घरमुंबईआकाश,स्वराज्य मंडळाची अंतिम फेरीत धडक

आकाश,स्वराज्य मंडळाची अंतिम फेरीत धडक

Subscribe

 मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी

आकाश क्रीडा मंडळ आणि स्वराज्य क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील मुलींच्या सब-ज्युनियर गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुलांमध्ये स्वयंभू, बालमित्र, गणेश, संकल्प, सिद्धार्थ या संघांना आगेकूच करण्यात यश आले.

नेहरू नगर कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मुलींच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आकाश क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राला ३४-२९ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली. प्रांजल पवार, मयुरी जाधव यांनी सुरुवातीला केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर चेंबूर संघाने पहिल्या डावात २१-८ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, दुसर्‍या डावात चेंबूरच्या संघाचा खेळ खालावला. आकाश क्रीडा मंडळाच्या आकांक्षा बने, हर्षा पाटील यांना सूर गवसला. आकांक्षाने चढाईत, तर हर्षाने पकडीत झटपट गुण मिळवून दिले. त्यामुळे आकाश क्रीडा मंडळाने हा सामना जिंकला.

- Advertisement -

उपांत्य फेरीतील चुरशीच्या झालेल्या दुसर्‍या सामन्यात स्वराज्य क्रीडा मंडळाने आराध्य सेवा संघावर ४३-४२ अशी मात केली. याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आक्रमक सुरुवात करत स्वराज्यला विश्रांतीला २६-२३ अशी आघाडी मिळवून दिली. आराध्यच्या हरजित कौर, अर्चना साहनी यांनी उत्तरार्धात आक्रमक खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा अवघ्या १ गुणाच्या फरकाने पराभव झाला. त्याआधी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वराज्य मंडळाने संघर्ष मंडळाचा ३३-०७ असा, आराध्य संघाने गोरखनाथ संघाचा ३९-२३ असा, चेंबूर क्रीडा केंद्राने सत्यम सेवाचा ३०-२३ असा, आकाश स्पोर्ट्सने नवशक्तीचा २६-०८ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

स्वयंभूची मातामहाकालीवर मात

मुलांच्या दुसर्‍या फेरीत स्वयंभू क्रीडा मंडळाने ५-५ चढायांच्या डावात माता महाकाली मंडळाचा ३५-३४ (७-६) असा पराभव करत या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. सागर मानेच्या उत्तम खेळाच्या जोरावर स्वयंभू मंडळाने पूर्वार्धात १७-१४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात वेदांत नारकरने अप्रतिम खेळ करत माता महाकालीला पूर्ण डावात २८-२८ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर झालेल्या ५-५ चढायांच्या डावात स्वयंभूने ७-६ अशी बाजी मारली. तसेच गणेश क्रीडा मंडळाने अस्तित्व स्पोर्ट्सला ३३-३२ असे, सिद्धार्थ क्रीडा मंडळाने ओम साई क्रीडा मंडळाला ३६-२९ असे, बालमित्र क्रीडा मंडळाने कोकण रत्न मंडळाला ३१-२२ असे, संकल्प प्रतिष्ठानने युवक क्लबला ३६-२९ असे पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -