घरक्रीडास्फोटक कामगिरीनंतरची सुवर्णझळाळी!

स्फोटक कामगिरीनंतरची सुवर्णझळाळी!

Subscribe

दोहा येथील खलिफा स्टेडियममध्ये, गरम हवामानामुळे अ‍ॅथलिट्सना घाम फुटला तर समजू शकतो. परंतु, ३ आणि ४ ऑक्टोबरच्या रात्री महिलांच्या अनुक्रमे ४०० मीटर्स आणि ४०० मीटर्स हर्डल्स शर्यतींतील स्फोटक कामगिर्‍या बघून, अतिशयोक्ती करुन बोलायचं, तर ट्रॅकलाच दरदरून घाम फुटला असं म्हटलं पाहिजे! दोन दिवसांतल्या दोन अफाट आणि अचाट कामगिर्‍यांनी जगभरच्या अ‍ॅथलेटिक्स शौकिनांना पार पागल करून टाकलं. अवघ्या ४८ आणि ५३ सेकंदांच्या आत ट्रॅकवरील दोन सुवर्णसुंदरींच्या दोन अविस्मरणीय शर्यती पाहून स्टेडियममध्ये एकाच कल्ला झाला. खरं तर प्रेक्षकांचा कलेजाच खल्लास झाला!

३ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार ४ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी) सुरु झालेल्या शर्यतीत, मूळच्या नायजेरियन असलेल्या, पण १६ व्या वर्षांपासून बहारिनसाठी धावणार्‍या साल्वा नासेरने सुरुवातीपासूनच आघाडी घेऊन ३०० मीटर्सच्या वळणावर मुसंडी मारून ४८.१४ सेकंदांच्या महाविक्रमी वेळेत शर्यत पूर्ण करून आजवरच्या ४०० मीटर्स शर्यतीत तिसरी सर्वोत्तम वेळ दिल्याचं जाहीर होताच, आश्चर्यचकित झालेल्या साल्वा नासेरला भानावर यायला किंचित वेळच लागला! त्या शर्यतीचा धडाका एवढा जोरदार होता की, तिच्यापाठी येणार्‍या शॉन मिलर यूबोने बहामा देशाचा राष्ट्रीय विक्रम मोडला. तिच्यापाठच्या जमैकन अ‍ॅथलिटने आणि दोन अमेरिकन अ‍ॅथलिट्सनी स्वतःच्या सर्वोत्तम वेळा नोंदवल्या. आता तुम्ही म्हणाल, साल्वा नासेरच्या विक्रमाअगोदरच्या पहिल्या दोन विक्रमी कामगिर्‍या कोणत्या?

- Advertisement -

खरं तर कहाणी या टप्प्यावर सुरु होते! पहिली कामगिरी १९८३ सालच्या हेलसिंकी येथील पहिल्यावहिल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत झाली. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम जर्मनी असे दोन देश अस्तित्वात होते. बर्लिनची भिंत पडायची होती. आत्ताचे स्लोव्हाकिया आणि चेक रिपब्लिक असे दोन देश मिळून तेव्हा झेकोस्लोवाकिया नावाचा एकच देश होता. अशा परिस्थितीत १९८० साली अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिकवर, तर १९८४ साली रशियन धार्जिण्या संघानी १९८४ सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर बहिष्कार घातल्याने जागतिक अ‍ॅथलेटिक्सविश्व थोडं ढवळून निघालं होतं. परंतु, मजा अशी की, त्यावेळी एकमेकांशी स्पर्धा करायला मिळणार म्हणून जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत भाग घेण्यासाठी, आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी जगभरातले अ‍ॅथलिट्स हेलसिंकी येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत भाग घ्यायला उत्सुक होते.

त्यावेळी ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत झेकोस्लोवाकियाच्या यर्मिला क्रॅटॉचविलोवाने ४७.९९ सेकंदांचा विश्वविक्रम केला होता! तो विश्वविक्रम आणखीन केवळ दोनच वर्षांनी, हेलसिंकीच्या शर्यतीत यर्मिला क्रॅटॉचविलोवापाठी येणार्‍या पूर्व जर्मनीच्या मारिटा कॉचने केला होता. १९८५ साली कॅनबेरा येथे वर्ल्डकपमध्ये धावताना मारिटाने ४०० मीटर्स शर्यतीत ४७.६० सेकंदांचा विश्वविक्रम केला, जो आजपर्यंत कायम आहे. मारिटा कॉच आणि यर्मिला क्रॅटॉचविलोवा उत्तेजक सेवनात सापडल्या नसल्या, तरीही त्यांच्या विक्रमाकडे संशयाने पाहिलं जातंय! पूर्व जर्मन मारिटा कॉचचा विक्रम मोडणं हे अशक्य कोटीतलं काम आहे असं वाटत असतानाच, बहारिनच्या साल्वा नासेरची ही स्फोटक कामगिरी जगाला बघायला मिळाली. मारिटा कॉचच्या विक्रमाचा ४७.६० सेकंदांचा आकडा हा सार्‍या जणींना इतका भयप्रद वाटत होता की, ४०० मीटर्सच्या शर्यतीत आणखीन काही करण्यासारखं मारिटा कॉचने ठेवलं नाही, असं समजून बर्‍याच जणी ४०० मीटर्स हर्डल्स शर्यतीकडे वळल्या. तेथूनच ४०० मीटर्स हर्डल्सची दुसरी कहाणी सुरु होते.

- Advertisement -

४ ऑक्टोबरच्या रात्री दोहात, ९ वाजून ३० मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार ५ ऑक्टोबरला रात्री १२ वाजता) महिलांची ४०० मीटर्स हर्डल्स शर्यत सुरु झाली. केवळ दोन महिन्यांपूर्वी ४०० मीटर्स हर्डल्स शर्यतींत विश्वविक्रम करणारी अमेरिकेची दलिला मुहंमद, खलिफा स्टेडियममधील फास्ट ट्रॅक आणि दलिलाला कांटे की टक्कर देणारी तिची मैत्रीण सिडनी मॅकलॅफिन या जुळून आलेल्या मेतकुटामुळं ४०० मीटर्स हर्डल्स शर्यतीत विश्वविक्रम होणार असे जाणकारांना वाटत होतं. दलिलाने पूर्ण जोर लावून शेवटचा अडथळा पार केल्यावर सिडनीची मुसंडी थोपवताना अशी काय कमाल केली की बस्स, बघतच बसावं! तंत्रकुशल सफाईने अडथळे ओलांडायची कसे आणि शेवटच्या अडथळ्यानंतर अंतिम रेषा दिसत असताना, प्रतिस्पर्ध्याची जोरदार मुसंडी थोपवताना आपली ताकद कशी पणाला लावायची याचं प्रात्यक्षिकच दलिलाने दाखवलं. विश्वविक्रमाने बेभान झालेलं स्टेडियम शांत व्हायला अंमळ वेळच लागला. दलिलाने ५२.१६ सेकंदांची वेळ नोंदवली.

वरील दोन कहाण्यांमध्ये आपली भारतीय कहाणीपण एकदम फिट्ट बसते बरं का! भारताची पी.टी. उषाने १९८५च्या कॅनबेरा वर्ल्डकपमध्ये मारिटा कॉच आणि यर्मिला क्रॅटॉचविलोवा यांच्यापाठी धावताना ५१.६१ सेकंदांची वेळ देत दीर्घकाळ राहील असा भारतीय विक्रम केला होता! अलिकडेच हिमा दासने तो सुधारला. परंतु, उषाचा १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील ५५.४२ सेकंदांचा भारतीय विक्रम अजूनही कायम आहे. आज भारताच्या दृष्टीनं विशेष चिंतेची बाब ही आहे की, ४०० मीटर्स हर्डल्समधील विक्रम अजूनही मोडला जात नाहीये. तिकडे तडफेने धावणार्‍या हिमा दाससमोर अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकला आहे. हिमाची ४०० मीटर्स धावण्यातील सर्वोत्तम वेळ ५०.७९ सेकंद अशी आहे. तिच्या वेळेपेक्षा दोहात पाच जणींची चांगली वेळ दिली, ही गोष्ट हिमासाठी आणि भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे. जगभरात आपल्या स्फोटक कामगिर्‍यांनी अ‍ॅथलिट्स विक्रमात न्हाऊन निघत असताना, भारतीय अ‍ॅथलिट्सच्या विक्रमी कामगिर्‍या किंवा स्वतःच्या सर्वोत्कृष्ट कामगिर्‍या निष्प्रभ ठरल्याचे कुणाच्याच लक्षात येऊ नये, हे वास्तव क्लेशकारक आहे.

–उदय ठाकूरदेसाई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -