सुशीलकुमार शिंदेंना उद्धव ठाकरेंचा सवाल, ‘खाऊन खाऊन थकलात का?’

काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यात एक होऊ शकतात, या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बोलताना टीका केली आहे.

Mumbai
uddhav thackeray sushilkumar shinde

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज दुपारी सोलापूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष भविष्यात विलीन होऊन एक होतील’, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ‘थकण्यासारखं तुम्ही असं केलंय काय?’ असा उपरोधिक सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच, ‘तुमचे नेते कोण असतील हे सुद्धा ठरवून घ्या’, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांनंतर नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

‘खाऊन-खाऊन थकलात का?’

सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सुशीलकुमार शिंदे आजच कुठेतरी म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले आहेत. पण असं काय झालंय तुम्हाला थकायला? इतक्या वर्षांपासून सत्ते राहून खाऊन खाऊन तुम्ही थकलात का? वर म्हणाले, आता आम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. पण एकत्र झाल्यानंतर तुमचे नेते कोण असतील, हे तरी ठरवा. शरद पवार की सोनिया गांधी? हे आधी ठरवून घ्या, नाहीतर पुन्हा त्यावरून तुम्ही भांडाल. आणि भांडून भांडून पुन्हा थकणार’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – ‘पवार म्हणतात, सूडाचं राजकारण; २००० साली त्यांनी काय केलं?’ – उद्धव ठाकरे

काय म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे?

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं, त्याची आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल, तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील. सध्याच्या वातावरणात काँग्रेसही थकली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील थकली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एक होऊ शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते’. सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.

#Live – शिवसेनेचा ५४ वा दसरा मेळावा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 2019