घरमुंबईभाजपातील बंडखोरीमुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

भाजपातील बंडखोरीमुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

Subscribe

- कल्याणातील बंड सेना-भाजपाला तापदायक,- 18 पैकी 16 जागा युतीच्या पारड्यात ?

शिवसेना आणि भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात यावेळी मात्र स्वपक्षातील बंडाळीमुळे महायुतीसमोर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. ठाणे जिल्हा शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तर या विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. मात्र तरीही मुंब्रा-कळव्यासह एखाद्या जागेचा अपवाद वगळता ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 18 जागांपैकी 16 जागा युतीच्या पारड्यात पडतील असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे. भाजप-सेनेतील बंडाळीमुळे एखादी जागा धोक्यात येण्याचीही चिन्हे आहेत.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. आजमितीला मुंब्रा आणि उल्हासनगर, शहापूर या तीन जागांचा अपवाद सोडला तर बाकी अन्य ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीचे आमदार 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यापैकी शहापुरातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी निवडणुकीपूर्वीच हाती शिवबंधन बांधले तर उल्हासनगरातील राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांना भाजपाने प्रवेश नाकारल्याने त्यांना नाईलाजाने पुन्हा राष्ट्रवादीतून उभे रहावे लागले आहे. त्यामुळे आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या राष्ट्रवादीची जिल्ह्यातील स्थिती अधिक दयनीय झाल्याचे चित्र यंदाच्या निवडणुकीत आहे. राष्ट्रवादीची एकमेव निवडून येऊ शकणारी हक्काची जागा म्हणून केवळ मुंब्रा-कळव्यातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या जागेकडे पाहता येईल, बाकी अन्यत्र राष्ट्रवादी आणि कुठेही दिसत नसलेली काँग्रेस यांच्या आघाडीची स्थिती कोमात गेलेल्या रुग्णासारखी झालेली आहे.

- Advertisement -

ठाणे शहरात ठाणे, मुंब्रा, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा असे चार मतदारसंघ आहेत. यामध्ये ठाणे शहर हा भाजपाकडे असून तेथून युतीच्या संजय केळकर यांना मनसेचे अविनाश जाधव यांनी तगडे आव्हान दिले आहे. शिवसेनेला हा मतदारसंघ स्वतःकडे हवा होता. ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी या मतदारसंघात चांगली तयारीही केली होती. मात्र सेनेतील अंतर्गत राजकारणात ठाणे शहर ऐवजी कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपाने सेनेसाठी सोडला आणि नरेश म्हस्केंच्या अपेक्षांवर पाणी फिरले. मात्र म्हस्केंचे अन्य पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध संजय केळकरांसाठी काहीसे डोकेदुखी ठरु शकतात. मात्र राज्यात व देशात भाजपासाठी असलेले अनुकुल वातावरण, मोदींची लोकप्रियता आणि राज्य सरकारची कामगिरी आणि केळकरांमधील सामान्य कार्यकर्ता याच्या जोरावर संजय केळकर येथून बाजी मारतील असे चित्र आहे.

अर्थात सेनेची नाराजी केळकरांना किती फटका देते यावर बरेच काही अवलंबून आहे. कोपरी पाचपाखाडीत पालकमंत्री असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा जोर लावला आहे.

- Advertisement -

तशीच स्थिती ओवळा माजिवड्यातील सेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याबाबतही आहे. सरनाईक यांच्यांसमोर तुल्यबळ आव्हानच नसल्याने आणि त्यात सरनाईक यांनी जोमदार प्रचार यंत्रणा राबवल्याने या मतदारसंघातून ते विजयाची हॅटट्रीक करतील असे चित्र आहे. मुंब्रा कळव्यात सेनेने अभिनेत्री दिपाली सैय्यद यांना ऐनवेळी मैदानात उतरवून काहीसा धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी जितेंद्र आव्हाड यांची या भागावर असलेली एकहाती पकड सेनेला तोडता येणे सध्यस्थितीत तरी शक्य दिसत नाही. त्यात एमआयएमने आव्हाडांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीची बाजू अधिक बळकट झाली आहे.

कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेत बंडाळीमुळे चुरस
सेना-भाजपातील बंडाळीमुळे हे दोन्ही मतदारसंघ युतीला काहीसे तापदायक ठरले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीच्या जागावाटपात सेनेच्या वाट्याला गेला आणि भाजपचे विदयमान आमदार व आताचे अपक्ष उमेदवार यांनी बंडखोरी केली. तर कल्याण पूर्वेत शिवसेनेचे उल्हासनगरातील ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे पूर्वेत भाजपाचे उमेदवार गणपत गायकवाड हे चांगलेच अचडणीत आले आहेत. तर पश्चिमेत नरेंद्र पवार यांच्यामुळे शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांना काहीसा अटीतटीचा सामना करावा लागत आहे. मात्र शिवसेनेची कल्याणातील संघटना भोईर यांच्या विजयासाठी झटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -