घरक्रीडादादा...बस नामही काफी है!

दादा…बस नामही काफी है!

Subscribe

‘दादा’! भारतीय क्रिकेटमध्ये हा शब्द उच्चारला की केवळ एकच माणूस डोळ्यासमोर येतो. सौरव गांगुली! भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या दादाने आपल्या संघातील खेळाडूंना ‘हम भी किसीसे कम नही’ हा विश्वास दिला. घरच्या मैदानावर सर्वच ‘शेर’ असतात, पण परदेशात जाऊन जो संघ जिंकतो, तोच सर्वोत्तम, ही गोष्ट त्याने सर्व खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या मनावर बिंबवली. त्याच्यातील आत्मविश्वासाने, कधीही-कोणासमोरही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे त्याने भारतीय क्रिकेटला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. तो निवृत्त होऊन आता एका दशकाहूनही जास्त काळ होऊन गेला आहे, पण भारतीय चाहत्यांना त्याच्या कामगिरीचा किंचितसाही विसर पडलेला नाही. आता दादा लवकरच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) तो नवा अध्यक्ष होणार हे निश्चितच आहे. त्यामुळे त्याची दादागिरी बीसीसीआयमध्येही चालणार का आणि एकेकाळी फिक्सिंगच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय संघाचा कायापालट करणारा दादा आता बीसीसीआयची ढासळलेली प्रतिमा बदलणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

कलकत्यातील (आताचे कोलकाता) एका गर्भश्रीमंत घरात जन्मलेल्या सौरव गांगुलीला लहानपणापासूनच सर्व सोयीसुविधा मिळाल्या. कलकत्यातील लोकांना क्रिकेटपेक्षा फुटबॉल प्रिय! त्यामुळे सहाजिकच गांगुली लहानपणी फुटबॉलकडे आकर्षित झाला. त्याने खेळांवर लक्ष केंद्रित करणे आईला फारसे आवडले नव्हते. परंतु, बंगाल क्रिकेट संघाकडून खेळणारा त्याचा मोठा भाऊ स्नेहशीशचा त्याला पाठिंबा मिळाला. स्नेहशीशच्या सांगण्यावरूनच गांगुलीने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. स्नेहशीशचे क्रिकेटचे साहित्य वापरता यावे यासाठी उजव्या हाताने फलंदाजी करणारा गांगुली डावखुरा झाला. त्याने सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची प्रतिष्ठित सेंट झेवियर्स शाळेच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

मात्र, गांगुली गर्विष्ठ आहे, असे म्हणत संघातील खेळाडूंनी त्याची तक्रार केली. बंगालच्या ज्युनियर संघात निवड झाल्यानंतरही त्याच्यावर गर्विष्ठ असल्याचे आरोप झाले. अंतिम ११ मध्ये स्थान न मिळालेल्या गांगुलीला इतर राखीव खेळाडूंप्रमाणेच मैदानातील खेळाडूंना पाणी नेऊन देणे, संदेश पोहोचवणे यांसारखी कामे सोपवण्यात आली. मात्र, त्याने ही कामे करण्यास स्पष्ट नकार दिला. या त्याच्या नेहमी थाटात राहण्याच्या सवयीमुळेच गांगुलीला ‘महाराजा’ असे नाव पडले. परंतु, याच आत्मविश्वासाचा त्याला खेळात फायदा झाला.

- Advertisement -

आपल्या दुसर्‍याच रणजी मोसमात बंगालकडून चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. मात्र, केवळ एका सामन्यानंतरच त्याला संघातून वगळण्यात आले आणि याला त्याची वागणूक कारणीभूत होती. स्थानिक क्रिकेटमध्ये सलग दोन-तीन मोसमांत खोर्‍याने धावा केल्याने १९९६ सालच्या इंग्लंड दौर्‍यासाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच डावात १३१ धावांची खेळी केली. लॉर्ड्सवर पदार्पणात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही अजूनही सर्वोच्च खेळी आहे. त्यानंतर हळूहळू त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली छाप पाडण्यास सुरुवात केली.

२००० साली भारतीय क्रिकेट अडचणीत सापडले होते. अनुभवी मोहम्मद अझरुद्दीन, अजय जाडेजा आणि इतर काही जण ‘मॅच-फिक्सिंग’ प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. तसेच सचिन तेंडुलकरने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. या कठीण काळात भारताला एका खमक्या कर्णधाराची गरज होती. त्यामुळे निवड समितीने गांगुलीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याच्या नेतृत्वात भारताला सुरुवातीलाच यश मिळाले. दरम्यान, त्याने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तिथेही संघातील सहकार्‍यांनी गांगुली फारच गर्विष्ठ आहे, असे म्हटत टीका केली. २००१ साली गांगुलीने चार वेळा नाणेफेकीला उशिरा येत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह वॉला मैदानात वाट पाहायला लावली. एका सामन्यात तर तो सराव करतानाचेच कपडे घालून नाणेफेकीसाठी आला. तसेच २००२ सालच्या नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केल्यानंतर गांगुलीने आपली जर्सी काढून ती हवेत फिरवली. या सर्व गोष्टींमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली. परंतु, याचा गांगुलीवर फारसा परिणाम झाला नाही.

- Advertisement -

त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांना त्यांच्याच मैदानात चांगली झुंज दिली. तसेच गांगुलीच्या भारताने २००३ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्याने या स्पर्धेत ३ शतकांच्या मदतीने ४६५ धावा फटकावल्या. या यशामुळे गांगुलीवर आधी टीका करणार्‍यांनी आता त्याची स्तुती करण्यास सुरुवात केली. मात्र, गांगुली कर्णधार असतानाच २००४ साली ऑस्ट्रेलियाने १९६९ नंतर पहिल्यांदा भारतात येऊन कसोटी मालिका जिंकली. त्यातच गांगुली आणि क्युरेटर यांच्यातही वाद झाले. २००५ साली ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांची भारताच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि सुरुवातीपासून त्यांच्यात व कर्णधार असलेल्या गांगुलीमध्ये वादविवाद झाले. त्यामुळे त्यांनी गांगुलीला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याला संघातूनही वगळण्यात आले. परंतु, गांगुलीने हार मानली नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळ केला, तर भारतीय संघातील फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. २००८ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तसेच २०१२ साली तो सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला.

निवृत्तीनंतरही त्याचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. त्याच्यातील नेतृत्व गुणांमुळे २०१३ साली त्याची बंगालच्या प्रशिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. २०१४ साली त्याची बंगाल क्रिकेट असोसिएशनचा सहसचिव म्हणून निवड झाली. पुढे त्याची बंगालच्या अध्यक्षपदीही निवड झाली. आता त्याने भारतीय क्रिकेट प्रशासनातील सर्वोच्च स्थान गाठले असून लवकरच गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी औपचारिक निवड होणार आहे. बीसीसीआयची छबी मागील काळात बिघडली आहे. परंतु, आता अध्यक्ष गांगुलीला केवळ १० महिन्यांसाठी का होईना, पण यात बदल करण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -