घरमुंबईस्थायीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेत दबावतंत्राची खेळी

स्थायीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेत दबावतंत्राची खेळी

Subscribe

उमेदवारी कापल्याने नगरसेवक वामन म्हात्रेंना मानसिक धक्का ,शिवसेना विरुद्ध भाजप लढत होणार,छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेकडून गणेश श्रीपत कोट तर भाजपकडून विकास म्हात्रे यांनी यांनी बुधवारी महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे नामनिर्देशन पत्रे सादर केली. त्यामुळे शिवसेना विरूध्द भाजप असाच सामना होणार आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे हे सुध्दा इच्छूक होते. मात्र सेनेतील एका गटाने म्हात्रे यांच्या नावाला तीव्र विरोध करीत दबावतंत्राचा मार्ग अवलंबल्याने अखेर त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे म्हात्रे यांना जबर धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून, शिवसेनेचे 8, भाजपा- कल्याण डोंबिवली विकास आघाडीचे 6, काँग्रेसचे 1, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 1 असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. यंदाचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे शिवसेनेने भाजपला लांब ठेवले आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने दोघेही आमने-सामने आले आहेत.

- Advertisement -

स्थायी समितीत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी सुध्दा काँग्रेस मनसेची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक तितकी सोपी नाही. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक वामन म्हात्रे हे सभापतीपदासाठी इच्छूक होते. पक्षातील वरिष्ठांकडून त्यांना शब्दही देण्यात आला होता. मात्र शिवसेनेतील एका गटाने म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यास राजीनामा देऊ असा वरिष्ठांकडे दबावतंत्राचा वापर केला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ही दुपारी 2 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र पावणेपाच वाजेपर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होत नव्हते. अखेर शेवटच्या सात मिनिटात शिवसेनेचे गणेश कोट यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. गेल्या दहा वर्षापासून एकही पद न भूषविलेले व पक्षाशी एकनिष्ठ असताना ज्येष्ठ नगरसेवक असतानाही पत्ता कापल्याने नगरसेवक वामन म्हात्रे यांना ऐनवेळी उमेदवारी कापल्याने धक्का बसला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात पक्षातील कोणत्याही पदाधिकार्‍याने बोलण्याचे टाळले. स्थायी समिती पदाच्या सभापती पदाची निवडणूक शुक्रवार 3 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता स्थायी समिती सभागृहात होणार आहे. मात्र शिवसेनेतील एका गटाच्या हेकेखोरपणाचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू हेाती. त्यामुळे यासर्व प्रकरणी शिवसेनेतील वरिष्ठ नेतेमंडळी काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधले आहे.

विणा जाधव यांची बिनविरोध निवड
महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या विणा गणेश जाधव यांनी बुधवारी महापालिका सचिवांकडे नामनिर्देशनपत्र सादर केले. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीत शिवसेनेचे 5, भाजपा- कल्याण डोंबिवली विकास आघाडीचे 4, तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे 1, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 1 असे पक्षीय बलाबल आहे. जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता उरली आहे.

- Advertisement -

माझ्या वडीलांना गेल्या दहा वर्षात कुठलेही पद दिले नाही. यावेळी स्थायी समिती सभापती पद देण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु काही स्थानिक स्वयंभू व महापालिकेला लुटारू नेत्यांनी गट तयार करून व दबावतंत्राचा वापर करून त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. वडील सभापती झाल्यास त्यांना महापालिकेला लुटता येणार नव्हते. या घडामोडींमुळे वडिलांना खूप मोठा मानसिक धक्का बसला असून, ते घरी येत असताना गाडीत हार्ट अटॅक आल्याने, त्यांना डोंबिवलीत उपचार सुरू आहेत. त्यांना तातडीने मुंबईला उपचारासाठी नेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
-अनमोल म्हात्रे, नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पूत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -