घरमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणाले, 'मी असतो, तर भाजपची जागावाटपात असं वागायची हिंमत झाली...

राज ठाकरे म्हणाले, ‘मी असतो, तर भाजपची जागावाटपात असं वागायची हिंमत झाली नसती!’

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याची मागणी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभा घेत आहेत. मुंबईमध्ये झालेल्या त्यांच्या सभांमधून त्यांनी राज्यातल्या भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र, त्यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या वारंवार भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर देखील यथेच्छ तोंडसुख घेतलं आहे. सोमवारी पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या या पद्धतीवर निशाणा साधला. मात्र, त्यासोबतच त्यांनी असं काही वक्तव्य केलं, ज्यामुळे मनसेच काय, पण काही सेकंदांसाठी शिवसेना कार्यकर्ते देखील स्तब्ध झाले असावेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेला भाजपनं जागावाटपात योग्य महत्त्व न दिल्याबद्दल समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, ‘एवढं मोठं पुणे शहर, पण इथे एकही जागा भाजपनं शिवसेनेला दिली नाही. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली होती. आमची इतकी वर्ष युतीमध्ये सडली असं देखील म्हणाले होते. पण जागावाटपामध्ये मात्र युती १२४ वरच अडली. हे सगळं लाचारीमुळे होतंय.’

- Advertisement -

बाळासाहेबांचा केला उल्लेख…

दरम्यान, शिवसेनेवर लाचारीची टीका करताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा उल्लेख केला. ‘शिवसेनेला जागावाटपात भाजपनं पुण्यात एकही जागा दिलेली नाही. हे सगळं लाचारीमुळे होत आहे. बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर भाजपची असं वागायची हिंमत झाली नसती. माझ्यासोबत देखील भाजपची असं वागायची हिंमत झाली नसती’, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या खऱ्या. मात्र, या वक्तव्यामध्ये राज ठाकरेंना ‘मी शिवसेनेत असतो तर’, असं म्हणायचं होतं, की ‘शिवसेनेच्या जागी मनसे असती तर’, असं म्हणायचं होतं, यावर मात्र आता राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होऊ लागली आहे.


हेही वाचा – ‘चंपा’ची चंपी करणार-राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -