घरफिचर्सभरारी...

भरारी…

Subscribe

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी... ... आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून ... माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर ... मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित "ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर" हे नाटक घेऊन ...घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून.

स्वप्नांची सुरवात

माझी उडाण..

- Advertisement -

आकाशात असल्यासारखं वाटतंय

आता सवय झाली आकाशाची

- Advertisement -

इथून जग अजून सुंदर वाटतंय

अजून आपलंसं वाटतंय

पंखातलं बळ वाढवायचं

आता ढगांमध्ये विसावा घेईन म्हणते

पावसाचं पाणी प्यावे म्हणते

सारं विश्व डोळ्यात सामावून परत धरतीकडे झेप घेईन म्हणते ..

युरोप एक सुंदर खंड … निसर्गाने भरलेला आणि व्याप्त असलेला … भारतीय सिनेमातून आपल्याला अनेकदा याचे दर्शन झाले आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात कधीतरी परदेशवारी करून ते जग पाहण्याची अनुभवण्याची इच्छा जागृत झाली … विदेशात जाणे तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे … निवडक ठिकाण पाहून आनंद घेणे … या सगळ्यात मीही होते पण खरंच एव्हढ्यापुरता आपली मानसिकता मर्यादित आहे का? आपण परदेशवारी करतो पण या परदेशवारीला बघण्याचा आणि अनुभवण्याचा आपला दृष्टीकोन काय असतो? मनोरंजन की शोध … खूप मेहनत करून आपण पैसा कमावतो … आणि आपण मेहनतीने कमावलेला पैसा या सौंदर्याला पाहण्यासाठी खर्च करतो … आयुष्यातील काही चार दिवस मौजमजा करून येतो … पण हा अनुभव कमावणे जमतो का ? की युरोप बघून आलो छान वाटले इथपर्यंत मर्यादित राहतो.

मी निघाले होते युरोपला एक व्यक्ती म्हणून, माझे अस्तित्व घडवण्यासाठी… … आई, बहीण, पत्नी, मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून … माझ्या कलात्मक समर्पणाच्या जोरावर … मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर” हे नाटक घेऊन …घरातून निघून एअरपोर्टपर्यंत केलेला एक तासाचा प्रवास मला खोल विचारात घेऊन गेला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा परदेशात निघाले होते तेही स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून. खरंतर ज्यावेळी स्वप्न प्रत्यक्षात उतरायला लागतात त्यावेळी चटकन विश्वास नाही बसत आणि ही तर स्वप्नापलिकडील गोष्ट होती …कधी हा विचारच केला नव्हता की मी युरोपला जाईन. खरंच मी स्वतःबद्दल हा विचार का कधी केला नाही? का कधी स्वतःवर हा विश्वास ठेवला नाही. माझ्यात उंच भरारी घेण्याचे बळ आहे, ही योग्यता मला ठाऊकच नव्हती. कोणी कधी सांगितले ही नाही.. का सांगितले नाही? माझ्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांच्या, परिजनांच्या डोक्यातही आले नाही .. कारण सतत स्वतःला, स्वतःच्या मानसिकतेला एका चौकटीत अडकून घेतले आहे … स्वप्न पाहण्याची मति कुंठीत झाली आहे… क्षितिजा पल्याड पाहायची सवयच नाहीए.. या चौकटीला तोडत मी निघाले होते माझ्यातील आई, बहीण, मुलगी, सून , बायको या रुपांना

समृद्ध करण्यासाठी माझ्यातल्या अश्विनी नावाच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करण्यासाठी मी निघाले होते.मुंबईचे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आमचा ग्रुप आमच्या भरारीची वाट पाहत होता .. पहिल्यांदा देशाच्या बाहेर पाऊल ठेवणार होते … आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार होते … त्यामुळे उत्सुकता आणि जबाबदारीचे भानही होते … तिथे आम्ही भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून गेलो होतो तिथे एक व्यक्तीपेक्षा माझी ओळख भारत इंडिया ही होती … त्यामुळे माझी वागणूक, माझी क्रिया, माझे बोलणे आणि माझे काम ही माझी नाही तर भारताची छबी निर्माण करत होती… मुंबई एअरपोर्टला पहिल्यांदा इमिग्रेशन फॉर्म भरताना सुरक्षितता, दुसर्‍या जगात जाण्याची भावना निर्माण होत होती …विमानात बसण्याचा अनुभव आधीही होता, पण इंटरनॅशनल प्रवासाची पहिलीच अनुभूती होती … माझं त्यादिवशीचे दुपारचे जेवण मी ढगांवर बसून घेत होते. विमानाच्या खिडकीतून दिसणारे विश्व नवखेच होते. मुंबई सोडून जसे जर्मनीच्या दिशेने प्रवास सुरु केला तसा एक ठळक फरक जाणवला. सगळी जमीन हिरवीगार. जर्मनीला आकाशातून पाहताना जाणवले की जमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर केला गेलाय … चौकोना चौकोनात शेत, टुमदार घरं नाहीतर जंगल होते …कोणताही जमिनीचा भाग रिकामा नाही, ओसाड नाही …असे आकाशात तरंगत ढगांच्या सान्निध्यात माझ्या विचारांची मालिका सुरू होती …

हॅमबर्ग या शहरात आमचे विमान लँड झाले. जर्मनीमधील दुसरे सर्वात मोठे शहर. 18 लाख जनसंख्या असलेले शहर. त्या जमिनीवर पाऊल ठेवताना क्षणभर मनात प्रसन्नता पसरली. ज्यावेळी क्षितिजा बाहेरील स्वप्न खरी होताना जाणवत होती. आयुष्यात एक स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून भूमिका पार पाडताना कधी एक माणूस म्हणून स्वप्न पाहायची आणि ती याच धरातलावर पूर्ण करायची भूमिका सुरू झाली कळलेच नाही.

हम्बर्गला विमानतळावर उतरल्यावर एक सुगंध मनात झिरपला. आयोजक आम्हाला receive करायला आले होते. आपल्याकडे मध्यमवर्ग स्वप्न पाहत असतो की दारात एक चारचाकी गाडी असावी. जर्मनी हा देश कार्स बनवण्यात अग्रेसर आहे. अशा देशात आम्हाला घेण्यासाठीही आयोजक आलिशान कार घेऊन आले होते ड्रायव्हर सह .. पण यात मला सर्वात विशेष वाटले ते आयोजकांचे. ते स्वतः मात्र सायकलवर आले होते, तेही एअरपोर्टला .. आणि सायकलनेच त्यांच्या ऑफिसला जाणार होते. माझा देश कार्स बनवतो. माझ्या दारात कार आहे, पण माझी आवड माझे आरोग्य काय सांगते हे जास्त महत्वाचे वाटले.

जर्मनीमध्ये उतरल्यावर माझा पहिला प्रश्न होता की कर्फ्यु लागला आहे का? कारण गर्दी कुठे आहे ? माणसे दिसतच नव्हती. मुंबईसारख्या शहरात गर्दीची इतकी सवय झाल्यावर गर्दीविरहीत रस्ते पाहणे वेगळेच होते … स्वच्छ वातावरण आणि ठळक जाणवणारी स्वच्छता, शिस्तबद्धता नजरेत भरत होती. परदेशात जागा वेगळी, व्यक्ती वेगळ्या, त्यांची संस्कृतीही वेगळी, खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या या सगळ्या वेगळ्या वाटणार्‍या वातावरणात आपण सामावून जातो ज्यावेळी आपण मनाने मानतो की हे जग माझे आहे. हा विश्वास आपल्याला जगात कुठेही ठामपणे उभे राहायला शिकवतो. भारतातून यूरोपपर्यंतचा प्रवास केवळ शारीरिक नव्हे तर वैचारिक कक्षा रुंदवणारा होता. आता प्रवेश नव्या परिवेशात.. क्रमशः

अश्विनी नांदेडकर ( रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -