घरक्रीडाबेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना

बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना

Subscribe

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवून वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम रुबाबात प्रवेश केला. यजमान इंग्लंडची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. पाचव्यांदा वर्ल्डकपचे यजमानपद लाभलेल्या इंग्लंडला यंदा जेतेपदाची स्वप्ने पडत असताना बाद फेरीतील त्यांच्या प्रवेशाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इंग्लंडला पुढचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यांची आता गाठ पडेल ती या स्पर्धेत अपराजित असणार्‍या भारत, तसेच न्यूझीलंंडशी. बर्मिंगहॅमवर भारताशी यजमान संघाचा मुकाबला ३० जूनला होईल, तर साखळीतील इंग्लंडची अखेरची लढत न्यूझीलंडशी ३ जुलै रोजी चेस्टर-ली-स्ट्रीट, डरहॅमवर रंगेल. विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये १९९२ नंतर या दोन्ही संघांविरुध्द इंग्लंडला विजयाने हुलकावणी दिली आहे! २७ वर्षांनंतर इंग्लंडला ही किमया साधता येईल?

कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडने ओव्हलवर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात तर दिमाखदार केली. त्रिशतकी धावसंख्या उभारणे त्यांना सहज शक्य झाले. परंतु, धावांचा पाठलाग करताना मात्र इंग्लंडने ४ पैकी ३ सामने (पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया) गमावले; अपवाद विंडीजविरुध्द सामन्याचा. बांगलादेशला हलके लेखून चालणार नाही. भारत, पाकिस्तानला हरवल्यास बांगलादेशचे ११ गुण होतील. श्रीलंकेचे ३ सामने (द.आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत) बाकी असून तिन्ही सामने त्यांनी जिंकल्यास त्यांचे १२ गुण होतील. त्यामुळे इंग्लंडला आगेकूच करण्यासाठी भारत, न्यूझीलंडवर विजय मिळवावे लागतील.

- Advertisement -

अ‍ॅशेस मालिकेआधी लॉर्ड्स इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व जाणवले. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडे ६-२ अशी आघाडी असून फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियन्स सरस ठरले. कर्णधार फिंचने शतकी खेळी करताना वॉर्नरच्या साथीने शतकी सलामी देत विजयाची पायाभरणी केली. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुध्द २ शतके झळकावणारा फिंच हा एकमेव फलंदाज. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) (२०१५) पाठोपाठ लॉर्ड्सवर त्याने शतक झळकावले. वॉर्नर-फिंच या बिनीच्या जोडीची वर्ल्डकपमधील तिसरी शतकी भागीदारी कांगारुंसाठी फलदायी ठरली.

वोक्स-ऑर्चर यांनी मंगळवारी ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग करुन फिंच-वॉर्नरला सतावले. परंतु, त्यांनी जिगरबाज खेळ करुन शतकी सलामी दिली. २८६ धावांचे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही. विन्स, रुट, मॉर्गन हे तीन मोहरे इंग्लंडने पहिल्या ६ षटकातच गमावले. कुल्टर-नाईलऐवजी आलेल्या जेसन बेहरनडॉर्फने ४४ धावांतच इंग्लंडचे ५ मोहरे टिपले. मिचेल स्टार्कने बेहरनडॉर्फच्या साथीने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडताना ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार्कच्या यॉर्करवर बेन स्टोक्सचा त्रिफळा उडाला. ’यंदाच्या वर्ल्डकपमधील हा सर्वोत्तम चेंडू’! ऑस्ट्रेलियाच्या या डावखुर्‍या तेज जोडगोळीचा (९ विकेट्स) हा आगळा वेगळा विक्रम.

- Advertisement -

पाकिस्तान आणि खासकरुन श्रीलंका या आशियाई संघांविरुध्दचे पराभव इंग्लंडसाठी अनपेक्षितच. वर्ल्डकपमध्ये सहाव्या जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असताना यजमान इंग्लंडची घसरण ब्रिटीश क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायकच. फुटबॉलच्या लोकप्रियतेत भर पडत असताना खासकरुन ब्रिटीश युवकांना क्रिकेटचे फारसे आकर्षण वाटत नाही. इंग्लंडमधील आशियाई युवा पिढीला क्रिकेटमध्ये दिलचस्पी वाटते. पराभवामुळे ब्रिटीश प्रसार माध्यमांच्या टीकेचा भडिमार इंग्लंड क्रिकेटपटूंवर होत आहे. यंदातर वर्ल्डकप फायनल आणि विम्बल्डन पुरुष एकेरीचा अंतिम सामना एकाचवेळी होणार असल्यामुळे फुटबॉलपाठोपाठ टेनिसशीही क्रिकेटला स्पर्धा करावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -