घरफिचर्सऐका पुढल्या हाका...!

ऐका पुढल्या हाका…!

Subscribe

निसर्ग जगवतो आणि मारतोही

गेले काही दिवस महाराष्ट्रात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात तसेच पूर्व विदर्भात पूर परिस्थिती होती. त्याचवेळी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाने हात आखडता घेतला. एका बाजूला धो धो म्हणून डोळ्यात पाणी आणि दुसर्‍या बाजूला वावरात पाणी नाही म्हणूनही जीव कासावीस झालेला…काय भयाण स्थिती आहे, असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. मानवच या विनाशाला कारणीभूत आहे. पुढल्या हाका ऐकल्या नाही तर जो निसर्ग जगवतो तो मारणाराही ठरेल.

सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यात श्रावण सुरू झालाय. ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडामधूनी अवचित मोरपिसारा…’ असं गुणगुणावंस वाटत असताना

- Advertisement -

‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी…
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली…
नको नाचूं तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सातेली पातेली, आणू भांडी मी कोठून…

अशी आर्त साद कवी इंदिरा संत पावसाला घालत आहेत, पण तो काही ऐकायला तयार नाही. तरीही त्या वरूणाला त्या ना ना प्रकारे विनवण्या करत आहेत. शेवटी त्या म्हणतातही…

- Advertisement -

आडदांडा नको येऊ, झेपावत दारातून…
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून…
पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन…
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन…

गेले काही दिवस महाराष्ट्रात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात तसेच पूर्व विदर्भात पूर परिस्थिती होती. या भागातील बायाबापडे इंदिरा बाईंप्रमाणे पावसाकडे धिंगाणा घालू नको म्हणून विनवण्या करत होते, मात्र तो काही ऐकायला तयार नव्हता. ढगफुटी झाल्यासारखा बरसून गेला आणि होत्याचे नव्हते केले. त्याचवेळी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात त्याने हात आखडता घेतला. एका बाजूला धो धो म्हणून डोळ्यात पाणी आणि दुसर्‍या बाजूला वावरात पाणी नाही म्हणूनही जीव कासावीस झालेला…काय भयाण स्थिती आहे, असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. मानवच या विनाशाला कारणीभूत आहे. पुढल्या हाका ऐकल्या नाही तर जो निसर्ग जगवतो तो मारणाराही ठरेल.

पृथ्वीवर गेल्या लाखो वर्षांपासून वातावरण, हवामान आणि पर्यावरण याचा निसर्ग नियमाप्रमाणे समतोल राखला जात होता. सर्व सजीवांचा विकास सुद्धा अशाच पर्यावरणात झाला. सर्व नैसर्गिक हरितगृह वायू, प्रदूषके आणि कर्बवायू शोषून घेण्याची क्षमता जंगलांत होती, मानव आणि सजीवांचे पोषण करण्याची क्षमता वनांत होती, मानव-सजीवांचे संरक्षण करण्याची ताकद पर्यावरणात होती. परंतु मानवाच्या वैज्ञानिक व यांत्रिक प्रगतीमुळे जीवनाचा आधार असलेली वने आपण तोडायला सुरुवात केली, औद्योगिक क्रांतीच्या नावावर प्रदूषण वाढले, शहरीकरण झाले, लोकसंख्या वाढू लागली आणि ज्या आधारावर सृष्टीची रचना झाली तो आधारच आपण हळूहळू काढून टाकायला सुरुवात केली. आता त्याचेच परिणाम तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाने आपण पाहत आणि अनुभवत आहोत. थर्मल पॉवर स्टेशन्स, सिमेंट उद्योग आणि विविध कारखान्यांमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे ओझोन थर विरळ होणे, धृवावरील बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती… अशी ही मालिका निर्माण झाली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा निर्माण होऊन मानवाचे आयुष्य वाढले, लोकसंख्या प्रचंड वाढली, त्यामुळे जंगले, वन्यजीव आणि नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येऊन ते नष्ट होऊ लागले. शेवटी या सर्वांचा परिणाम भविष्यात मानवावरच होणार असून मानवाचे पृथ्वीवर राहणे कठीण होणार आहे.

पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यात वातावरण, हिम आणि बर्फ, नद्या, सागर तसेच महासागर, इतर जलयंत्रणा तसेच अनेक सजीव यांची परस्परावलंबी आणि महत्त्वाची भूमिका असते. या संपूर्ण हवामान प्रणालीस ऊर्जा पुरवण्याचे काम सूर्य करतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर आली असती तर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. परंतु सूर्याच्या सरळ येणार्‍या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूंच्या पडद्यामुळे शक्य होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे या वायूंच्या पडद्यावर वाईट परिणाम होत आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान हळूहळू वाढत आहे. आता तर, २१ वे शतक संपेपर्यंत हवामान बदलामुळे जागतिक तापमान सुमारे चार ते सहा अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे. म्हणूनच की काय हवामान बदलाच्या दुष्परिणामांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनावर विपरित प्रभाव टाकायला सुुुरुवात केली आहे. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे सृष्टीच्या हवामानात कमालीचे बदल घडत आहेत. म्हणूनच हवामान बदलाचे आव्हान मानवजातीपुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही समस्या सर्व जगाला भेडसावत आहे.

अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यासोबत त्याचे शेतीवर आणि कृषीशी निगडित इतर उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहेत. अगोदरच शेतीच्या उत्पादन वाढीच्या तंत्रात किडी आणि रोगामुळे होणार्‍या नुकसानीचा महत्त्वाचा अडथळा आहे. त्यात या हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रतेचा आणि तापमानाचा अचानक चढ-उतार अशा बाबींची सुरुवात झाली आहे. भविष्यात किडी-रोगांच्या उत्पत्तीमध्ये निश्चित वाढ होण्याची किंवा काही वेळा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हवामान बदल होण्याची कारणे आणि त्याचे शेतीवरील दुष्परिणाम काय आहेत, हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. हवामान बदलाचे संभाव्य दुष्परिणाम समस्त मानवजातीसाठी विशेषत: भारतासारख्या इतर विषुववृत्तीय प्रदेशांतील विकसनशील देशांसाठी घातक ठरू शकतील. हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रदूषण ही सर्वच देशांची एक महत्त्वाची समस्या बनली आहे. आपण जी जीवनशैली अवलंबली आहे, तीच निसर्गाला मारक ठरत आहे. त्यामुळे जल, थल आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. विकसित आणि विकसनशील देशांत मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विकास झाला, त्यात कोळसा ऊर्जा प्रकल्प हे जगातील सर्वात जास्त वायूप्रदूषण करणारे उद्योग ठरले. त्यातून जागतिक तापमान वाढविणारा कार्बन डाय ऑक्साइड आणि सोबत सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, मिथेन इ. घातक वायू उत्सर्जित होतात. तर सिमेंट उद्योग, कागद उद्योग, रसायन उद्योग इत्यादीतून मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होत आहेत. भारतात आज ५७ % ऊर्जा ही कोळशापासून तयार होते. चीन, अमेरिका, भारत आणि रशिया जगात सर्वात जास्त कर्बवायू उत्सर्जन करीत आहेत. ते त्वरित कमी करणे गरजेचे आहे. शहरात काँक्रीट आणि वायू प्रदूषण यामुळे ‘हिट आयर्लंड’ परिणाम जाणवतो आणि पाऊस कमी किंवा अति जास्त पडतो. समुद्राच्या तापमानात वाढ होऊन ‘अल-नीना’, ‘ला-नीना’ परिणाम होतो आणि त्यामुळे मोसमी पावसावर परिणाम होतो.

गेल्या १०० वर्षांच्या तापमानाचा इतिहास बघता, आपल्याला तापमान वाढ केव्हापासून सुरू झाली हे कळते. नासा आणि भारतीय हवामान विभागाची आकडेवारी तपासल्यास १९८६ नंतर पृथ्वीचे तापमान वाढू लागले. तर अत्याधिक तापमान वाढायला २००१ पासून सुरुवात झाली. २०१० पासून दर वर्षी तापमान वाढीचे नवनवे विक्रम नोंदले गेले. शेवटचे २०१८ वर्ष हे गेल्या १५० वर्षांतील सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले आहे. २०१० पासूनच जगात धृवावरील बर्फ, ग्लेशिअर्स वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, थंडीत-उष्णतेची वादळे, चक्रीवादळे, ढगफुटी अशा विविध नैसर्गिक आपत्तीत वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

भारत हा देश उष्ण कटिबंधीय देश आहे, त्यामुळे हवामानातील थोडा बदलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. भारतीय हवामान विभागाची १८८६ पासून १९८६ ची १०० वर्षांची हवामानाची आकडेवारी मी तपासली असून आपला देश किती भयावह स्थितीकडे जात आहे, ह्याची त्यातून कल्पना येते. भारतीय हवामान खात्याने ३० वर्षांचा हवामान बदलाचा काळ ठरविला आहे. त्यानुसार १९०१-१९३० हा कोरडा काळ, १९३१-१९६० हा ओला काळ, १९६१-१९९० हा पुन्हा कोरडा काळ, तर १९९१-२०२० हा ओला काळ ठरविला आहे. यात भारताने १९ कोरडे दुष्काळ, तर १३ ओले दुष्काळ पाहिले आहेत. या सर्व कालखंडात भारतात अपवाद वगळता कधीच अत्याधिक हवामान बदलाच्या घटना दिसल्या नाही. परंतु भारतात झालेली प्रचंड जंगलतोड, थर्मल पॉवर स्टेशन्सच्या संख्येतली वाढ आणि इतर अनेक उद्योगांतून होणारे वायू प्रदूषण, यामुळे २००१ पासून भारतात अत्याधिक हवामान बदलाच्या घटना घडू लागल्याचा माझा निष्कर्ष आहे. या घटना २०१० पासून वाढत जाऊन २०१८ पर्यंत ही तापमान वाढ आणि हवामान बदलाची घोडदौड अव्याहत सुरू आहे.

निसर्ग हा सजीव आणि निर्जीव पदार्थांपासून बनला असून ते दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. जीवनाचा पाया असलेले जंगल, हे अतिशय महत्त्वाचे आहे. सजीवांना प्राणवायू आणि अन्न देऊन जीव जगवणारी, तापमान वाढविणारा कर्ब वायू नियंत्रित करणारी वनेच आहेत. परंतु आपण तीच तोडून आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. आता पृथ्वीचे आणि प्रादेशिक वाढते तापमान कमी करायचे असेल, तर सर्वात उत्तम आणि मोठा उपाय म्हणजे युद्धपातळीवर वृक्ष लागवड आणि वनीकरण हे होय. तापमान वाढविणारा दुसरा घटक म्हणजे कर्ब वायू. त्याचे उत्सर्जन पूर्ण कमी करणे गरजेचे आहे. कोळसा आधारित सर्व वीज आणि इतर प्रदूषण करणारे उद्योग त्वरित बंद करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत (सोलर, विंड, हायड्रो आणि बायो एनर्जी) वाढवले पाहिजेत. आपली उद्योग आधारित अर्थव्यवस्था बदलून वन, वृक्ष, शेती आणि निसर्ग आधारित चिरंतन अर्थव्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे. आपण आपले चैनीचे जीवन बदलून निसर्गाला पूरक अशी जीवनशैली आता अंगीकारली पाहिजे.

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी प्रस्तावित करून राज्य सरकार लोकांच्या आणि निसर्गाच्या जीवाशी खेळत आहे. केरळवरून सुरू होणार्‍या पावसाची साखळी कोकणातून मग सर्व राज्यात पसरते. विकासाच्या नावाखाली ही साखळी आणि पश्चिम घाटातील जैव विविधता आपण मारायला घेतली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार ३० कोटी झाडे लावण्याची गर्जना करत असली तरी आधी आपल्याला काय हवे आणि काय नको याचा विचार झाला पाहिजे. विकासाच्या नावाखाली विनाश होणार असेल तर तो कोणालाच नको आहे. उद्या विनाश झाला तर विकासाची दाखवलेली स्वप्ने पाहण्यासाठी कोणी शिल्लक तर राहिला पाहिजे ना… विजेसाठी अणुऊर्जा आणि इंधनासाठी ग्रीन रिफायनरी एवढे साधे गणित या दोन महाकाय प्रकल्पांमागे नाही, त्यात आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा रॅकेट आणि तेल माफियागिरी गुंतली आहे. अमेरिका आणि युरोपने हद्दपार केलेल्या या प्रकल्पांना लाल पायघड्या घालताना संबंधितांना हजारो कोटी कमावून आपल्या सात पिढ्यांचे कल्याण करायचे आहे… पण कोणाचे कल्याण करायला निसर्ग कोणालाच पुढे शिल्लक ठेवणार नाही. भारताला त्याने गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमधून इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यातील पूर ही त्याची एक झलक आहे. आपण निसर्गाला जपले नाही तर भविष्य आणखी अंधारमय होऊन जाईल.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -