आता भाजपचं सरकार येणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान!

शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

Mumbai
prithviraj-chavan
पृथ्वीराज चव्हाण

एकीकडे महायुतीतले दोन्ही मित्रपक्ष अर्थात भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांमधले वाद आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन उघड केल्यानंतर आता विरोधकांनी देखील महायुतीच्या परिस्थितीवर टीका केली आहे. ‘आता कितीही फोडाफोडी केली, तरी राज्यात भाजपचं सरकार येणार नाही’, असं महत्त्वपूर्ण विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सिल्व्हर ओकला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाणांनी आता भाजपचं सरकार राज्यात येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

‘सत्ताधारी टीका-टिप्पणी करण्यात व्यस्त’

दरम्यान, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीमधल्या दोन्ही मित्रपक्षांवर टीका केली. ‘आपण सरकार स्थापन करू शकत नाही, असं भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं आहे. फडणवीस सरकारच्या गेल्या ५ वर्षांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातल्या जनतेनं त्यांना नाकारलं आहे. त्यांना अपेक्षेप्रमाणे जागा मिळालेल्या नाहीत. आता १५ दिवसांनंतर त्यांनी ही परिस्थिती कबूल केली आहे. महाराष्ट्र कोलमडलेला असताना सरकार मित्रपक्षासोबत सत्तास्थापनेवर टिका टिप्पणी करण्यात व्यस्त आहे. कितीही फोडाफोडी केली, तरी आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार नाही हे स्पष्ट आहे’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – अखेर उद्धव ठाकरेंनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं भाजप-शिवसेनेत!

‘राज्यपालांच्या निर्णयानंतर आमची भूमिका ठरवू’

दरम्यान, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल, याविषयी माहिती दिली. ‘या राजकीय परिस्थितीविषयी शरद पवारांसोबत आम्हाला चर्चा केली आहे. आता राज्यपाल पुढच्या काळात कोणतं पाऊल उचलतात, हे महत्त्वाचं आहे. त्याकडे आता आम्ही लक्ष ठेऊन आहोत. शरद पवार हे आमचे आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. जनादेश भाजपनं पाळायला हवा होता. आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकार स्थापनेसाठीचं आमच्याकडे संख्याबळ नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. बिगर भाजप सरकार येणं ही कल्पना करणं ठीक आहे. पण ते कसं येणार, याविषयी आम्ही लक्ष ठेऊन आहोत’, असं ते म्हणाले.