घरक्रीडावॅग्नरविरुद्ध खेळणे असेल आव्हानात्मक!

वॅग्नरविरुद्ध खेळणे असेल आव्हानात्मक!

Subscribe

अजिंक्य रहाणेचे मत

भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारत पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि त्यानंतर वेलिंग्टन (२१ ते २५ फेब्रुवारी) व ख्राईस्टचर्च (२९ फेब्रुवारी ते ४ मार्च) येथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा संघ सध्या जगातील सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून ओळखला जातो, तर न्यूझीलंड घरच्या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी करतो. त्यामुळे या दोन संघांमधील कसोटी मालिकेकडे चाहत्यांचे आणि क्रिकेट समीक्षकांचे विशेष लक्ष आहे. ही मालिका जिंकण्यासाठी फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल, असे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला वाटते. तसेच या मालिकेत डावखुरा वेगवान गोलंदाज निल वॅग्नरविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असेही मत रहाणेने व्यक्त केले. मागील वर्षी कसोटीत सर्वाधिक मोहरे टिपणार्‍या गोलंदाजांच्या यादीत वॅग्नर (६ सामन्यांत ४३ बळी) तिसर्‍या स्थानी होता.

वॅग्नरने मागील काही मालिकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. मात्र, आम्हाला केवळ त्याच्याविरुद्धच सावधपणे खेळावे लागेल असे नाही. फलंदाज म्हणून तुम्हाला प्रत्येक गोलंदाजाचा आदर करावा लागतो. न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मात्र, या मालिकेत यशस्वी होण्यासाठी आम्ही नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे, असे रहाणे म्हणाला.

- Advertisement -

न्यूझीलंडमध्ये खेळताना वारा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो असे रहाणेला वाटते. आम्ही २०१४ साली न्यूझीलंडमध्ये खेळलो होतो. त्यावेळी वार्‍याने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. वार्‍यामुळे चेंडू अधिक स्विंग होतो. मागील दौर्‍यात मी वेलिंग्टनमध्ये खेळलो होतो, पण आता बर्‍याच काळानंतर आम्ही ख्राईस्टचर्चमध्ये सामना खेळणार आहोत. तिथे चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला वातावरणाशी लवकरात लवकर जुळवून घ्यावे लागेल, असे रहाणेने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -