घरIPL 2020IPL 2020 : झेल सोडणे पडतेय महागात - विराट कोहली 

IPL 2020 : झेल सोडणे पडतेय महागात – विराट कोहली 

Subscribe

आरसीबीने यंदाच्या मोसमात ढिसाळ क्षेत्ररक्षण केले आहे.    

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा आयपीएल सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ५९ धावांनी गमावला. आरसीबीने यंदाच्या आयपीएल मोसमाची चांगली सुरुवात करताना चार पैकी तीन सामने जिंकले होते. मात्र, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीला चांगला खेळ करण्यात अपयश आले. खासकरून त्यांनी क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका केल्या. यंदाच्या मोसमात ढिसाळ क्षेत्ररक्षण करण्याची ही आरसीबीची पहिली वेळ नव्हती. याआधी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलचे दोन झेल टाकले होते आणि राहुलने शतकी खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला होता. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही आरसीबीचे खेळाडू पुन्हा त्याच चुका करताना दिसले. या चुका आम्हाला महागात पडत असल्याचे कर्णधार कोहलीने सामन्यानंतर सांगितले.

स्टोइनिसला जीवदान दिले

सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिस ३० धावांवर असताना बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने त्याचा झेल सोडला. स्टोइनिसनेच २६ चेंडूत ५३ धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख खेळाडूंचे झेल सोडणे आम्हाला महागात पडत असल्याचे सामन्यानंतर कोहली म्हणाला. एखाद्या फलंदाजाने तुम्हाला संधी दिली, तर तुम्ही झेल पकडत त्याला माघारी पाठवणे गरजेचे असते. आम्ही अवघड झेल सोडत आहोत असेही नाही. सरळ हातात आलेले झेलही आम्हाला पकडण्यात अपयश येत आहे. हे झेल सोडणेच आम्हाला महागात पडत आहे. या सामन्यात आम्ही स्टोइनिसला जीवदान दिले आणि त्याने मॅचविनिंग खेळी केली, असे कोहली म्हणाला. आरसीबीने यंदा दोन सामने गमावले असून हे दोन्ही पराभव धावांचा पाठलाग करताना आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -