घरमहाराष्ट्रनाशिकप्रदुषणमुक्त गोदावरीसाठी केंद्राला साकडे

प्रदुषणमुक्त गोदावरीसाठी केंद्राला साकडे

Subscribe

स्थायी सभापती उध्दव निमसेंनी घेतली पालकमंत्री महाजनांची भेट

ज्या नदीने नाशिकला जगभरात ओळख प्राप्त करुन दिली आहे, त्या गोदावरीला प्रदुषण मुक्त करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन प्रदुषणमुक्तीसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. गोदावरीबरोबर शहरातून वाहणार्‍या इतरही नद्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, या संदर्भात लवकरच महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पालकमंत्र्यांच्या मुंबईतील दालनात होणार आहे.

नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून पर्यटनस्थळ म्हणून देखील शहराचा लौकीक आहे. त्यामुळे शहरात भाविक आणि पर्यटकांचा नेहमीच वावर असतो. येणारा भाविक गोदावरी नदीस आवर्जुन भेट देतो. परंतु नदीपात्रातील प्रदुषणामुळे भाविकांना नाईलाजास्तव नाकाला रुमाल लावला लागतो. शहरातील नंदीनीसह इतर नद्यांची अवस्था तर याहूनही अधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव निमसेंनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने शहरातील सर्व नद्यांचे संवर्धन व स्वच्छता कायम राहील यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंंतर्गत नाशिक महापालिका हद्दीत असणारी गोदावरी व इतर नद्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होऊ शकतो, असे निमसे यांनी यावेळी सुचवले.

- Advertisement -

विशेष उपाययोजनांसाठी मुंबईत बैठक-

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच महापालिकेच्या पदाधिकार्‍यांची बैठक लवकरच मुंबईत घेण्यात येणार आहे. यात गोदावरीसह नंदिनी, दारणा या नद्यांच्या स्वच्छतेच्या व संवर्धनाच्या दृष्टीने यापुढे विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. शिवाय केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संवर्धन योजनेअंतर्गत नाशिकमधील नद्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -