घरमहाराष्ट्रभाऊबंदकीतील ‘आहेर’ ठरणार डॉ. आहेरांची डोकेदुखी!

भाऊबंदकीतील ‘आहेर’ ठरणार डॉ. आहेरांची डोकेदुखी!

Subscribe

स्थापनेपासूनच प्रादेशिक अस्मितेच्या जोखडात अडकलेल्या चांदवड-देवळा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा नशीब आजमावण्यासाठी विरोधकांपेक्षा स्वकीयांचाच फेरा पार करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता भाऊबंदकीतील ‘आहेर’ही डॉ. आहेर यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता गडद झाल्याने मतदारसंघातील जनता सध्यातरी संभ्रमात आहे.

२०१४ च्या निवडणुकीत दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांचा शब्द प्रमाण मानून पक्षश्रेष्ठींनी त्यांचे सुपूत्र डॉ. राहूल यांना चांदवड-देवळ्याची सुभेदारी बहाल केली होती. तत्कालीन परिस्थितीत युती-आघाडीचा मामला नसल्याने तसेच, चांदवड तालुक्यातील तीन प्रबळ उमेदवार उभे ठाकल्याचा लाभ होऊन डॉ. आहेर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. तथापि, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने डॉ. आहेर यांचा लढा यावेळी तिकीटापासून सुरू होणार आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी गतवेळी अपक्ष उमेदवारी करून ३० हजारांच्या घरात मते प्राप्त केली होती. शिवसेनेच्या नितीन आहेर यांना २९ हजार मतांचे दान मिळाले होते. तर, काँग्रेसच्या शिरीष कोतवाल यांनी चांगली लढत देत ४४ हजारापर्यंत मते खेचली होती. लाखभर मतदान असलेल्या देवळा तालुक्यातील एकमेव उमेदवार म्हणून तसेच, जनमाणसात चांगली प्रतिमा राखलेल्या बंधू केदा आहेर यांच्या मेहनतीचा लाभ डॉ. आहेर यांना झाला होता. यंदाच्या निवडणुकीत डॉ. कुंभार्डे यांच्यासह चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी मैदानात उतरण्याची तयारी केल्याची चर्चा आहे; शिवाय, डॉ. आहेर यांचे बंधू केदा यांनाही आमदारकी खुणावत असल्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

गतवेळी अनुकूल वातावरण असताना केवळ दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांच्या शब्दाखातर केदा आहेर यांनी डॉ. राहुल यांच्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी पुढील निवडणुकीत संधी देण्याचा शब्द केदा आहेर यांना देण्यात आला होता. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. तथापि, दुसरीकडे डॉ. राहुल यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केल्याने मतदानाचा ‘आहेर’ नेमका कुठे करायचा, अशा द्विधा मनःस्थितीत तालुक्यातील मतदार आहेत. परिणामी,विद्यमान आमदारांसह पक्षातच चार प्रबळ इच्छुकांमुळे पक्षश्रेष्ठींची तिकीट वाटप करताना मोठी कसरत होण्याची शक्यता आहे.

केदा आहेरांची भूमिका निर्णायक
देवळा ग्रामपंचायत, जिल्हा बँक, बाजार समिती, वसाका, जिल्हा मजूर संघ इ. संस्थांच्या माध्यमातून कर्तृत्वाची मोहोर उमटवणार्‍या केदा आहेर यांच्यातील दांडगा जनसंपर्क, डॅशिंग नेतृत्व, झटपट निर्णयक्षमता या बाबी तालुक्यातील जनतेच्या पसंतीस उतरल्याने या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षित निर्णय घेतल्यास त्यांचे ‘उपद्रव मूल्य’ सिद्ध होऊ शकते. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल आहेर हे विधानसभा निवडणुकीत केदा आहेर यांना चाल देतात की, त्यांच्या सहकार्याचा हात हाती घेऊन दुसर्‍यांदा कमळ फुलवण्याची किमया साधतात, याकडे चांदवड-देवळ्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -