घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपुस्तके आणि राजकारण्यांचे डाव

पुस्तके आणि राजकारण्यांचे डाव

Subscribe

याआधीही महापुरुषांवरील पुस्तकांवर वाद झाले आहेत. जाळपोळ, तोडफोड आणि पुस्तकांवर बंदीही घालण्यात आली आहे. ज्यावेळी सत्ताधार्‍यांना जनता आपल्या विरोधात जात आहे, याची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा अशी मुंगेरीलाल के हसीन सपने एखादा लेख, मुद्दा किंवा पुस्तक रूपात गाठोड्यातून बाहेर काढले जातात आणि इस्पित साध्य केले जाते. अशा प्रकारे मूठभर लोकांना हाताशी धरून एखाद्या पुस्तकावरून वाद निर्माण करून देशातील प्रमुख प्रश्न, समस्या यांना शिताफीने बगल देण्यामध्ये काहींचा हातखंडा असतो. देशात महागाईचा भडका उडाला आहे. अर्थव्यवस्था गाळात चालली आहे. जगभर विशेषत: पश्चिम आशियात ताणतणाव सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यातच अमेरिका आणि इराणचे ताणलेले संबंध यामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना आपण मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करण्यात गुंग आहोत. हे मती गुंग होण्याचेच लक्षण आहे.

130 कोटींच्या भारत देशात सध्या सीएए आणि एनआरसी विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. देशाची क्रयशक्ती असलेली तरुणपिढी ही सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी करू नये यासाठी रस्त्यावर उतरत आहे. या विषयावर मागील काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्येही एखाद्या गँगप्रमाणे हल्ला-प्रतिहल्ला सुरू आहे, ठिकठिकाणी जाळपोळ, पोलिसांकडून लाठीहल्ला सुरू आहे. अशा प्रकारे याला पाठिंबा देणारा उजव्या विचारसरणीचा भाजप एका बाजूला तर दुसरीकडे याला विरोध करणारे डाव्या विचारांचे पक्ष, तसेच सर्वात जुना पक्ष काँग्रेस असे दोन गट पडले आहेत. देशातील या दोन विषयांव्यतिरिक्त सर्व प्रश्न सुटले आहेत, अशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक तसेच विद्यार्थी संघटनांनी देशभर हलकल्लोळ माजवला आहे.

देशातील महत्त्वाच्या राज्यांमधील विद्यापीठांमध्ये जेव्हा विद्यार्थी अभ्यास सोडून सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलने आणि मोर्चाचे नियोजन करत होते, तेव्हा मागील शनिवारी भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यात भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे जे पुस्तक लिहिले त्याचेही प्रकाशन करण्यात आले. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. लागलीच या पुस्तकावरून दावे आणि प्रतिदावे, वादविवाद सुरू झाले. सोशल मीडियावर नेटकर्‍यांना आयतं कोलीत मिळाले. सीएएच्या विषयावर आधीच दोन्ही गटांकडून सोशल मीडियावर धिंगाणा सुरू होता, त्यांनाही नवीन खाद्य मिळाले होते. या विषयावर सध्या अक्षरश: शाब्दिक बुडबुडे सोडले जात आहेत.

- Advertisement -

या पुस्तकावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. हे पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका सेनेने केली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे, अशी मागणी केली. अशा प्रकारे या विषयावरून राज्यात सर्व स्तरांतून संताप निर्माण झाला. यावर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी स्पष्टीकरण दिले. भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समान गुणांची तुलना केलेली आहे. यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेही अपमान झालेला नाही, असे ते म्हणाले. आपण एखाद्याला आधुनिक चाणक्य, सध्याचे गांधी, आंबेडकर असे म्हणतो. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या गुणांची प्रशंसा असते. यात महापुरुषाचा कुठेही अपमान होत नाही. या पुस्तकावरून काही जण जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत, असेही भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र, तरीही वाद संपत नाही, म्हणून अखेर भाजप नेत्यांनी ‘या पुस्तकाशी भाजपचा काही संबंध नाही’, असे सांगत वादावर पडदा टाकला. मात्र, त्याच वेळी या पुस्तकावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार करताना शरद पवार यांना जाणता राजा, ही पदवी का दिली जाते, असा खोचक सवाल केला.

युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे भाजप कार्यालयात प्रकाशन होत असताना भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. भाजपच्या कार्यालयात, नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन झालेल्या या पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, असे म्हणून भाजप हात झटकू शकत नाही. दरम्यान, आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना आव्हान दिले. त्यामुळे या वादात छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे उतरणे स्वाभाविक होते.

- Advertisement -

गेल्या महिन्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल एक पुस्तक मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवा दलामार्फत प्रकाशित करण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत छापण्यात आलेल्या चुकीच्या संदर्भामुळे त्याही पुस्तकावरून वाद उफाळून आला होता. भोपाळची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे. त्यावर बंदी आहे. तरीही अशी पुस्तके वाटली जातात. स्वा. सावरकर देशासाठी प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असे शिवसेनेने ठणकावून सांगितलेे. यापूर्वीही महापुरुषांवरील पुस्तकांवर वाद झाले. जाळपोळ, तोडफोड आणि पुस्तकांवर बंदीही घालण्यात आली. ज्यावेळी सत्ताधार्‍यांना जनता आपल्या विरोधात जात आहे, याची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा अशी मुंगेरीलाल के हसीन सपने एखादा लेख, मुद्दा किंवा पुस्तक रूपात गाठोड्यातून बाहेर काढले जाते आणि इस्पित साध्य केले जाते. अशा प्रकारे मूठभर लोकांना हाताशी धरून एखाद्या पुस्तकावरून वाद निर्माण करून देशातील प्रमुख प्रश्न, समस्या यांना शिताफीने बगल देण्यामध्ये काहींचा हातखंडा असतो. महाराष्ट्राला पुस्तक आणि वाद हे काही नवीन नाही. पुण्यात 15 वर्षांपूर्वी ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या जेम्स लेनच्या पुस्तकावरूनही बराच वाद झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते आणि आर.आर. पाटील गृहमंत्री होते. तेव्हा या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित काही पुस्तकांवर त्या त्या वेळी बंदी घातल्याचे दाखले मिळतात.

त्यामुळे एनआरसी, सीएएनंतर आता एका पुस्तकाने देशाचे वातावरण ढवळून काढले असून अवघ्या 25 दिवसांवर आलेली दिल्ली विधानसभा निवडणूकही याच पुस्तकावर लढण्याचा काहींचा मानस आहे का, त्यासाठी खर्‍या समस्या, प्रश्न यांवरून जनतेचे लक्ष भरकटवून हा एकपात्री प्रयोग रंगवला आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. देशातील किरकोळ महागाईच्या दराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्क्यांवर झेपावताना किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेकडून अंदाजित अशा ४ टक्क्यांच्या जवळपास दुप्पट स्थिरावला. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाई दराचा भडका उडाला आहे. अर्थव्यवस्था गाळात गेलेली आहे, महागाईने डोके वर काढले आहे. जगभर आणि विशेषत: पश्चिम आशियात ताणतणाव सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या, तर परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यातच अमेरिका आणि इराणचे ताणलेले संबंध यामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना आपण मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करण्यात गुंग आहोत. हे मती गुंग होण्याचेच लक्षण दिसते.

देशात झपाट्याने वाढणारी बेकारी, महागलेले शिक्षण, आरोग्य समस्येविषयी अनास्था, महागाईचा वाढलेला उच्चांक आणि दुसरीकडे पूर्वेकडील देशांचे कच्च्या तेलावरील निर्बंध, इराण व अमेरिकेतील ताणलेले संबंध यांवर उपाय शोधण्यापेक्षा पुस्तकावरून राजकारण करताना सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही जनतेशी द्रोह करत आहेत. देशातील मूळ समस्या, प्रश्न यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी रिकामटेकडी माणसे कोट्यवधी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. अन्यथा संबंधित पुस्तकात काय लिहिले आहे, ते वाचायला पोटात अन्न हवे आणि कसलाही आधार न घेता लिहिलेले पुस्तक वाचायला घर हवे. या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठी नोकरी हवी. ती टिकवण्यासाठी देशात कारखानदारांना आणि मालकांना पोषक वातावरण हवे. नाहीतर दररोज अशा नवनवीन पुस्तकाचे प्रकाशन होईल आणि साप साप म्हणत जनता भुई धोपटत राहील. मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत, पण त्यातून कुणाचे इस्पित साध्य होत आहे, हे तपासायला पाहिजे. अन्यथा राज्यकर्ते मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवायला बसलेच आहेत. म्हणूनच नागरिकांनी विशेषत: तरुणांनी वेळीच सावध व्हायला हवे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -