घरक्रीडा‘त्यावेळी’ फायनलचा विचारही हास्यास्पद वाटला!

‘त्यावेळी’ फायनलचा विचारही हास्यास्पद वाटला!

Subscribe

पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर मात करत यजमान इंग्लंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. १९९२ नंतर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांनी आपले पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. रविवारी क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर होणार्‍या अंतिम फेरीत त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. मागील विश्वचषकाची (२०१५) बाद फेरीही गाठण्यात अपयश आल्यामुळे इंग्लंडने आपल्या संघात अनुभवी खेळाडूंना वगळून युवा, प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला.

तसेच इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वात त्यांनी आपल्या खेळात बदल करून आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. या बदलांमुळे त्यांना मागील चार वर्षांत बरेच यश मिळाले असून, आता विश्वचषक जिंकत त्यांना इतिहास रचण्याची संधी आहे. २०१५ मध्ये जेव्हा आमचा संघ प्राथमिक फेरीतच बाहेर पडला, त्यावेळी पुढील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विचारही हास्यास्पद वाटला असता, असे विधान कर्णधार मॉर्गनने उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर केले.

- Advertisement -

मैदानात असलेले सर्व खेळाडू आणि अगदी ड्रेसिंग रूममधील इतर सदस्य यांना या सामन्यात दमदार कामगिरी करायची होती. प्रत्येक खेळाडूने आपला सर्वोत्तम खेळ केला. या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली याचा त्यांना आनंद होता. जेव्हा संघातील प्रत्येक खेळाडू जिद्दीने खेळतो आणि खासकरून गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करतात, तेव्हा कर्णधार म्हणून फार बरे वाटते. तुमच्यावर कितीही दबाव असला, तुमची कामगिरी चांगली होत नसली, तरी खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे असते आणि या संघाने मागील काही वर्षांत हेच शिकले आहे. २०१५ विश्वचषकातून आम्ही बाहेर पडलो, तेव्हा कोणीही मला म्हणाले असते की इंग्लंडचा संघ पुढील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार आहे, तर मी त्यावर हसलो असतो. त्यावेळी अंतिम फेरीचा विचारही हास्यास्पद वाटला असता, असे मॉर्गन म्हणाला.

विश्वचषकाचा अंतिम सामन्याचा कोणत्याही संघावर खूप दबाव असतो. त्यातच तो सामना घरच्या मैदानावर असेल तर तो दबाव आणखीच वाढतो. याबाबत मॉर्गन म्हणाला, रविवारचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास असणार आहे. आम्ही दमदार खेळ करून स्वतःसाठी अंतिम सामन्यात खेळण्याची संधी निर्माण केली आहे. त्यामुळे या सामन्याचे दडपण घेण्यापेक्षा या संधीचा आनंद घेतला पाहिजे.

- Advertisement -

इंग्लंडचे प्रदर्शन उत्कृष्ट -वोक्स

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला, तर इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या ३२.१ षटकांत गाठले. इंग्लंडच्या क्रिस वोक्सने ३ गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. मात्र, या विजयाचे श्रेय एका खेळाडूला नाही, तर संपूर्ण संघाला जाते, असे वोक्स म्हणाला. मला काय बोलावे सुचत नाही. आमच्या संपूर्ण संघानेच उत्कृष्ट प्रदर्शन केले. गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली आणि फलंदाजांनी तितकीच चांगली कामगिरी करत आम्हाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड नव्हते. आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले, असे वोक्सने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -