घरमहाराष्ट्रएमआयडीसी मार्गावर अवैध पार्किंग

एमआयडीसी मार्गावर अवैध पार्किंग

Subscribe

आपत्कालीन स्थितीत पेच

परिसरातील धाटाव औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीच्या मार्गाला अवैध पार्किंगने अक्षरशः घेरले आहे. एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास मदत कार्यात मोठा अडथळा येण्याची साधार भीती जाणकारांतून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात एमआयडीसीच्या उप विभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील मोठ्या एमआयडीसी क्षेत्रापैकी एक असलेल्या धाटावमध्ये अनेक लहान-मोठे रासायनिक व इतर कारखाने आहेत. तेथे छोट्या-मोठ्या वाहनांची अव्याहत वर्दळ सुरू असते. मात्र थांबणार्‍या वाहनांना पार्किंगची योग्य ती सुविधा नसल्याने ही वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर उभी केली जातात. कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर थांबणार्‍या कामगारांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा आता कळीचा ठरला आहे. सुदर्शन, एक्सेल इंडस्ट्रीज, एफडीसी, दीपक नायट्रेट, अँथिया, रोहा डायकेम अशा मोठ्या कारखान्यांसमोर दुचाकी व चारचाकी वाहनांचे अवैधरित्या पार्किंग होत आहे.

- Advertisement -

या एमआयडीसीमध्ये राजरोसपणे कामगारांची वाहने रस्त्यावर दुभाजक पट्ट्यापर्यंत लावली जात आहेत. यावर कारखाने प्रशासनाने निर्बंध घालून ही वाहने कारखान्याच्या आवारात लावण्यास परवानगी देणे गरजेचे असते. तसे होत नसल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर मदत पोहचण्यास अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अभ्यागतांची वाहने उभी करण्यासाठी कारखान्याच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेचा वापर करावा. वाहतुकीच्या रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्यामुळे अपघाताचा धोका संभावतो. यासंबंधी या आधीही एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना ही सर्व परिस्थिती सांगितली आहे. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे पुन्हा उप विभागीय अभियंत्यांची भेट घेत कामगार व नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेची मागणी केली आहे.
-प्रदीप (अप्पा) देशमुख, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -

एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावर आमच्याकडून संबधित कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र तरीही यावर निर्बंध येत नसल्याने पोलीस प्रशासनास कार्यवाहीसाठी पत्र देणार आहोत.
-मालोजी निंबाळकर, उप विभागीय अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -