घरक्रीडानदाल, त्सीत्सीपासचा उपांत्य फेरीत प्रवेश

नदाल, त्सीत्सीपासचा उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

ऑस्ट्रेलियन ओपन

स्पेनच्या १७ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या राफेल नदाल तसेच रॉजर फेडररला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवणार्‍या स्टेफानोस त्सीत्सीपासने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, महिलांमध्ये आठव्या सीडेड पेट्रा क्विटोव्हा आणि डॅनिएले रोस कॉलिन्स यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील आपले सामने जिंकत आगेकूच केली.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात दुसर्‍या सीडेड राफेल नदालने फ्रांसिस टियाफोचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नदालने या सामन्याच्या तिन्ही सेटमध्ये टियाफोची पहिली सर्व्हिस मोडली. या सामन्याची सुरुवात नदालने अप्रतिमरित्या केली. त्याने पहिल्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी मिळवली. यानंतर त्याने टियाफोला आपली सर्व्हिस मोडू दिली नाही आणि हा सेट ६-३ असा जिंकला. नदालने दुसर्‍या सेटमध्ये टियाफोची दोनदा सर्व्हिस मोडली. त्यामुळे त्याने हा सेट ६-४ असा जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये टियाफोला चांगला खेळ न करता आल्याने नदालने हा सेट ६-२ असा जिंकत हा सामनाही जिंकला. त्याचा उपांत्य फेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासशी सामना होईल. २० वर्षीय त्सीत्सीपासने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टा अगुटला ७-५, ४-६, ६-४, ७-६ असे पराभूत केले.

- Advertisement -

महिला एकेरीत आठव्या सीडेड पेट्रा क्विटोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशली बार्टीवर ६-१, ६-४ अशी मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच, अमेरिकेच्या बिन सीडेड डॅनिएले रोस कॉलिन्सने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या अनस्तासिया पाव्हल्यूचेन्कोचा २-६, ७-५, ६-१ असा पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -