घरUncategorizedकहाणी स्मार्टसिटीतील खड्ड्यांची

कहाणी स्मार्टसिटीतील खड्ड्यांची

Subscribe

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डयांनी डोकी वर काढायला सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डयांचे चांद्रयन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम झाले असले तरी हे खड्डयांतील कोल्डमिक्सचे मटेरियलच वाहून जावू लागले. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डयांनी पुन्हा एकदा मुंबईकरांची वाट बिकट करून टाकली आहे. याबाबत घेतलेला हा आढावा....

माहिममध्ये सावधान!
सिग्नल खड्डयात आहे
माहिममधील लेडी जमशेटजी रोडवरील सिटीलाईट सिग्नलजवळील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजवण्यात आल्यानंतरही पुन्हा या खड्डयांनी पुन्हा तोंड वर काढली आहेत. महापालिकेने हे खड्डे बुजवल्यानंतरही पावसात यातील कोल्डमिक्स वाहून गेल्यामुळे या ठिकाणी खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे. सिग्नललाच हा खड्डे असल्याने वाहने सुरू करून गती घेत नाही तोच या खड्डयांसाठी वाहन चालकांना पुन्हा ब्रेक लावून खड्डयांतून वाचण्याचा प्रयत्न करावा लागतो. या प्रयत्नात वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे.

प्रतीक्षानगरात रस्त्यांची वाट
मुंबईतील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत असले तरी मुंबईच्या सायन परिसरातील प्रतीक्षा नगर येथील संपूर्ण परिसरात खड्ड्यांचे अक्षरश: साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वीच रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले होते. त्यानंतरही याठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने सामान्य नागरिकांनी जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मुंबईतील प्रमुख बेस्ट आगारांपैकी एक आगार याठिकाणी आहे. त्यामुळे याठिकाणी बेस्टच्या वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, त्यानंतरही याठिकाणी खड्यांकडे प्रशासनाचे सुरू असलेले दुर्लक्ष सध्या वादाचा मुद्दा ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी खड्यांचा प्रश्न सातत्याने पुढे येत असतो. पण त्यानंतरही प्रशासनाचे सुरु असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरली आहे. येथील सरदार नगर १ पासून ते पुढे प्रतीक्षा नगरपर्यंत खड्यांमुळे याठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी साचते. त्यामुळे त्याचा थेट फटका वाहतुकीवर देखील पडतो.

- Advertisement -

पश्चिम खड्डेमय मार्ग
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी वाहनचालकांना खड्ड्यांतून वाट काढत आपली वाहने चालवावे लागतात,त्यातून अपघात होण्याची भीती, दुचाकीस्वारांना तर खड्यांमधून वाढ काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले येथे विमानतळ जवळ असंख्य खड्डे पडले आहेत. काही वाहनचालकांच्या तसेच स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या खड्ड्यांमुळे या ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात होत असतात. द्रुतगती महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी दिवस रात्र वाहनांचा मोठा राबता असतो,रात्रीच्या वेळी तर हे खड्डे दिसतसुद्धा नाही. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मी दररोज वांद्रे ते गोरेगांव येथे मोटारसायकलवरून प्रवास करतो, अनेक वेळा या खड्ड्यांमुळे अपघात होता,होता वाचलो असे दुचाकीस्वार श्यामराव कदम यांनी सांगितले. मालाड पश्चिम येथील मालवणी गेट क्र.८ या ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे,जवळच कला विद्यालय आणि पोलीस वसाहत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बेस्ट बस व इतर वाहनांतून प्रवास करताना या खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

पेव्हरच्या रस्त्यांवर डांबराची मलमपट्टी
मुंबईतील रस्त्यांवर असमांतर असलेल्या पेव्हरब्लॉक काढून त्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतरही अद्यापही पेव्हरब्लॉकच्या रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. उलट पेव्हरब्लॉकच्या रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याने या खड्डयातच डांबर टाकून बुजवण्याचे काम महापालिका करत आहे. परंतु ते पेव्हरब्लॉक मात्र काढून टाकले जात नाही.मरिन लाईन्स रेल्वे स्टेशजवळील चंदनवाडी येथील पुलाखाली पेव्हरब्लॉकच्या या भागातील खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा वापर केल्यानंतरही पुन्हा हे डांबर वाहून गेल्याचे दिसून आहे. तर सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डयांत डांबराचा थर चढवला जात आहे, आणि डांबराच्या रस्त्यांवर चक्क पेव्हरब्लॉक चढवले जात आहे.

- Advertisement -

सायन- पनवेल मार्गावर खड्डे
मुंबईतील प्रमुख मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे सायन- पनवेल महामार्ग. सध्या या मार्गावरील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या वाढत्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक व्यवस्थेवर थेट परिणाम होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. यात विशेष करुन चेंबूर परिसरातील डायमंड गार्डन शेजारील हायवेवर, अण्णाभाऊ साठे पुलाच्या अक्षरश: मध्यभागी, पुढे चेंबूर नाक्याजवळ देखील खड्डे असल्याचे दिसून आले आहे. पालिका कर्मचार्‍यांकडून हे खड्डे बुजिवले जातात देखील, पण पाऊस पडल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती जैसे थे होत असल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पालिकेचा खर्च खड्डयांत
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून या वर्षीही ‘कोल्ड मिक्स’चा वापर करणार असल्याचा दावा करण्यात आला होता, यासाठी 15.86 कोटींचा खर्च केला जाणार असल्याचे जाहीर पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, पालिकेचा हा दावा फोल होताना दिसत आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईत ठिकठिकाणच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याचे मुंबईकर मिळत आहे.रस्त्यात खड्डे आहे का ,खड्डयात रस्ते आहे हे वाहन चालवताना कळतच नाही.

खड्ड्यांचे ‘ठाणे’

एकनाथ शिंदेच्या घरासमोरील हे खड्डे

रस्त्यावर एक हजाराहून अधिक खड्डे, ठाणेकर संतप्त

गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डयांची आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे ठाणे आणि केडीएमसी परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मुंब्यात खड्डयांमुळे एका महिलेचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे राहत असलेल्या लुईसवाडी परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून त्याकडे मंत्रीमहोदयांच्या प्रशासनाने लक्ष त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.ठाण्यातील ठिकठिकाणच्या रस्त्यावर १ हजाराहून अधिक खड्डे पडल्याची माहिती खुद्द प्रशासनाने जाहीर केली होती. सर्वाधिक ४३५ खड्डे हे माजीवडा मानपाड प्रभाग समिती अंतर्गत् रस्त्यावर पडले होते. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांची संख्या वाढली होती. खड्डा वाचवित असतानाच मोटारसायकल खड्डयात आदळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र त्यातून पालिका प्रशासनाने कोणताच धडा घेतलेला दिसत नाही.

रस्त्यांचे कल्याण कधी?
केडीएमसी क्षेत्रातील रस्त्याची खूपच बिकट अवस्था आहे. गणेशनगर, जुनी डोंबिवली नाना शंकरशेठ रोड सुभाष रोड आयरे रोड नांदिवली पी एन टी कॉलनी रोड मानपाडा कल्याण रोड आदी रस्ते खड्डयांनी व्यापले आहे. तर एमआयडीसी आणि २७ गावातील रस्त्यांची खपूच दैना झाली आहे. पत्रीपूलावरील खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलीसांनीच पुढाकार घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएसआरडीसी व पालिका प्रशासनाला जाग आली. जुनी डोंबिवली परिसरातील रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक ठिकाणी रिक्षा चालक भाडे नाकारत आहेत. मुसळधार पावसामुळे खड्डयांच्या समस्येत आणखीनच भर पडल्याचे कारण प्रशासनाला मिळाले असले तरी खड्डयांमुळे होणारे अपघात यामुळे प्रशासनाने तातडीने खड्डे दुरूस्त करावेत, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -