घरमुंबईआमच्या जाहीरनाम्यातले मुद्दे इतरांनी चोरले - प्रकाश आंबेडकर

आमच्या जाहीरनाम्यातले मुद्दे इतरांनी चोरले – प्रकाश आंबेडकर

Subscribe

एकीकडे राज्यातल्या प्रस्थापित नेत्यांच्या सभा गाजत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सोमय्या मैदानावर पक्षाची मुंबईतली पहिली जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरनामा डिजिटल प्रसिद्ध केल्याचं जाहीर केलं. ‘आमच्या जाहीरनाम्यातले अनेक मुद्दे विविध पक्षांनी उचलले आहेत. महाराष्ट्रातलं धरणातलं पाणी दुष्काळी भागाकडे नेण्याची भूमिका आम्ही महिन्याभरापूर्वी मांडली. आज तोच मुद्दा सगळ्यांच्या जाहीरनाम्यात आहे. पण इतर पक्षांकडे दुष्काळमुक्त महाराष्ट्र कसा करायचा, याचा आराखडा त्यांच्याकडे नाही. भाजप म्हणतात, नद्याजोड प्रकल्प राबवणार. केंद्रीय मंडळाने नदीजोड प्रकल्पाला विरोध केला आहे. कुठल्या नद्या कशा जोडणार, हेही सांगत नाहीत’, असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये घोषणा केली होती की, ‘केजी टू पीजी शिक्षणाची जबाबदारी सरकारची असली पाहिजे’. आता हाच मुद्दा राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतला आहे’, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘मुंबई महानगर पालिका स्वायत्त आणि श्रीमंत आहे. पण उरलेल्या महानगरपालिका तितक्या स्वायत्त आणि श्रीमंत नाही. शहरात साठणाऱ्या घनकचऱ्यातून वीज निर्माण होऊ शकते. आमच्या हातात सत्ता आली, तर मुंबईतल्या कचऱ्यातून वीज निर्माण करून समस्या सोडवली जाईल. तंत्रज्ञान आधीच उपलब्ध आहे. नवीन शोधण्याची गरज नाही. झोपडपट्टीधारकांच्या विकासासाठी सर्वात आधी एका कुटुंबाला जगण्यासाठी किती जागा आवश्यक आहे, ते ठरवलं जाईल आणि त्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचं काम तिथे केलं जाईल’, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी नमूद केलं.

- Advertisement -

मुंबईतल्या वाहतुकीच्या समस्येवर समुद्री वाहतूक हा सुद्धा पर्याय होऊ शकतो, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्यासोबतच अदानींकडून दिली जाणारी महाग वीज, यावर देखील त्यांनी टीका केली.

‘मुंबई उपनगरांना वीज पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचा देखील हिस्सा आहे. त्यामुळेच सरकार या कंपन्यांचं बेस्टमध्ये विलीनीकरण करणार नाही. आणि ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मुंबईत बेस्टकडून पुरवल्या जाणाऱ्या विजेचा दर कमी होणार नाही. आणि त्याशिवाय बेस्ट वाहतूकीचं तिकीट देखील कमी होणार नाही’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

राफेलखाली एक धारी नव्हे, दोनधारी लिंबू हवा

मला एक मसणजोगी म्हणाला राजनाथसिंह माझा धंदा चोरायला लागले आहेत. तो म्हणाला, मी मसणजोगी आहे. लिंबू घेऊन मी फिरतो. लोकांना लिंबू दाखवून मी फिरतो. पण तो लिंबू घेऊन फ्रान्सला गेला. विमानाखाली लिंबू ठेवला, पण तोही चुकीचा ठेवला. विमानाखाली एकधारी नाही तर दोन धारी लिंबू ठेवायचा असतो. तो आला तर मला सांगा, मी त्याची लिंबू कसा ठेवायचा याची परीक्षा घेतो, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेमध्ये शरद पवारांच्या कोपरखळीवर बोलतात. हा विधानसभेचा मुद्दा नाही. म्हणजे मोदीही आता राहुल गांधींसारखे वागायला लागले. राहुल गांधीही बोलतात, ते राफेलवर बोलतात. त्यांना माझं हे सांगणं आहे, की राहुल गांधींनी राफेलवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे असलेला हुकमाचा एक्का असलेले मनमोहन सिंग यांना बोलू द्यावं. ज्या दिवशी मनमोहन सिंग बोलतील, त्या दिवशी नरेंद्र मोदी कपडे फाडत बसले असतील, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘२०१४मध्ये सरकार आल्यानंतर ६ हजार ७१८ कंपन्यांसोबत एमओयू करून महाराष्ट्रात कंपनी स्थापन करण्यासाठी करार करण्यात आला. पण यापैकी एकही कंपनी चालू झालेली नाही. सत्ताधारी म्हणतात, आम्ही एक कोटी नोकऱ्या निर्माण करू. पण मागच्या ५ वर्षांत राज्यातल्या २ लाख कंपन्या बंद पडलेल्या आहेत. प्रत्येक कंपनीत ४ कामगार धरले, तरी ८ लाख लोकं बेरोजगार झाले’, असा दावा यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केला.

आपण सत्तेवर बसवलेल्यांवर अंकुश ठेवणारं कुणीही नाही. त्यांचं घोडं बेलगाम उधळत आहे. आणि जर समस्या सोडवायच्या असतील, तर या उधळलेल्या घोड्याचा लगाम आपल्या हातात घ्यायला पाहिजे, असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -