घरक्रीडाखेळाडूंमधील मानसिक अनारोग्य गंभीर विषय!

खेळाडूंमधील मानसिक अनारोग्य गंभीर विषय!

Subscribe

विराट कोहलीचे मत

खेळाडूंमधील मानसिक अनारोग्य हा गंभीर विषय आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने जगासमोर मानसिक आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत हे कबूल केल्याबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच कारकिर्दीदरम्यान ‘आता सगळे संपले’ असा विचार काही वेळा माझ्याही मनात येऊन गेला आहे, असे कोहलीने नमूद केले. ग्लेन मॅक्सवेलमुळे क्रिकेटपटूंमधील मानसिक अनारोग्याविषयी चर्चा होत आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्याच निक मॅडिंसनने याच कारणामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू स्टिव्ह हार्मिसन, मार्कस ट्रेस्कोथिक हेसुद्धा याआधी निराशेतून गेले आहेत. त्यामुळे खेळाडूंमधील मानसिक अनारोग्याविषयी मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे असे कोहलीला वाटते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतर प्रत्येक खेळाडूसोबत सतत संवाद साधला पाहिजे. त्यांना कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मला मानसिक आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत हे जगासमोर कबूल केल्याबद्दल ग्लेनचे (मॅक्सवेल) कौतुक झाले पाहिजे. तो जगभरातील क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. तुम्ही मानसिकदृष्ठ्या पूर्णपणे फिट नसतानाही प्रयत्न करत राहता, पण एक वेळ अशी येतेच जेव्हा तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. कारकिर्दीदरम्यान ‘आता सगळे संपले’ असा विचार काही वेळा माझ्याही मनात येऊन गेला आहे. मात्र, काय केले पाहिजे, कोणाशी संवाद साधला पाहिजे, काय बोलले पाहिजे याची मला कल्पना नव्हती, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

डे-नाईट सामन्यांमुळे कसोटीची रंजकता वाढेल!

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार आहे. हा भारताचा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना असेल. डे-नाईट सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची रंजकता वाढेल असे विराट कोहलीला वाटते. तसेच त्याने पुढे सांगितले, मी गुलाबी चेंडूने खेळलो आणि हा चेंडू नियमित लाल चेंडूपेक्षा खूप जास्त स्विंग होतो. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळाल्यास ते या सामन्यात आपली छाप पाडू शकतील. जुना गुलाबी चेंडू दव असताना कशी हालचाल करतो हे पाहण्यास मी उत्सुक आहे. मी याआधी गुलाबी चेंडूने खेळलेलो नाही, पण लाल चेंडूने खेळण्याची सवय असल्याने अचानक गुलाबी चेंडूचा सामना करताना अधिक लक्ष देऊन खेळावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -