उल्हासनगर: सेंच्युरी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

कर्मचाऱ्यांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधिन

उल्हासनगरच्या नावाजलेल्या सेंच्युरी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश चितलांगे यांच्यावर कंपनीच्या कामगाराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये कंपनीच्या सुरक्षारक्षकाने वार अंगावर घेतल्याने चितलांगे हे किरकोळ जखमी झाले आहेत. कंपनीत होत असलेल्या कामगारांच्या शोषणामुळे वैतागलेल्या कामगाराने हा हल्ला केल्याची चर्चा आहे.

उल्हासनगर शहरातील शहाड गावठाण समोर सेंच्युरी रेयॉन हि रेयॉन धागा बनविणारी बी.के.बिरला ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीमध्ये उल्हासनगर आणि आजू बाजूच्या परिसरात राहणारे सहा हजार पेक्षा अधिक कामगार काम करतात. ही उल्हासनगर मधील चालू असलेली एकमेव कंपनी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजाराम साळवीच्या अध्यक्षतेखालील इंटक युनियन आणि कंपनीच्या शासनाच्या मिलिभगतमुळे कामगारांचे आर्थीक आणि शारिरीक शोषण चालू असून याविरोधात कामगारांचा एक गट न्ययालयात गेला आहे. युनियनच्या निवडणुका न होताच युनियन आणि प्रशासन करार करून कामगारांना पगार वाढ देत नसल्याची धुसफूस कामगारांमध्ये आहे.

युनियन ही कंपनी प्रशासनाच्या इच्छेप्रमाणे वागत असल्याने कामराचार्याना क्वाटरमध्ये घर न मिळणे, त्यांचा पगार कापणे अशा अनेक गोष्टी घडत असतात. असाच एक अन्यायग्रस्त कर्मचारी अरुण म्हसळ याने दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास मिटिंग आटोपून पायऱ्या उतरत असताना ओमप्रकाश चितलांगे यांच्यावर तीष्ण हत्याराने हल्ला चढवला. या हल्ल्यात चितलांगे यांच्या पोटाला जखम झाली आहे, त्याच वेळी त्यांच्या अंगरक्षकाने अरुण याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर देखील वार केला. त्यात अंगरक्षक देखील जखमी झाला असून त्याला सेंच्युरी कंपनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कदम यांनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेत तात्काळ अरुण म्हसळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. याबाबत कंपनीचे पदाधिकारी सुबोध दवे यांना याबाबत विचारले असता कंपनी अधिकृत म्हणणे वेळ आल्यावर मांडेल असे सांगितले.


‘सिगारेट ओढ नाहीतर ठार मारेन!’; रुममेटच्या धमकीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या