घरमहाराष्ट्रनाशिकमहायुतीतील बेबनावाचा फटका अवकाळीग्रस्तांनाही

महायुतीतील बेबनावाचा फटका अवकाळीग्रस्तांनाही

Subscribe

पालकमंत्र्यांच्या महत्वाच्या बैठकीला शिवसेनेची दांडी; विरोधक मात्र जातीने हजर

मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेल्याने या दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी आता समोरासमोरदेखील येण्यास तयार नाहीत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची व्यथा जाणून घेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा दौरा केला; शिवाय विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेत त्यात शेतकर्‍यांच्या अडचणींवर उपाययोजना काय करता येईल यावर महत्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून आपापल्या मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणे अपेक्षित असताना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीला चक्क दांडी मारली. याउलट बैठकीला राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महायुतीचा धर्म पुढील पाच वर्ष कोणत्याही परिस्थितीत पाळणार असल्याची भाषा दोन्ही पक्षांकडून निवडणुकीपूर्वी केली गेली. प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदाच्या हालचाली सरू झाल्यानंतर भाजपसह सेनेचे पदाधिकारी एकमेकांसमोर जायलाही तयारी नाहीत. अवकाळी पावसामुळे व्यतिथ झालेल्या शेतकर्‍यांच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्रित येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यातही राजकारण केले जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अवकाळीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष बैठक रविवारी (ता.३) झाली. या बैठकीला भाजपचे सर्वच आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीदेखील बैठकीला उपस्थित राहून पिक विम्यासंदर्भातील मुद्दे मांडले.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या बैठकीला आवूर्जून उपस्थिती दर्शवली. त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंसह अन्य पदाधिकारीही यावेळी हजर होते. मात्र, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना या बैठकीला यावेसे वाटले नाही. खरे तर, पालकमंत्री हा कुणा एका पक्षाचा नसतो. त्याच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असते. अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि शेतकर्‍यांना प्रशासनाकडून मिळणारे असकार्य बघता पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर घेतलेल्या बैठकीकडे समस्त शेतकर्‍यांचे लक्ष होते. शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेषत: आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात भाजपच्या गिरीश महाजनांनी बैठक घेतली म्हणून शिवसेनेच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, तेथील शेतकर्‍यांच्या अडचणींवर या बैठकीत चर्चाच होऊ शकली नाही. किमानपक्षी अवकाळीसारख्या संवेदनशील विषयांवर तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण करू नये, अशी चर्चा झडते आहे.

बैठकीला दांडी; दौर्‍याचे नियोजन
पालकमंत्र्यांच्या बैठकीला दांडी मारणार्‍या सेनेच्या लोकप्रतिनिधींनी आता आमदार आदित्य ठाकरे यांच्या सोमवारी (दि.४) होणार्‍या जिल्हा दौर्‍यात सहभागी होण्याचे नियोजन सुरू केले आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यांच्या अडचणींची तातडीने सोडवणूक होणे अपेक्षित आहे. सेनेच्या लोकप्रतिनिधींना मात्र त्याचे सोयरसूतक दिसत नसून ही मंडळी केवळ जिल्हा दौर्‍यात रस घेत आहेत. निर्णायक बैठकांना मात्र ते दांडी मारत असल्याचे चित्र पुढे येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -