला सर्वाधिक वेळा नर्व्हस नाईन्टीजचे शिकार व्हावे लागले होते. या विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, एकूण कामगिरी चांगली राहिली होती. 2007 च्या विश्वचषकात भारताची कामगिरी असमाधानकारक राहिली. भारताला बांग्लादेशने पराभूत करून घरचा रस्ता दाखवला होता.

- Advertisement -

यानंतर 2011 मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने किंग महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली स्वप्नपूर्ती केली. या स्पर्धेत भारताने बांग्लादेशचा वचपा काढत इतरही बलाढ्य संघांना पराभूत केले. उपउपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 29 धावांनी पराभूत केले होते. वहाब रियाजने घेतलेल्या 5 बळींमुळे भारताला कमी धावसंख्येत रोखण्यात पाकला यश आले होते. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी मिस्बाह उल-हक वगळता पाकच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करू दिली नव्हती. यानंतर नंबर वनवरील ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून भारताने आपला दुसरा विश्वचषक जिंकला होता. धोनीने षटकार मारत जिंकवून दिलेला हा विश्वचषक भारतीयांना आजही आठवतो.

2015 च्या विश्वचषकातही ओव्हलवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 76 धावांनी पराभूत केले होते. विराट (107), सुरेश रैना (74) शिखर (74) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 300 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकच्या मिसबाहने (76), अहमद शहजाद (47), हॅरीस सोहेल (36) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण शमी, मोहीत शर्मा, उमेश यादव यांच्या मार्‍यापुढे पाक संघ ढेपाळला आणि भारताने सहाव्यांदा पाकला पराभवाची धूळ चारली.

आता 2019 च्या या विश्वचषकात दमदार कामगिरी करणार्‍या भारतीय संघाला सातव्यांना पाकसोबत मुकाबला करायचा आहे. मात्र, भारतीय फलंदाजांचा फॉर्म आणि धोनीचा अनुभव, कोहलीचे सक्षम नेतृत्व पाहता भारताचे पारडे जड वाटते. पाकची मदार तेजतर्रार मार्‍यावर असेल, तर भारताची फलंदाजांच्या फटकेबाजीवर! एकूणच आता सातव्यांदा तरी पाकला पराभवाची मालिका खंडित करण्यात यश येते की पुन्हा एकदा भारतीयांपुढे पाक संघ लोटांगण घालतो हे पाहणे निश्चितच रंजक ठरणार आहे.

वाक्युद्धाची धमाल
आजवर झालेल्या प्रत्येक भारत – पाक सामन्यांमध्ये खेळाडूंधील वाक्युद्ध चांगलेच गाजले आहे. जिंकण्याच्या इर्षेने दोन्ही संघातील खेळाडूंचे हे युद्ध प्रेक्षकांची मात्र चांगलीच करमणूकही करते. दोन्ही संघांच्या सपोर्टर्सचेही योगदान महत्त्वपूर्ण असते. आजवर द्रवीड-शोएब, सेहवाग-शोएब, शोएब-सचिन, इंझमाम-गांगुली, व्यंकटेश प्रसाद आणि पाकिस्तानी फलंदाज यांच्यातील तसेच भारतीय गोलंदाज हरभजन, उमेश यादव, कुंबळे, अजित आगरकर, मोहम्मद शमी यांचे पाकिस्तानी फलंदाजांसोबत झालेले वादाचे किस्से आजही क्रिकेटप्रेमींना स्मरणात असतील, यात शंका नाही. शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि कमरान अकमल यांचे तर भारतीय फलंदाज, गोलंदाजांसोबत उडालेले खटके चाहत्यांसाठी कमालीचे यादगार ठरले आहेत. आजच्या या हाय व्होल्टेज मुकाबल्यात आता कुणाचे वाक्युद्ध रंगते आणि कोण विजयी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -