घरमुंबईठरलं, भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!

ठरलं, भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!

Subscribe

मुंबई महापौर पदासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख असून भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेचा पेपर सोपा झाला आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता त्याचा परिणाम मुंबई महानगर पालिकेवर देखील दिसून आला आहे. पालिकेत देखील आगामी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता होती. मात्र, आता भाजपनं मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ‘आपलं महानगर’ने याआधीच हे वृत्त दिलं होतं. त्यानुसार आता भाजप मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत बसणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार यशवंत जाधव यांचा पालिकेतील पेपर सोपा झाला आहे. भाजपचे आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करून भाजप महापौरपदाची निवडणूक लढवत नसल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

‘मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जिवावर आता अभद्र करणार नाही. मात्र, २०२२चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही’, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. दरम्यान, त्याआधी भाजपचे नगरसेवक आणि गटनेते मनोज कोटक यांनी संख्याबळ नसल्यामुळे भाजप महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘भाजपकडे आवश्यक असलेलं संख्याबळ नाही. त्यामुळे ओढून-ताणून संख्याबळ करण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही. पण भविष्यात जेव्हा भाजपकडे संख्याबळ असेल, तेव्हा नक्कीच भाजपचा महापौर निवडून येईल’, असं कोटक म्हणाले आहेत.

..तर शिवसेनेसाठी बिनविरोध निवडणूक!

दरम्यान, राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक निर्णय घेतला गेला, तर मुंबईत देखील काँग्रेस-राष्ट्रवादी महापौरपदासाठी उमेदवार न देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे एकूणच यशवंत जाधव यांची महापौरपदी बिनविरोध निवड होईल असा तर्क राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे.


वाचा सविस्तर – ठाण्याप्रमाणेच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -