घरफिचर्सतेल लावलेला पैलवान : माती ते मॅट

तेल लावलेला पैलवान : माती ते मॅट

Subscribe

बारामतीच्या पैलवानाने आतापर्यंत अनेक कुस्त्या गाजवल्या होत्या. छडी टांग, कुंडी डाव टाकून या पैलवानाने अनेकांना चितपट केलं होतं. कित्येकजण गारद केले होते. पंचक्रोशीत कित्येक वर्ष त्याचंच नाव होतं. अनेकांना ऐनवेळी नवा डाव टाकून आखाड्याच्या बाहेर देखील या पैलवानाने ठेवले होते. पण सत्ता आणि ताकद जास्त काळ राहत नाही असं म्हणतात त्या प्रमाणे दिवसेंदिवस या पैलवानाची ‘पावर’ दिवसेंदिवस कमी होत जात होती.

कुस्तीचे दिवस आता बदलले होते. मातीतील कुस्ती आता मॅटवर आली होती. मॅटवर आता चमकून जिंकण्याची कला नव्या पैलवानांना आली होती. मॅटवरचे डाव जरा वेगळे होते. इथे अंगमेहनत होतीच, पण पैलवानांची मार्केटिंग पण तेवढीच गरजेची होती. बारामतीच्या तालमीची इतकी वर्षे नागपूरच्या तालमीशी कट्टर दुश्मनी होती. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसत. सध्या नागपूरच्या तालमीचा जोर होता. नागपूरच्या तालमीने आता नवा फंडा अवलंबला होता.

- Advertisement -

तालमीने आपल्या पैलवानांना कुस्ती मारण्यासाठी चांगलंच तरबेज केलं होतं. त्यांनी त्यांच्या एका पैलवानाला देशभरात फेमस केलं होतं. त्यामुळे त्या पैलवानाचे नाव ऐकल्यावर इतर तालमीतले पैलवान थराथरा कापायचे. त्या पैलवानाच्या फक्त हवेवर नागपूरकरांचे पैलवान आरामात आखाड्यात जिंकत होते. त्यामुळे हळूहळू देशातील सर्व तालमीतील पैलवान नागपूरकरांच्या तालमीत येऊ लागले.

एवढं सार होऊन देखील बारामतीचा पैलवान अजूनही शड्डू ठोकून उभा होता. तसं नागपूरकरांनी त्यांच्या तालमीतले अनेक पैलवान आपल्या बाजूने वळवले होते. त्यामुळे त्यांची बाजू कमकुवत झाली होती. तरी देखील मातीत अनेकांना अस्मान दाखवणारा बारामतीचा पैलवान आता मॅटवर थोडंस स्ट्रगलच करत होता. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये हार पत्करून देखील मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उचलण्याची हिंमत आता अजूनही बारामतीच्या पैलवानांनी दाखवली आहे. एकेकाळी तेल लावलेला पैलवान म्हणून ख्याती असलेला पैलवान आता नव्या मॅटवरच्या कुस्तीत कसा सामना करतो..यासाठी आगामी महाराष्ट्र केसरीच्या फायनलच वाट पाहावी लागेल.

- Advertisement -

( ताकदवान, बलशाली म्हणून दोन्ही तालमीतले पैलवान स्वत:ला म्हणवून घेत असले तरी मायबाप प्रेक्षकांविना त्यांचं काहीच नाही…त्यांच्याशिवाय त्यांच्या ‘केसरी’पणाचा रूबाब फिका आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -