घरमहाराष्ट्रकाँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाची आज घोषणा

काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाची आज घोषणा

Subscribe

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विधिमंडळ नेत्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेत्याच्या घोषणेची शक्यता आहे. या पदासाठी विजय वड्डेटीवार आणि बाळासाहेब थोरात यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. शिवसेना आणि भाजप युतीच्या सत्तास्थापनेच्या मुद्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादाचा समाचार घेण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. बुधवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यात उडी मारली.

शिवसेना आणि भाजप युती ही कधीही मनापासून नव्हती, अशी टीका करताना प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी, शिवसेनेने मागील पाच वर्षांत खूप काही सहन केले असून आता ते काय निर्णय घेतात हे पहावे लागेल, असे सांगत शिवसेनेला चिमटा काढला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे त्वरीत उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईतील टिळक भवन येथे महत्वाची बैठक बोलाविली होती. या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी युतीवर टीका केली. यावेळी या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरर्गे यांच्यासह आमदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरु आहे, ते पाहिले तर भाजप-सेनेमधील मतभेद हे स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र आमची ही बैठक त्यासाठी नाही. आम्ही राज्यात शेतकरी अडचणीत सापडला असल्याने त्यावर काय करता येईल यावर बैठकीत चर्चा केली.

- Advertisement -

यासंदर्भात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असून शेतकर्‍यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर राज्यात इतर निवडणुका या वर्षात होणार असल्याने या निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असेल यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -