घरमहाराष्ट्रनाशिकविधानसभेत लोकसभेचीच पुनरावृत्ती?

विधानसभेत लोकसभेचीच पुनरावृत्ती?

Subscribe

नाशिक जिल्ह्यात भाजप-सेनेचा बोलबाला असला तरी अंतिम क्षणी युती तुटली नाही तरच त्यांना दुहेरी आकडा गाठता येणे शक्य होणार आहे. तद्वतच आधीच गाळात गेलेले विरोधक निकालानंतर अधिक गर्भगळीत होतील. छगन भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाच्या बातम्या हवेत विरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागणारे निवडणूक निकाल राजकीयदृष्ट्या कूस बदलणारे ठरतील...

राज्य विधानसभा निवडणूकीचा शंखनाद होण्यास थोडाच अवधी शिल्लक राहिला असताना विरोधकांच्या मेगागळतीने सत्ताधाऱ्यांच्या सिंधूला उधाण आले आहे. शतप्रतिशत राजकीय सोयीसाठी असलेल्या पक्षांतर प्रक्रियेची जनमाणसांतून विपरित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मतदारसंघाच्या विकासाची ढाल पुढे करण्यात चाणाक्ष राजकारण्यांत चढाओढ लागलेलीही दिसून येतेय. नाशिक जिल्ह्यात भाजपसेनेचा बोलबाला असला तरी अंतिम क्षणी युती तुटली नाही तरच त्यांना दुहेरी आकडा गाठता येणे शक्य होणार आहे. तद्वतच आधीच गाळात गेलेले विरोधक निकालानंतर अधिक गर्भगळीत होतील. छगन भुजबळ यांच्या सेनाप्रवेशाच्या बातम्या हवेत विरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागणारे निवडणूक निकाल राजकीयदृष्ट्या कूस बदलणारे ठरतील

नाशिक जिल्ह्यात लोकसभेच्या अडीच मतदारसंघातील पंधरा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. पैकी पाच मतदारसंघ राखीव तर दहा सर्वसाधारण श्रेणीत मोडतात. सन २०१४ च्या निवडणूकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी चार, काँग्रेसने दोन तर माकपने एक जागेवर कब्जा करीत आपापले राजकीय प्राबल्य सिध्द केले होते. अर्थात, तत्कालीन परिस्थितीत युती वा आघाडी नसल्याने राजकीय पक्षांसोबत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यंदाच्या निवडणूकीचे रंग काही औरच आहेत. विरोधकांची शकले उडाली आहेत, तर सत्ताधाऱ्यांचा भरभरून राजकीय अभ्युदय झाला आहे. मतदारराजाने काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणूकीत दिलेला कौल पाहता आता त्यामध्ये फार बदल होण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत योग्य उमेदवार मिळतील का या चिंतेने विरोधकांना ग्रासलेय तर मतदारसंघ निहाय डझनअर्धाडझन इच्छुक पुढ्यात ठाकल्याने कोणाच्या पदरात तिकीटाचे दान टाकावे, या चिंतेत सत्ताधारी असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरातील तीनही मतदारसंघात तिकीटासाठी चढाओढ आहे. नाशिक मध्य मध्ये भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांच्यापुढे माजी आमदार वसंत गीते, हिमगौरी आहेरआडके, विजय साने या स्वकीयांनी आव्हान उभे केले आहे. इथे काँग्रेसकडून डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, डॉ. शोभा बच्छाव यांची नावे आहेत. नाशिक पश्चिमधील लढत दोन हिऱ्यांमध्ये राहील असे वरकरणी दिसत असले तरी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षातील दिनकर पाटील, प्रदीप पेशकार, मयूर अलई, शशीकांत जाधव यांची समजूत काढणे गरजेचे ठरणार आहे. सीमा हिरे यांच्यापुढे राष्ट्रवादीचे डॉ. अपूर्व हिरे यांचे कडवे आव्हान राहणार आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब सानप यांची बाजू भक्कम वाटत असली तरी पालकमंत्र्यासोबत बिघङलेले संबंध लक्षात घेता त्यांना ‘मेकओव्हर’ करताना नाकीनाऊ येणार आहे. पक्षातील उध्दव निमसे , गणेश गीते हे सानपांचे गणित बिघडवू शकतात. काँग्रेस आघाडीकडून इथे फार प्रभावी नाव नसले तरी पक्षांतर्गत घडामोडींमुळे सानप यांना दगाफटका होऊ शकतो.

- Advertisement -

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या देवळाली मतदारसंघात ‘सबकुछ घोलप’ अध्यायाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर घोलपांची सलग सहा निवडणूकांपासून पकड आहे. यावेळी योगेश घोलप पुन्हा सेनेचे उमेदवार असण्याची शक्यता असून राष्य्रवादीकडून त्यांना लक्ष्मण मंडाले यांचे आव्हान मिळू शकते. राजकीयदृष्ट्या स्फोटक असलेल्या सिन्नरमध्ये शिवसेनेचे राजाभाऊ वाजे विरूध्द अपक्ष माणिकराव कोकाटे असा सामना होण्याची अधिक शक्यता आहे. इगतपुरीत काँग्रेस त्यागून शिवबंधन बांधलेल्या निर्मला गावीत यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असून मैदानातील उमेदवार गावीतांची घोडदौड कशी रोखतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिंडोरी मतदारसंघात पक्षांतर केले नाही तर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळच उमेदवार असतील. त्यांपुढे सेनेकडून धनराज महाले व रामदास चारोस्कर या माजी आमदार अथवा पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावीत यापैकी कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत औत्सुक्य आहे. निफाडमध्ये शिवसेनेचे अनिल कदम पक्षात पाय रोवून असले तरी भाऊबंदकीचे राजकारण त्यांना दगाफटका करू शकते. त्यांचे चुलतबंधू यतिन कदम गेल्या चार वर्षांपासून निवडणूक तयारीच्या दृष्टीने जनसंपर्क ठेऊन आहेत. राष्ट्रवादीकडून दिलीप बनकर पुन्हा शड्डू ठोकणार असण्याची चिन्हे असल्याने दोन कदम आणि एक बनकर अशा सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. चांदवडदेवळा मतदारसंघात रगड विकासकामे केल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या डॉ. राहुल आहेर यांचे राजकीयदृष्ट्या आरोग्य बिघडवण्यास स्वपक्षातील त्रिमूर्ती सज्ज झाली आहे. डॉ. राहुल यांचे चुलतबंधू केदा आहेर, चांदवड कृउबा समिती चेअरमन डॉ. आत्माराम कुंभार्डे व चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल येनकेन प्रकारे आमदारकी मिळवायची या जिद्दीने कामाला लागले आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे कडवे आव्हान मोडून काढण्यासाठीही भाजप उमेदवाराला जीवाचे रान करावे लागणार आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या येवला मतदारसंघात ‘स्ट्राँगमॅन’ छगन भुजबळ हे उमेदवार असणार, हे नक्की असले तरी त्यांचा पक्ष अजून ठरायचा आहे. ते राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले तर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आणि शिवसेनेचा उमेदवार कोण, यावर येथील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे. शेजारच्या नांदगावकरांना यावेळी पंकज भुजबळ नकोसे झाल्याने राष्ट्रवादी उमेदवारी बदलून सनदी अधिकारी बाजीराव शिंदे यांना संधी देतो का, याबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. शिवसेनेकडून ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी हा मतदारसंघ भाजपला दिला जाण्याची शक्यताही आहे. तसे झाल्यास भाजपकडून जि. . सभापती मनिषा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आदिवासीबहुल कळवणमध्ये सध्या माकपचे जीवा गावीत प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांना सध्या राष्ट्रवादीत, मात्र भाजप प्रवेशाच्या चर्चेत असलेल्या नितीन पवार यांचे कडवे आव्हान असणार आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व एन. डी. गावीत यांच्याही नावाची भाजपकडून चर्चा आहे. बागलाणच्या विद्यमान आमदार दिपीका चव्हाण सध्या राष्ट्रवादीत असल्या तरी त्या शिवसेनेत जाण्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास ही जागा वाटेला असलेल्या भाजपची त्यांच्याबद्दलची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण, यावर चव्हाण यांच्या विजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे. मालेगावच्या मध्य व बाह्य मतदारसंघांमध्ये सध्या अनुक्रमे काँग्रेसचे आसिफ शेख व शिवसेनेचे दादा भुसे आमादारकी राखून आहेत. पैकी शेख यांना एमआयएमच्या मौलाना मुफ्ती यांचे आव्हान राहण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री पदावर असणाऱ्या दादा भुसे यांना भाजपसोबतची युती तारणार, असे सध्या चित्र आहे. इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत अनिश्चितता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा – भाऊबंदकीतील ‘आहेर’ ठरणार डॉ. आहेरांची डोकेदुखी!


एकूणच विचार करता विधानसभा निवडणूका भाजपशिवसेनेने युतीमध्ये लढल्या गेल्या आणि निर्णायक दगाफटका न झाल्यास त्यांच्या पदरात बारातेरा जागांचे दान पडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आघाडीच्या वाटेला साधारण दोन ते तीन जागा येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गणितांची जुळवण जितकी महत्वाची आणि तितकाच मतदारराजाच्या मनाचा ठाव घेणेही निर्णायक ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -