घरमहाराष्ट्रपर्यटकांच्या फसवणुकीला चाप

पर्यटकांच्या फसवणुकीला चाप

Subscribe

नगराध्यक्षांचा कारवाईसाठी पुढाकार

देश-विदेशातील पर्यटकांच्या लाडक्या माथेरानमध्ये पर्यटकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेताच पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली. येथील दस्तुरीमध्ये पर्यटकांना राजरोस फसवून चालविलेल्या लुटमारीला चाप लावला. या कारवाईचे पर्यटकांनी मनापासून स्वागत केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटन हंगाम सुरू असून, मिनिट्रेन बंद असल्याचा (गैर) फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, रिक्षावाले, एजंट आणि हमाल आलेल्या पर्यटकांची फसवणूक करीत होते. याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी ही फसवणूक होते का हे पाहण्यासाठी स्वतः दस्तुरी येथे एक दिवस घालवला. या दरम्यान पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या संदर्भात त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे घातले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस शिपाई राहुल मुंढे, राहुल पाटील, प्रशांत गायकवाड, होमगार्ड हरीश तिटकारे, यशवंत थोराड, सचिन पारधी यांच्या पथकाने मंगळवार आणि बुधवारी धडक करवाई केली. परिणामी लुटमार चालविलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

मंगळवारी मंकी पॉइंट येथे जाऊन घोडेवाल्यांना पोलिसांचे दिलेले नमदा (घोड्यावरील जीनच्या खाली असणारे कापड) क्रमांकाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन घोडे नमदा नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घोडा परवाना क्रमांक 328 आणि 452 च्या मालकांवर कारवाई केली. तर एका घोडेवाल्याने पर्यटकांकडून 4 घोड्यांचे 8 हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या पर्यटकाला पोलीस ठाण्यात नेऊन एका घोड्यामागे 11०० प्रमाणे दर घेऊन उर्वरित रक्कम परत करण्यात आली. बुधवारी दुपारी बारा वाजल्यापासून दस्तुरी येथे जे घोडेवाले, रिक्षावाले, एजंट आणि हमाल खासगी वाहनांच्या मागे धावतात त्यांना पार्किंगमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला.

मंकी पॉइंट येथे पोलीस कारवाई करताना माझ्या निदर्शनास आले म्हणून मी जाऊन पाहिले असता एका घोडेवाल्याने एका घोड्याचा दर 2 हजार रुपये घेतला. हे पाहून मी हैराण झालो. हा घोडेवाला मूळवासीय अश्वपाल संघटनेचा आहे. त्यांच्या पदाधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे आणि जर अशी फसवणूक होत असेल तर पोलिसांनी आवश्य करवाई करावी.
-आशाताई कदम, अध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना

- Advertisement -

दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते अशा तक्रारी वारंवार येत होत्या. या फसवणुकीमुळे पर्यटक संख्या रोडावली होती. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई स्वागतार्ह आहे.
-राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -