घरक्रीडाकसोटी क्रिकेटची नवी पहाट

कसोटी क्रिकेटची नवी पहाट

Subscribe

अ‍ॅशेस मालिकेतील एजबॅस्टन कसोटीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला (जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) सुरुवात झाली असून जून २०२१ मध्ये क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्डसवर जेतेपदाचा अंतिम सामना खेळला जाईल. आयसीसीने याआधी दोनदा २०१३, २०१७ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी प्रयत्न केले होते. दोन विफल प्रयत्नानंतर आयसीसीला तिसर्‍या प्रयत्नात यश लाभले. गेल्या दहा वर्षांत जगभरात टी-२० क्रिकेट लीगचे सामने फोफावल्यामुळे कसोटी क्रिकेटला ओहोटी लागली. पाच दिवसांच्या पारंपरिक कसोटी क्रिकेट दरम्यान प्रेक्षकांनी स्टेडियमकडे पाठ फिरवली. टीव्हीवरील कसोटी सामन्यांच्या प्रेक्षक संख्येतही (टीआरपी) घट झाली. त्यामुळे आयसीसीने कसोटी क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा घाट घातला, त्याला तिसर्‍याच प्रयत्नात यश लाभले असून १ ऑगस्टपासून सुरु होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेत या स्पर्धेला शुभारंभ होईल.

दिवस-रात्र (डे-नाईट) क्रिकेटचा प्रयोग कसोटी क्रिकेटमध्येही करण्यात आला असून पिंक बॉलचा उपयोगही या दिवस-रात्र कसोटी सामन्यांत करण्यात येतो. टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयोग आयसीसी करत असून टेस्ट चॅम्पियनशिप हा त्याचाच एक भाग आहे. ऑगस्ट २०१९ ते जून २०२१ यादरम्यान २७ कसोटी मालिकेत तब्बल ७१ कसोटी सामने, नऊ कसोटी संघामध्ये खेळले जातील. प्रत्येक संघ मायदेशात, तसेच परदेशात ३-३ कसोटी मालिका खेळणार असून तब्बल २ संघांमध्ये अंतिम सामना लॉर्डसवर जून २०२१ मध्ये रंगेल. प्रत्येक सामन्यात मिळणार्‍या गुणांनुसार अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी संघ निश्चित होणार असल्यामुळे प्रत्येक कसोटी सामना महत्वाचा ठरेल. विजयासाठी तसेच अनिर्णित, टाय सामन्यासाठी प्रत्येक संघाला गुण मिळतील.

- Advertisement -

कसोटी क्रिकेट रँकिंगमधील अव्वल ९ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रत्येक संघ २ वर्षाच्या कालावधीत सहा मालिका खेळणार असला तरीदेखील ही स्पर्धा संपूर्ण साखळी पद्धतीने (राऊंड रॉबिन) होणार नसल्यामुळे आपल्या पसंतीनुसार प्रतिस्पर्धी निवडण्याची मुभा संघांना असेल. तसेच प्रत्येक मालिकेतील सामन्यांच्या संख्येतदेखील भिन्नता असेल. किमान २, कमाल ५ सामन्यांची मालिका असली तरी एकूण १२० गुणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अ‍ॅशेस मालिका, भारत-विंडीज, श्रीलंका-न्यूझीलंड, भारत-द.आफ्रिका या कसोटी मालिका वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये समाविष्ट असतील. परंतु, न्यूझीलंडमध्ये नोव्हेंबरात होणार्‍या न्यूझीलंड-इंग्लंड या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा या स्पर्धेत समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीच्या फ्युचर टेस्ट प्रोग्राम अंतर्गत ही मालिका खेळली जाईल. अशा मालिकांचा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार नाही, पण आयसीसी रँकिंगसाठी त्या विचारात घेतल्या जातील. अफगाणिस्तान, आयर्लंड, तसेच झिम्बाब्बे (सध्या झिम्बाब्बेला आयसीसीने निलंबीत केले आहे) यांच्यातील मालिकांचा पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी विचार करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा परिपूर्ण नसून त्यात काही त्रुटी आहेत. संघांना आपल्या पसंतीनुसार प्रतिस्पर्धी निवडण्याची मुभा असून काही संघांची गाठ अव्वल संघांशी पडणारच नाही. उदा. न्यूझीलंडचा संघ इंग्लंड, द. आफ्रिकेशी खेळणारच नाही. श्रीलंकेच्या संघाची गाठ ऑस्ट्रेलिया, भारताशी पडणार नाही. मायदेशात काही संघ जास्त कसोटी सामने खेळतील, तर परदेशात त्या तुलनेने कमी सामने खेळतील. विजयासाठी गुण मात्र सारखेच असल्यामुळे मायदेशात जास्त सामने खेळणार्‍या संघांना फायदा होऊ शकेल. अलिकडेच झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या निकालाबाबत (टाय) बरेच वादंग माजल्यामुळे आयसीसीने सावध पवित्रा घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (टाय) बरोबरीत सुटल्यास स्पर्धेतील अव्वल क्रमांकाच्या (गुणांनुसार) संघाला विजेतेपद देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे.

पहिलीवहिली तिरंगी कसोटी स्पर्धा १९१२
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या तीन संघांमध्ये २७ मे-२२ ऑगस्ट १९१२ दरम्यान पहिलीवहिली, तसेच एकमेव तिरंगी कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली. एम्पिरियल क्रिकेट कौन्सिलचे (आयसीसी) तीन सदस्य असल्यामुळे तिरंगी कसोटी मालिका खेळवण्यात आली. पण आयसीसीचा हा प्रयोग पूर्णतः फसला. १९१२ च्या मोसमात जून, जुलै, ऑगस्टमधील विक्रमी पावसाने खेळाचा बेरंग केला. त्याकाळी खेळपट्ट्या आच्छादित (कव्हर्ड) करण्यात येत नसल्यामुळे ओलसर खेळपट्ट्यांवर फलंदाजीचा निभाव लागणे कठीण होते. कसोटी सामने ५ नव्हे, तर ३ दिवसांचेच असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील ३ पैकी २ सामन्यांत पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हे सामने अनिर्णित राहिले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत जेतेपद पटकावले.

आशियाई कसोटी अजिंक्यपद चौरंगी स्पर्धा (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्यात) १९९८-९९, तसेच २००१ दरम्यान खेळल्या गेल्या. आयसीसीचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या पुढाकारामुळे आशियाई स्पर्धा खेळवण्यात आली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दालमिया उत्सुक होते. परंतु, त्यांच्या हयातीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा होऊ शकली नाही.

भारताचे कसोटी सामने
वेस्ट इंडिज वि. भारत (२ कसोटी वेस्ट इंडिजमध्ये) : ऑगस्ट-सप्टेंबर, २०१९
भारत वि. द. आफ्रिका (३ कसोटी भारतात) : ऑक्टोबर २०१९
भारत वि. बांगलादेश (२ कसोटी भारतात) : नोव्हेंबर २०१९
न्यूझीलंड वि. भारत (२ कसोटी न्यूझीलंडमध्ये) : फेब्रुवारी, मार्च २०२०
ऑस्ट्रेलिया वि. भारत (४ कसोटी ऑस्ट्रेलियात) : नोव्हें.२०२० – जाने.२०२१
भारत वि. इंग्लंड (५ कसोटी भारतात) : जाने. – मार्च २०२१

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०१९-२१ (तक्ता क्रमांक – १)

संघ कसोटी मायदेशातील मालिका परदेशातील मालिका यांच्याशी सामने नाहीत

भारत १८ १० (द.आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड) ८ (विंडीज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) पाकिस्तान, श्रीलंका

न्यूझीलंड १४ ७ (भारत, विंडीज, पाकिस्तान ) ७ (श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश) इंग्लंड, द. आफ्रिका

द.आफ्रिका १६ ९ (इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया) ७ (भारत, विंडीज, पाकिस्तान) बांगलादेश, न्यूझीलंड

इंग्लंड २२ ११ (ऑस्ट्रेलिया, विंडीज, पाकिस्तान) ११ (द.आफ्रिका, श्रीलंका, भारत) बांगलादेश, न्यूझीलंड

ऑस्ट्रेलिया १९ ९ (पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत) १० (इंग्लंड, बांगलादेश, द.आफ्रिका) श्रीलंका, विंडीज

श्रीलंका १३ ७ (न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश) ६ (पाकिस्तान, द.आफ्रिका, विंडीज) ऑस्ट्रेलिया, भारत

पाकिस्तान १३ ६ (श्रीलंका, बांगलादेश, द.आफिका) ७ (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड) भारत, विंडीज

वेस्ट इंडीज १५ ६ (भारत, द. आफ्रिका, श्रीलंका) ९ (इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश) ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान

बांगलादेश १४ ७ (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज) ७ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका) इंग्लंड, द. आफ्रिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -